
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात शिवसेना व ठाकरे गट काय भूमिका घेणार?
मुंबई : यंदा भारताकडे यजमानपद असलेला क्रिकेट वर्ल्डकपचा सामना ऑक्टोबर महिन्यात रंगणार आहे. विशेष बाब म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये असणार आहे. हिंदुत्वाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवून सत्तेवर आलेले आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित असलेले राज्याचे सद्यकालीन मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोबतच ठाकरे गटदेखील बाळासाहेबांच्या विचारांशी किती एकनिष्ठ आहे, हे यातून दिसेल.
याचे मुख्य कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, पाकिस्तानच्या संघाने भारतात येऊन खेळू नये. या गोष्टीला त्यांचा विरोध होता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत, तर आशिष शेलार हे खजिनदार आहेत. त्यामुळे बाळासाहेबांना मानणा-या दोन्ही गटांचं यावर काय म्हणणं आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.