ऑस्ट्रेलियाचा भारतावर २०९ धावांनी विजय
लंडन (वृत्तसंस्था) : अखेर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चषकावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाव कोरले असून ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा २०९ धावांनी विराट पराभव केला. एकेकाळी दक्षिण आफ्रिकेला क्रिकेट विश्वात चोकर्स म्हटले जायचे, पण आता ही नामुष्की भारतीय संघावर आली आहे. कारण भारतीय संघाला पुन्हा एकदा विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी ४४४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी साकारता आली नाही आणि त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. गेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला न्यूझीलंकडून पराभव पत्करावा लागला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताचे विजयाचे स्वप्न बेचिराख केले आणि त्यांना २०९ धावांनी पराभव पत्करावा लागला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताने कडवी झुंज दिली खरी. पण त्यांची ही झुंज मात्र अपुरी पडली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४४४ धावांच्या विशाल लक्ष्यापुढे भारत केवळ २३४ धावाच करू शकला आणि संपूर्ण संघ ऑल आऊट झाला. भारताकडून रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनाच ४० धावांचा आकडा पार करता आला. पण संघाला ते विजय मिळवून देऊ शकले नाही. ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी भारतावर विजय साकारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकली आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४४४ धावांचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेसारख्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांना बाद करण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश आले. शेवटच्या दिवशी स्कॉट बोलॅंडने एकाच षटकात विराट कोहली आणि रवींद्र जडेजाला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला विजयाच्या दिशेने नेले. कांगारुंच्या भेदक माऱ्यामुळे भारताचा संपूर्ण डाव ६३.३ षटकात २३४ धावांवर आटोपला. भारताला सर्वबाद करून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये विजयी झेंडा फडकवला. त्यामुळे आयसीसीच्या या टूर्नामेंटमध्ये भारताचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला.
भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने (४३), शुबमन गिल (१८), चेतेश्वर पुजारा (२७), विराट कोहली (४९), अजिंक्य रहाणे (४६), रवींद्र जडेजा (०), श्रीकर भरत (२३), शार्दूल ठाकूर (०), उमेश यादव (१), मोहम्मद शमी (१३) आणि मोहम्मद सिराजने फक्त एक धाव केली. ऑस्ट्रेलियासाठी स्कॉट बोलॅंडने अप्रतिम गोलंदाजी करून ३ विकेट्स घेतल्या. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी खराब फटकेबाजी करत आपल्या विकेट फेकल्या. त्यामुळेच टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसलाय. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांना मोठी खेळी करता आली नाही.
टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपले नाव कोरण्यात अपयश आले. लंडनच्या ओव्हल मैदानात खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी ४४४ धावांचे आव्हान दिले होते. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी रचलेल्या ८६ धावांच्या भागिदारीने भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम राखली होती. पण स्कॉट बोलँडने विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांना लागोपाठच्या चेंडूंवर माघारी धाडून टीम इंडियाची पाच बाद १७९ अशी बिकट अवस्था केली. मग मिचेल स्टार्कने अजिंक्य रहाणेला माघारी धाडले. त्या तीन धक्क्यांमधून न सावरलेला भारताचा डाव २३४ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपले नाव कोरले.
भारतीय संघाकडून आघाडीच्या खेळाडूंनी जम बसल्यानंतर विकेट फेकल्या. रोहित शर्मा ४३, चेतेश्वर पुजारा २७, विराट कोहली ४९ आणि अजिंक्य रहाणे ४६ यांनी चुकीचे फटके मारत आपल्या विकेट फेकल्या. त्याचाच फटका टीम इंडियाला बसला. रविंद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूर यांना खातेही उघडता आले नाही. नॅथन लायन याने चार विकेट घेतल्या. तर स्कॉट बोलँडने तीन महत्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडले. तर पॅट कमिन्सने एक तर स्टार्कने २ गडी बाद करत भारतीय फलंदाजीचा फडशा पाडला.
आयसीसीच्या सर्व ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे…
भारतीय संघाचा १० वर्षांपासून आयसीसी चषक विजायाचा दुष्काळ कायम राहिला. आज अनेक क्रीडा प्रेमींचे स्वप्नही भंगले. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या नावावर आणखी एक आयसीसी ट्रॉफीची नोंद झाली. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया हा आयसीसीच्या सर्व ट्रॉफी नावावर करणारा संघ ठरला आहे.