
मुंबई पोलिसांच्या ११६ कुटुंबीयांना तातडीने घरे खाली करण्याची नोटीस
मुंबई : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी वाहणा-या मुंबई पोलिसांच्या डी बी मार्ग पोलीस वसाहतीत राहणाऱ्या तब्बल ११६ पोलीस कुटुंबीयांना तातडीने घरे खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या पोलिसांना डी बी मार्गऐवजी माहीम, नायगाव, वरळी येथील पर्यायी घरं दिली आहेत. त्यामुळे मुलांच्या शाळांचे कसे करायचे, हे दुसरे संकटही या पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या इमारती धोकादायक असल्याने पोलीस कुटुंबीयांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यातच डी बी मार्गऐवजी इतर ठिकाणी दिलेली घरे सुद्धा अतिशय निकृ्ष्ट दर्जाची असल्याचा पोलीस कुटुंबियांचा दावा आहे.
डी बी मार्ग ऐवजी माहिम, नायगाव, वरळी आदी ठिकाणी पर्यायी घरं दिली. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून पोलीस कुटुंबिय या वसाहतीत राहत आहेत. आता अचानक घरं कशी खाली करायची? असा सवाल पोलीस कुटुंबियांनी सरकारला केला आहे.
पोलिसांना मोफत घरे नाहीच!
पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली असून पोलिसांना कुटुंबीयांसह जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे.
मुंबईतील बीडीडी चाळीत वास्तव्य करणाऱ्या पोलिसांना १५ लाख रुपयात घरे देणार असल्याची घोषणा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलिसांना मोफत घरे द्यावी अशी मागणी कालिदास कोळंबकर यांनी केली होती. मीदेखील या मताचा होतो. मात्र, विभागाशी चर्चा केल्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्यांमध्ये भेद करता येणार नाही. पोलिसांना मोफत घरे दिल्यानंतर शासकीय कर्मचारीदेखील हीच मागणी करतील आणि कर्मचाऱ्यांमध्ये भेद करता येणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.
दरम्यान, पोलिसांच्या कुटुंबियांवर निवृत्तीनंतर बिकट परिस्थिती ओढवते. मुंबईत घर घेणे परवडत नाही. त्यामुळेच परवडणाऱ्या घरांच्या योजनेत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हक्काची घरे उपलब्ध होणार असल्यामुळे पोलिसांची मोठी चिंता दूर होईल, असेही ते म्हणाले.