बीड : बीडच्या आष्टी ( Beed Ashti) शहरातील आझादनगरमध्ये एका तरुणानं औरंगजेबाचं स्टेट्स ठेवल्याने काल रात्री तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर रात्री उशिरा संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या आवाहनानंतर आज आष्टी बंद आहे. या स्टेटसमुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण झाल्याची तक्रार आष्टी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
झैद अय्युब सय्यद याने ‘बाप तो बाप रहेगा’ अशा आशयाचे वाक्य टाकून स्टेटस ठेवले होते. त्यामुळे धार्मिक भावना दुखवल्या असून दोन समजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याची तक्रार शुभम शहाराम लोखंडे या तरुणाने आष्टी पोलीस ठाण्यात केली. त्या तक्रारीवरून जैद अय्युद सय्यद याच्या विरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास एपीआय भाऊसाहेब गोसावी हे करत आहेत. घडलेल्या प्रकारनंतर पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अहमदनगरच्या मिरजगावमधील बंद मागे
कोल्हापूर पाठोपाठ अहमदनगरच्या मिरजगाव मधील एका तरुणाने औरंगजेबाची पोस्ट समाज माध्यमांवर टाकल्याने तणाव निर्माण झाला होता. या पोस्टच्या निषेधार्थ काल मिरजगाव बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांनी दिली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, अहमदनगरच्या मिरजगावमधील बंद मागे घेण्यात आला आहे.