- दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृद्यी अमृत नयनी पाणी’ ग. दी. माडगुळकरांनी लिहिलेलं हे गीत संघर्ष करणाऱ्या प्रत्येक स्त्रीची व्यथा मांडतं. तिची कहानीसुद्धा अशीच काळीज पिळून काढणारी, आई-वडील जिवंत असून पराकोटीच्या गरिबीमुळे ती अनाथाश्रमात अनाथ म्हणून वाढली. स्वकष्टातून शिकली. अवघ्या ५ रुपयांसाठी शेतमजुरी केली. तिची आज १२५ कोटी रुपयांची अमेरिकेत सॉफ्टवेअर सोल्यूशन कंपनी आहे, हे सांगितलं तर कुणालाही दंतकथाच वाटेल. पण ही दंतकथा खऱ्या आयुष्यात जगून यशस्वी ठरलेल्या ज्योती रेड्डी या संघर्षनायिकेची ही कथा.
१९७० मध्ये वारंगलच्या एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेली ज्योती रेड्डी पाच भावंडांपैकी दुसरं अपत्य. वयाच्या ९व्या वर्षी, ज्योतीचे वडील वेंकट रेड्डी यांनी तिला आणि तिच्या धाकट्या बहिणीला अनाथाश्रमात सोडले. दारिद्र्यामुळॆ वेंकट यांना तसं करणं भाग पडलं. निदान आपल्या मुलींना तरी चांगलं जेवण मिळेल, असं त्यांना वाटत होतं. ज्योतीची धाकटी बहीण आजारी पडली आणि लवकरच घरी परतली, ज्योती मात्र अनाथाश्रमात राहिली. अनाथाश्रमातील जीवन तिच्यासाठी खूप कठीण होते. तिथे नळ नव्हता आणि व्यवस्थित बाथरूम नव्हते. ज्योती विहिरीतून फक्त एक बादली पाणी आणण्यासाठी तासनतास उभी राहायची. तिला तिच्या अम्माची खूप आठवण यायची. मात्र आश्रमात राहण्यासाठी, आपल्याला आई नाही, असं भासवावं लागे.
या ठिकाणी ज्योती टेलरिंगसह व्यावसायिक कौशल्ये शिकली. तसेच तिच्या अनाथाश्रमाच्या अधीक्षकाकडे घरची कामे करायची. अनाथाश्रमात असताना तिने चांगले जीवन जगण्याचा अर्थ पाहिला आणि चांगल्या नोकरीचे महत्त्व तिला समजले. तिला १०वीला फर्स्ट क्लास मिळाला होता; परंतु अत्यंत गरिबीमुळे तिला तिचे शिक्षण बंद करावे लागले.
वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी ज्योतीचा विवाह सामी रेड्डी या शेतकऱ्याशी झाला, जो तिच्यापेक्षा १० वर्षांनी मोठा होता. सामीकडे फक्त अर्धा एकर जमीन होती, त्यामुळे ज्योती इतरांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करायची. दहा तासांच्या मजुरीपोटी तिला ५ रुपये मिळायचे. दोन मुले पदरात असल्याने दिवसभर शेतात राबून संध्याकाळी संयुक्त कुटुंब असलेल्या आपल्या सासरच्या घरी राबायची. ज्योतीने केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्रात स्वेच्छेने काम केले. स्वयंसेवक झाल्यानंतर ज्योतीने येथे शिकवायला सुरुवात केली. मात्र शिकवणीतून कमावलेली रक्कम जगण्यासाठी पुरेशी नव्हती, त्यामुळे अधिक पैसे मिळवण्यासाठी ती रात्री शिवणकाम करायची. यानंतर ज्योतीने पुढील शिक्षण घेण्याचा विचार केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठातून बीए केले. त्यानंतर १९९४ मध्ये तिने एका शाळेत विशेष शिक्षिका म्हणून ३९८ रुपये महिना पगारावर काम केले. मजेशीर गोष्ट म्हणजे ती कामावर येण्यासाठी दररोज २ तास प्रवास करत असे. या वेळेचा उपयोग करून तिने आपल्या सहप्रवाशांना साड्या विकायला सुरुवात केली आणि प्रत्येक साडीतून तिला २० रुपये नफा मिळाला. यामुळे तिला वेळेची किंमतही कळली.
शेवटी, १९९५ मध्ये, तिला मंडल बालिका विकास अधिकारी या पदाची चांगली नोकरी मिळाली. तिला दरमहा २,७५० रुपये पगार मिळू लागला. मंडल बालिका विकास अधिकारी म्हणून ती शाळांची तपासणी करत असे. याच काळात तिने १९९७ मध्ये पदव्युत्तर पदवीही मिळवली.
सर्व काही ठीक होते, पण १९९८ मध्ये अमेरिकेतून वरंगलला आलेल्या तिच्या चुलत बहिणीला पाहून ज्योती तिच्या जीवनशैलीचा विचार करत असे. तिच्या चुलत बहिणीने तिला सांगितले की, तिच्यासारख्या स्त्रिया तिथे सहज काम करतात. तेव्हापासून ज्योतीने अमेरिकेला जाण्यासाठी बचत करायला सुरुवात केली. यासाठी तिने इतर शिक्षकांसह एक फंड सुरू केला. याद्वारे तिने २५,००० रुपयांपर्यंत पैसे जमवले. यादरम्यान तिने व्हीसीएल कॉम्प्युटर्सचे संगणक सॉफ्टवेअर शिकण्यासाठी दररोज हैदराबादला जाणे सुरू केले. तिच्या नवऱ्याने तिला मनाई केली, पण ज्योती ठाम होती.
पतीच्या नापसंतीला न जुमानता, ती मुलांसह मैलारान गावातून बाहेर पडली आणि हनमकोंडा शहरात आली. तिने टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला, क्राफ्ट कोर्स केला व १ रुपये प्रति पीस दराने पेटीकोट शिलाई करून दररोज २०-२५ रुपये कमावले. तिला जनशिक्षण निलयम येथे ग्रंथपाल म्हणून नोकरीही मिळाली.
अमेरिकेला जायचं हे ठाम असल्याने तिने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि २००१ मध्ये पासपोर्ट आणि व्हिसा मिळवून ती अमेरिकेला गेली. अमेरिकेत तिने १२ तासांची नोकरी केली, ज्यामध्ये तिला ६० डॉलर पगार मिळत असे. या काळात ती एका गुजराती कुटुंबासोबत पेइंग गेस्ट म्हणून राहिली. अमेरिकेत राहणे परवडावे म्हणून तिने बेबीसिटर, गॅस ऑपरेटर आणि सेल्स गर्ल म्हणून अनेक छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या.
यानंतर तिला सीएस अमेरिका नावाच्या कंपनीत ऑफिसमध्ये बसून काम करण्यासारखी पहिली नोकरी मिळाली. तिला दुसऱ्या एका कंपनीकडून नोकरीची ऑफरदेखील आली, पण ती फार काळ टिकली नाही आणि तिला पुन्हा एकदा त्या छोट्या नोकऱ्यांमध्ये परतावे लागले.
जवळपास १.५ वर्षे संघर्ष केल्यानंतर, २००१ मध्ये ती आपल्या मुलींना भेटण्यासाठी भारतात परत आली. त्यादरम्यान ज्योती एका मंदिरात जात असताना एका पुजार्याला भेटली, त्याने भविष्यवाणी केली की, ती उद्योजिका बनेल. ही गोष्ट तिच्या मनात घर करून गेली. लवकरच तिने एक कन्सल्टन्सी फर्म सुरू केली, जी अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसासारख्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत करत असे.
यानंतर, २००१ मध्ये तिने अमेरिकेत कमावलेल्या बचतीतून (सुमारे ४०,००० डॉलर्स) ‘की सॉफ्टवेअर सोल्यूशन’ची स्थापना केली. तिच्या कंपनीने कर्मचारी भरती आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन्स देखील विकसित केले. तिने पहिल्या वर्षी सुमारे दीड करोडचा नफा कमावला, इंडिया टाइम्स डॉट कॉमच्या अनुसार सध्या तिच्या कंपनीची उलाढाल १२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तिच्या कंपनीत १०० हून अधिक कर्मचारी काम करतात. तिची अमेरिकेत चार घरं आणि हैदराबादमध्ये एक बंगला आहे.
“मला अजून बरेच काही करायचे आहे. स्त्रिया देखील कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर पुरुषांपेक्षा चांगले उद्योगपती बनू शकतात, स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावे आणि आयुष्याच्या विविध टप्प्यांवर वडील, पती आणि मुलांवर अवलंबून न राहता स्वतःचे निर्णय स्वत: घ्यावे. तुमच्या नशिबाचे मालक व्हा आणि लक्षात ठेवा, मुलांची काळजी घेणे हा जीवनाचा भाग आहे; परंतु जीवन नाही” या शब्दांत महिलांना त्या व्यावसायिक आयुष्याचा कानमंत्र देतात.
महिला सबलीकरणाचा इतका सरळ अर्थ सांगणारी आणि हा अर्थ स्वत: जगलेली ज्योती रेड्डी खऱ्या अर्थाने ‘लेडी बॉस’ आहे.