ओव्हलवर बुधवारी भारत – ऑस्ट्रेलिया भिडणार
लंडन (वृत्तसंस्था): ‘आयपीएल’नंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ ते ११ जून दरम्यान आणखी एक मोठा अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही फायनल आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. साहजिकच चाहत्यांचा मनात हा प्रश्न तर येणारच की या अंतिम लढतीत जर पावसाने हजेरी लावली तर काय? या सामन्यावरही पावसाची वक्र दृष्टी असल्याचे वृत्त आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात नुकताच पावसाने केलेला रंगाचा बेरंग सर्वांनी अनुभवला. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना हा वेळापत्रकानुसार रविवार, २८ मे रोजी होणार होता. मात्र, पावसामुळे त्या दिवशी नाणेफेक होऊ शकली नाही आणि सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला. म्हणजेच बीसीसीआयने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला होता. राखीव दिवशीही पाऊस पडला, पण रात्री उशिरा सामना संपला आणि २०२३ चा विजयी संघ आपल्याला मिळाला.
टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसारख्या मोठ्या फायनलसाठी राखीव दिवस ठेवला जातो. तर डब्ल्यूटीसी फायनलसाठीही असेच काहीसे आहे. कारण कसोटी सामना हा पाच दिवस खेळवला जातो. कसोटी क्रिकेटला रोमांचक बनवण्यासाठी आयसीसीने ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ सुरू केली आहे. अशा परिस्थितीत पाच दिवस चालणाऱ्या या अंतिम सामन्यासाठी आयसीसीकडून राखीव दिवसाची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारे, अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी पाऊस पडला आणि त्याचा निकालावर परिणाम झाला, तर सामना एका दिवसाने पुढे ढकलण्यात येईल. आयसीसीने २०२१ मध्येच एक प्रकाशन जारी करून याची घोषणा केली होती.
या नियमानुसार, राखीव दिवशीही षटकांचा पूर्ण दिवसाचा कोटा टाकला जाईल आणि अंतिम सामन्याचा निकाल मिळेल. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील जेणेकरून चॅम्पियनची निवड करता येईल. दुसरीकडे, अंतिम सामना जर अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.