विशेष : डॉ. श्वेता चिटणीस
उन्हाची काहिली वाढली आणि पावसाळा जवळ येऊ लागला की, काही सुंदर पक्षी भारतात स्थलांतर करतात. त्यामुळे उन्हाळ्यात फक्त कावळे, मैना, घारी इ. पक्षी दिसतात, असे जर वाटत असेल, तर तुमच्या आजूबाजूच्या परिसरात नक्की या पक्ष्यांचा शोध घ्या.
अनेक वेळा असा प्रश्न पडतो की, पक्षी कसे बरे मार्गक्रमण करत असावेत? त्यांना कोण रस्ता दाखवते? भारतात हिवाळ्यात जे जे पक्षी स्थलांतर करून आले होते, ते आता आपल्या मायदेशी परतले आहेत. त्यामुळे सध्या आपण वर्षभर एकाच स्थळी राहणारे, पक्षी बघू शकतो; परंतु सध्या ‘उन्हाळ्यात स्थलांतर करणारे पक्षी’ आपण नक्कीच पाहू शकतो. चैत्राची चाहूल लागताच कुठे पक्षी गाऊ लागतात. भारतात काही लोक कोकीळ व्रतसुद्धा करतात! या व्रतामध्ये लोक कोकीळ पक्ष्याचा आवाज ऐकल्यावरच अन्नग्रहण करतात.
कोकिळा गाते असे आपण म्हणतो; परंतु प्रत्यक्षात कोकिळेला जातात येत नाही. ती फक्त तोंडाने ‘किक किक किक’ असाच आवाज काढू शकते. सुरावटी छेडणारा पक्षी असतो तो नर पक्षी किंवा कोकीळ पक्षी. हे पक्षी मूळचे सिंगापूरचे आहेत; परंतु अनेक वर्षांपूर्वी स्थलांतर करून ते भारतातच स्थायिक झालेले आहेत. एप्रिल-मे महिन्यांत त्यांचा विणीचा हंगाम असतो, तेव्हा ते एकमेकांना सिनेमातल्या प्रेमीयुगुलांसारखे साथ देत असतात. त्यालाच आपण कोकीळ पक्षी गातो, असे म्हणतो. वर्षाच्या इतर ऋतूंमध्ये हे पक्षी परिसरात असतात; परंतु ते शांत असतात. जेणेकरून त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. असे इतर अनेक पक्षी असतात, जे फक्त विणीच्या हंगामातच सुरावट छेडून गातात.
कोकीळ कुळातला आणखी एक पक्षी आहे ‘पावशा’ नावाचा. त्याचे इंग्लिश नाव common hawk cuckoo आहे; परंतु याची पाऊस जवळ आला की, गाण्याची सवय लोकांना आहे. त्यामुळे याला ‘पावशा’ असे नाव पडले आहे. ‘पाऊस आला पाऊस आला’ असे जेव्हा तो सतत बोलू लागतो आणि मग पावसाळा सुरू होतो, असे महाराष्ट्रात लोक मानतात; परंतु बंगाली लोक मात्र या पक्ष्याला ‘पपिहा’ म्हणतात. कारण, हा सुरेल ताना घेत गात असतो, तेव्हा तो ‘प पी हा प पी हा प पी हा’ बोलतोय, असे वाटते, तर ब्रिटिश लोक याला ब्रेन फीवर बर्ड, असेही म्हणतात. त्यांना याचा आवाज आल्यावर हा पक्षी ‘ब्रेन फीवर ब्रेन फीवर’ असे बोलतोय, असे वाटते.
मे महिन्यात उन्हाची काहिली वाढली आणि पावसाळा जवळ येऊ लागला की, काही सुंदर पक्षी भारतात स्थलांतर करतात. माणसांसारखीच, संपूर्ण सृष्टी, त्यातले पशुपक्षी, कीटक इत्यादी पावसाची वाट पाहत असतात. कवी कालिदासाने चातक नावाच्या पक्ष्याचा उल्लेख प्रेमिकांची व्याकुळता दर्शवण्यासाठी केला आहे. संस्कृत साहित्यात आणि संस्कृतेतर इतर भारतीय भाषेतील साहित्यात ही परंपरा सुरू राहिली असून चातक पक्षी खूप गौरवण्यात आला आहे. चातकाला एकापेक्षा एक सुंदर उपमा देऊन कवींनी त्यावर काव्य लिहिली आहेत. कवी कल्पना अशीही आहे की, चातक फक्त पावसाचे पाणी पिऊन जगतो किंवा तो पावसाचा पहिला थेंब प्राशन करून उपवास सोडतो; परंतु चातक हासुद्धा इतर पक्ष्यांसारखेच पावसाचे किंवा इतर पाणथळ जागेतले पाणी पितो. हा पक्षी सुद्धा कोकिळेच्या कुळातला आहे व त्याचे इंग्लिश नाव आहे जेकबिन कुकू! (Jacobin cuckoo). काळा-पांढऱ्या रंगाचा हा पक्षी मूळ आफ्रिकेचा आहे. भारतात तो पावसाळ्यापूर्वी दाखल झाला की, पाऊस आता केव्हाही पडणार, असे आनंदाचे वातावरण तयार होते. हिवाळ्यात हा पक्षी पुन्हा आफ्रिकेत परत जातो.
माझ्या पीएचडीच्या अभ्यास करण्याच्या कालखंडात मला अनेक वेळा हा पक्षी भांडुप पम्पिंग स्टेशन इथल्या जंगलात दिसलेला आहे. पहिल्यांदा हा पक्षी बघितला, तेव्हा मी भान हरपून खूप वेळ हा पक्षी निरखत राहिले होते आणि चातक पक्षी बघितल्याचं समाधान आणि निखळ आनंद आजही माझ्याकडे पुरून राहिलेला आहे. या पक्ष्याच्या डोक्यावर टोकदार तुरा असतो, त्यामुळे लांबून पाहिल्यावर कदाचित हा पक्षी आकाशाकडे चोच उघडी ठेवून पावसाची वाट बघतो, असेही वाटू शकते आणि त्यामुळे तशी आख्यायिका जनमानसांत पसरली असावी.
हे सर्व पक्षी पुरातन असून आपल्याला दाट झाडांमध्ये सहज दिसतात किंवा त्यांचे आवाज ऐकू येतात. त्यामुळे उन्हाळ्यात फक्त कावळे, मैना, घारी इत्यादी पक्षी दिसतात, असे जर का वाटत असेल, तर नक्की या पक्ष्यांचा शोध घ्या तुमच्या आजूबाजूच्या परिसरात.
विविध स्थलांतरित पक्ष्यांची माहिती लोकांना व्हावी यासाठी स्थलांतरित पक्ष्यांचा दिवस साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने जनमानसांत पक्ष्यांविषयी आणि त्यांच्या स्थलांतराविषयी जागरूकता, कुतुहल निर्माण होते आणि ज्ञानात भर पडते. या पक्ष्यांचे संवर्धन करण्याची भावनासुद्धा निर्माण होते. तसेच काही पक्षी शिकार करून मारण्यात येतात, काहींना पाणथळ जागा न मिळाल्यामुळे तहानेने रानगंगावा लागतो, तर काहींना इतर हवामानात घडणाऱ्या बदलामुळे त्रास होतो. यासाठी या पक्ष्यांचे संवर्धन करायचे, तर पाणथळ जागाही राखणे आवश्यक आहे. पक्ष्यांची शिकार न करण्याबद्दल जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. या पक्ष्यांचे भारतात अतिथी देवो भव म्हणत केलेले स्वागत आहे. पांढरा भागातला प्रदूषण आणि कचरा टाकणे इत्यादी थांबवणे खूप जिकरीचे आहे अन्यथा या पक्ष्यांची संख्या रोडावत जाईल.