बालासोर : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ दोन नव्हे तर तीन ट्रेन धडकल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तीनशेहून अधिक प्रवासी जखमी झाले असून आतापर्यंत ७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
काल, शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास मालगाडी आणि कोरोमंडल एक्स्प्रेस या दोन गाड्या एकाच रुळावर आल्या आणि त्यांची भीषण टक्कर झाली. या अपघातात शालिमार- चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे दहा ते बारा डबे बालेश्वरजवळ घसरल्यानंतर ते शेजारील ट्रॅकवर कोसळले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी यशवंतपूर ते हावडा ही गाडी कोरोमंडल एक्स्प्रेसच्या पडलेल्या डब्यांवर आदळली. त्यामुळे या गाडीचे देखील तीन ते चार डबे घसरल्याचे रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले.
या घटनेत ३५० हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींची संख्या अधिक असल्याने अनेक जणांना बसमधून रुग्णालयात नेल्याचे समजते. दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून मुख्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत असे म्हटले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी महसूलमंत्री प्रमिला मलिक यांना तातडीने घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेतील पीडित व्यक्तींच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या संपर्कात राहून बचावकार्यावर लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले.
ओडिशाचे मुख्यमंत्री यांनी अपघाताच्या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली असून उद्या ते घटनास्थळी भेट देणार आहेत.
आता एकाच रुळावर दोन गाड्या कशा येतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामागचे मुख्य कारण काय समोर आले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण आहे की, रेल्वेचे अनेक डब्बे अक्षरशः कापले गेले आहेत. दोन एक्सप्रेस आणि एक मालगाडी अशा तीन गाड्यांमध्ये हा अपघात झाला आहे. सुरुवातीला एक ट्रेन रुळावरुन घसरली त्यानंतर त्यावर दुसरी गाडी आदळली आणि त्यांना दुसऱ्या रुळावरुन धावणारी मालगाडी धडकली, अशी माहिती ओडिशाच्या मुख्य सचिवांनी दिली.
एका रुळावर दोन गाड्या कशा येतात...
यामागे दोन कारणे आहेत. पहिली मानवी चूक आणि दुसरी तांत्रिक चूक. या अपघातामागे तांत्रिक बिघाड असल्याचे अद्याप मानले जात आहे. सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने दोन गाड्या एकाच रुळावर आल्या आणि त्यांची टक्कर झाली. वास्तविक, ड्रायव्हर कंट्रोल रूमच्या सूचनेनुसार ट्रेन चालवतो आणि ट्रॅकवरील ट्रॅफिक पाहून कंट्रोल रूमकडून सूचना दिल्या जातात. यासाठी प्रत्येक रेल्वे कंट्रोल रूममध्ये एक मोठा डिस्प्ले बसवलेला असतो. त्या डिस्प्लेवर कोणत्या ट्रॅकवर ट्रेन आहे आणि कोणता ट्रॅक रिकामा आहे हे दिसते. हे हिरव्या आणि लाल रंगाच्या दिव्यांद्वारे दाखवले जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या ट्रॅकवर ट्रेन धावत असेल तर ती लाल दर्शवेल आणि जो ट्रॅक रिकामा असेल तो हिरवा दर्शवेल. हे पाहून नियंत्रण कक्षाकडून लोको पायलटला सूचना दिल्या जातात. मात्र यावेळी या अपघाताची गंभीरता पाहून वाटते की डिस्प्लेवर ट्रेनचा सिग्नल बरोबर दाखवला गेला नाही आणि त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला.