Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकसोटीचा दादा कोण?

कसोटीचा दादा कोण?

दखल : श्रीशा वागळे

आयपीएलचं धुमशान संपलं. अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या अंतिम फेरीच्या सामन्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडत चेन्नई सुपरकिंग्जने पाचवं आयपीएल विजेतेपद पटकावलं. यंदाच्या आयपीएलमध्ये दोनशेहून अधिक धावांचं लक्ष्य सहज गाठलं गेलं. नवे पायंडे पडले. आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये रंगत आहे. कसोटीतला दादा कोण हे त्यातून ठरणार आहे.

आयपीएलचा सोळावा हंगाम धुमधडाक्यात संपन्न झाला. चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलचं पाचवं विजेतेपद पटकावत मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली. कोरोनामुळे आयपीएलच्या मागील तीन हंगामांची रंगत काहीशी फिकी होती. यंदा मात्र आयपीएल जुन्या जोशात परतली. वेगवेगळ्या शहरांमध्ये सामन्यांचं आयोजन झाल्यामुळे प्रेक्षकांमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात प्रेक्षकांची गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातल्या सामन्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात अहमदाबादपासून झाली होती. योगायोग म्हणजे अहमदाबादच्या त्याच मैदानात अंतिम सामन्यात हेच दोन संघ आमने-सामने आले. पावसामुळे रविवारी सामना होऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारच्या राखीव दिवसाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. गुजरातचा डाव संपल्यानंतर पावसाला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. मात्र पावसाने उघडीप दिली आणि खेळ सुरू झाला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्याचं पारडं दोन्ही बाजूंनी झुकत होतं. अखेरच्या षट्कातल्या अखेरच्या दोन चेंडूंवर रवींद्र जडेजाने षट्कार आणि चौकार लगावत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विजयी चौकारानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीही भावनाविवश झाल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या स्पर्धेत गुजरात आणि चेन्नई या दोन्ही संघांनी सातत्यपूर्ण कामगिरीची नोंद केली आणि अंतिम फेरी गाठली. ‘प्ले ऑफ’च्या पहिल्या सामन्यात हेच दोन संघ एकत्र आले होते. त्यावेळी चेन्नईने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यातही धोनीचा संघ हार्दिक पंड्याच्या गुजरातवर भारी पडला.

यंदाच्या आयपीएलमध्ये चौकार, षट्कारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. स्पर्धेतल्या दहा संघांना प्रत्येकी चौदा सामने खेळण्याची संधी मिळाली. बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी यंदा प्रचंड चुरस पाहायला मिळाली. अखेरच्या साखळी सामन्यांपर्यंत बाद फेरीतले संघ निश्चित होत नव्हते. यंदाच्या स्पर्धेत क्रिकेटच्या बेभरवशीपणाची पुरेपूर प्रचिती आली. स्पर्धेतले अनेक सामने अखेरच्या षटकापर्यंत रंगले. २०० हून अधिक धावांचं लक्ष्यही बरेचदा गाठलं गेलं. त्यामुळे येत्या काळात टी-२० सामन्यांमध्ये २०० धावाही अपुऱ्या पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आयपीएल स्पर्धेत भविष्याची चुणूक दिसली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. यंदाच्या स्पर्धेत युवा खेळाडूंचे जलवे पाहायला मिळाले. याआधी फारशी माहीत नसलेली नावंही चांगलीच चमकली. परदेशी खेळाडूंनीही दमदार कामगिरीची नोंद केली. शुभमन गिलसाठी ही स्पर्धा अविस्मरणीय ठरली. शुभमनने दे दणादण फलंदाजी करत स्पर्धेत तीन शतकं झळकावली. त्याच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे गुजरात टायटन्सचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास सुकर ठरला. शुभमन गिलला रोखणं भल्याभल्यांना जमलं नाही. भारतीय क्रिकेटमधल्या या उगवत्या ताऱ्याने या हंगामात तब्बल ८९० धावांची लयलूट केली. आयपीएलच्या एका हंगामात ८०० हून अधिक धावा करणारा तो विराट कोहलीनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज तर एकूण चौथा फलंदाज ठरला. विराट कोहलीच्या एका हंगामातल्या ९०० धावांची बरोबरी करायला शुभमनला फक्त दहा धावा कमी पडल्या.

यशस्वी जयस्वाललाही ही स्पर्धा बरंच काही देऊन गेली. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या यशस्वीने या हंगामात ६२५ धावा केल्या. यशस्वीने हंगामात एक शतक आणि पाच अर्धशतकं झळकावली. एके काळी मुंबईत पाणीपुरी विकणाऱ्या यशस्वीने वानखेडे स्टेडियमवर शतक झळकावलं. यशस्वीही येत्या काळात भारतीय संघात दिसू शकतो. यंदा चमकलेलं अजून एक नाव म्हणजे रिंकू सिंह. रिंकू गेली काही वर्षं आयपीएलमध्ये खेळत असला तरी यंदा त्याने चांगलाच दम दाखवला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या पाच चेंडूत २८ धावांची गरज असताना रिंकूची बॅट तळपली. त्याने पाच षट्कार ठोकले. या कामगिरीनंतर रिंकू सिंह हे नाव घरोघरी पोहोचलं. यानंतरही रिंकूने चमकदार कामगिरी केली. अखेरच्या षटकांमध्ये जबरदस्त फलंदाजी करत त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आपण काय चीज आहोत, हे त्याने सगळ्यांना दाखवून दिलं. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी रिंकूने ही कामगिरी करून दाखवली. या हंगामात रिंकूने १४ सामन्यांमध्ये ४७४ धावा कुटल्या. अखेरच्या षट्कांमध्ये चौकार, षट्कारांची लयलूट करून संघाला जिंकून देण्याचं कसब रिंकूकडे आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. यासोबतच फॅफ ड्यू फ्लेसिस, अजिंक्य रहाणे, पीयूष चावला या जुन्या-जाणत्या खेळाडूंनीही आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा हे स्टार गोलंदाज ठरले.

आयपीएलच्या थरारनंतर आता चर्चा सुरू आहे ती कसोटी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. इंग्लंडच्या ओव्हल मैदानात ७ ते ११ जून या काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव करत कसोटीचं अजिंक्यपद पटकावलं होतं. यंदा मात्र भारताला ऑस्ट्रेलियावर मात करण्याची नामी संधी आहे. आयपीएल खेळलेल्या आणि कसोटी संघात स्थान मिळवलेल्या भारतीय खेळाडूंना टी-२० मोडमधून बाहेर पडून कसोटीच्या रंगात रंगावं लागणार आहे. चौकार, षट्कारांऐवजी आता खेळपट्टीवर उभं राहून टिच्चून खेळावं लागणार आहे. भारताचे काही खेळाडू इंग्लंडमध्ये वेळेत दाखल झाले आणि सरावाला सुरुवात केली. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नेहमीच वेगळी ठस्सन पाहायला मिळते. या दोन संघातले कसोटी सामने चांगलेच रंगतात. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली आहे. म्हणूनच अन्य संघांसमोर दादागिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ हल्ली भारताला थोडा वचकून असतो. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यावर भारताच्या फलंदाजीची मदार असेल. रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांची साथ त्यांना मिळू शकते. शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट यांच्यावर जलदगती गोलंदाजीचा भार असेल. यशस्वी जयस्वाल, मुकेशकुमार आणि सूर्यकुमार यादव राखीव खेळाडू असतील.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात भारतीय संघाने चांगल्या कामगिरीची नोंद केली आहे. या काळात खेळलेल्या १८ सामन्यांपैकी १० सामने टीम इंडियाने जिंकले. कसोटी गुणतालिकेत पहिल्या स्थानी राहिलेल्या ऑस्ट्रेलियानेही नऊ कसोटी सामने जिंकले. भारताच्या तुलनेत दोन सामने कमी हरल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी राहिला. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ दुसऱ्यांदाच आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत समोरासमोर आले आहेत. याआधी २००३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत हे संघ खेळले होते. त्यानंतर आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांचा सामना होणार आहे. यंदा भारतीय संघाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मागील हंगामातील अंतिम सामन्यातल्या चुका टाळून टीम इंडिया सर्वोत्तम कामगिरीची नोंद करेल, असं जाणकाराचं म्हणणं आहे. मधल्या काळात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात घरात हरवलं. शिवाय भारतीय भूमीवरही ऑस्ट्रेलियाला जिंकता आलेलं नाही. रोहित शर्माच्या संघाने ऑस्ट्रेलियावर २-१ ने विजय मिळवला होता. बॉर्डर-गावस्कर चषकावर सध्या टीम इंडियाचा कब्जा आहे. त्यामुळे अंतिम फेरीतही टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर कुरघोडी करेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. टीम इंडियातल्या प्रत्येक खेळाडूने लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर कसोटी अजिंक्यपद निश्चितच दूर नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -