जातीय हिंसाचारात ८० जणांचा मृत्यू
इंफाळ : मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार अद्यापही सुरूच आहे. विविध संघटनांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भेटले, शांततेचे आवाहन केले. तरीही गेल्या चार दिवसांपासून कुकी व मैतई समूहातील हिंसक संघर्ष सुरूच आहे. या जातीय हिंसाचारात आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नागा, कुकी, मैतेई समुदायाचे लोक होते. राज्य सरकार मृतांना नक्षलवादी संबोधत आहे. ते केंद्रीय सुरक्षा दलावरही सशस्त्र लक्ष्य करत आहेत. या भागात दहशतीचे वातावरण दिसत असल्यामुळे शेकडो परिवार आपले जीव वाचवण्यासाठी वनात दडून बसत आहेत.
मंगळवारी रात्री कंग्पोक्सी जिल्ह्याच्या सीमेवर लिटनपॉक्सी गावात सुरक्षा दलांवर उपद्रवी गटांनी अनेक हल्ले केले. प्रत्युत्तराच्या कारवाईत अनेक हल्लेखोरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दल म्हणाले, हल्लेखोरांनी अनेक ठिकाणी स्नायपर रायफलचाही वापर केला.
सुरक्षा दलांवर हल्ले करण्यापूर्वी हल्लेखोरांनी लिटनपॉक्पी गावात राखणदारी करणाऱ्या गावकऱ्यांच्या समुहावरही बेछूट गोळीबार केला. दहशत असल्याने या गावात सशस्त्र लोक रात्री स्वत:चे संरक्षण करू लागले आहेत.
३ मेपासून सुरु असलेल्या या जातीय हिंसाचारानंतर आतापर्यंत या बंडखोर गटांनी शेकडो लोकांची घरे पेटवून दिली. बहुतांश हल्ल्यामागे कुकी समुदायाच्या सशस्त्र गटाचा हात असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, अनेक संघटनांशी चर्चा केल्यानंतर अमित शाह म्हणाले, केंद्र सरकारकडून मणिपूरचे सार्वभौमत्व व एकतेचे संरक्षण करण्यास प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी जातीय आधारावर वेगळ्या प्रशासनाचा प्रश्नच निर्माण होत नाही. तीन महिन्यांपूर्वीच आसाम, नागालँड, मणिपूरमध्ये समितीची स्थापना केली होती. म्हणूनच एनआरसी लवकरच लागू होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी म्यानमार सीमेजवळी टेंग्नोउपाल जिल्ह्यातील मोरेह भागात पोहोचले. तेथे त्यांनी कुकी नागरिक संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली. शांततेचे आवाहन केले. त्याशिवाय नेपाली गोरखा समाज, मणिपुरी मुस्लिम कौन्सिल, हिल ट्रायबल कौन्सिल, मोरेह यूथ क्लब, कुकी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीशीही चर्चा केली.