२ हजार रुपये कोणी घ्यायचे यावरुन ‘या’ राज्यात पेटला सासू-सुनेचा वाद
बंगळुरु : कर्नाटकात नव्याने निवडून आलेल्या सिद्धरामय्या यांच्या काँग्रेस सरकारने मागचापुढचा विचार न करता दिलेले वचन तातडीने पूर्ण करण्याच्या हेतूने राज्यात ‘गृहलक्ष्मी’ योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत कुटुंबप्रमुखाला महिन्याला २,००० रुपये दिले जाणार आहेत. मात्र, या प्रस्तावित योजनेमुळे अनेक कुटुंबांमध्ये ‘सासू आणि सून’ यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. सरकारकडून मिळणारे हे पैसे कुणाला मिळावेत, यावरू हा वाद होत आहे.
घरातील कुटुंब प्रमुख म्हणून सासूला हे २००० रुपये मिळणार, हे समजल्यानंतर, सुना भांडण करत आहेत. एवढेच नाही, तर आता अनेक सूनांनी सासूपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
विभक्त झाल्यानंतर त्याही त्यांच्या कुटुंबाच्या प्रमुख होतील आणि मग त्यांनाही महिन्याला २००० रुपयांचा लाभ मिळेल, असे त्यांना वाटते. याशिवाय, काही सुना सासूला मिळणाऱ्या पैशांपैकी अर्धे पैसे मिळावेत यावर आडून बसल्या आहेत.
यासंदर्भात मंत्र्यांमध्येही वेगवेगळी मतं व्यक्त केली जात असल्याने आता आज होणा-या मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत यावर नियम आणि अटींबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे.