नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जागतिक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवणार
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): मागील १० वर्षाच्या कार्यकाळात भारतात मोठे बदल झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जागतिक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवण्याकडे वाटचाल करत असल्याचे अमेरिकन ब्रोकरेज कंपनी ‘मॉर्गन स्टॅनली’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. या अहवालानुसार, भारत हा आशिया आणि जगाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज आहे.
‘इंडिया इक्विटी स्ट्रॅटेजी अँड इकॉनॉमिक्स: हाऊ इंडिया हॅज ट्रान्सफॉर्म्ड इन लेस दॅन डीकेड’ या शीर्षकाने अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. आगामी दशकभराच्या काळात भारत हा जागतिक विकासातील पाचवा हिस्सा राहणार असल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
२०१४ पासून पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रमुख बदलांची यादी करताना, मॉर्गेन स्टॅनलीने आपल्या अहवालात म्हटले की,
- भारतातील कॉर्पोरेट कर दर इतर देशांच्या बरोबरीने आणला गेला आहे. याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढत आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात सातत्याने वाढ होत आहे.
- तसेच, सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) टक्केवारीनुसार डिजिटल व्यवहार वाढत आहेत, जे अर्थव्यवस्था सुव्यवस्थित होण्याचे लक्षण आहे, असे मॉर्गेन स्टॅनलीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- भारत या दशकाच्या अखेरपर्यंत जागतिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असून जीडीपी आणि उत्पादनातील वाढ ही भारताच्या जमेची बाजू असणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
- भारताची निर्यात बाजारपेठेतला हिस्सा दुप्पट होणार असल्याचा अंदाज आहे. भारताचा निर्यात बाजार हिस्सा हा २०३१ पर्यंत ४.५ टक्के इतका होण्याची शक्यता आहे. वर्ष २०२१ च्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दोन पट अधिक आहे.
- भारतात प्रति व्यक्ती उत्पन्न २ हजार २०० डॉलर प्रति वर्ष आहे. प्रति वर्ष उत्पन्न २०३२ मध्ये जवळपास ५ हजार २०० डॉलर प्रति वर्ष इतकं होणार असल्याच अंदाज आहे.