Friday, January 17, 2025
Homeदेशमोदींच्या हस्ते राम लल्लांची स्थापना, देशभरात ७ दिवस उत्सव

मोदींच्या हस्ते राम लल्लांची स्थापना, देशभरात ७ दिवस उत्सव

अयोध्यानगरी: अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्री राम मंदिरात येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी २६ जानेवारी पर्यंत संभाव्य तारीख निश्चित होईल असे राम मंदीर ट्रस्टचे म्हणने आहे. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सव देशभरात ७ दिवस साजरा केला जाईल.

या प्रकरणी जाणकारांशी चर्चा सुरू असल्याची माहिती ट्रस्टच्या बैठकीनंतर सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. ते म्हणाले, राम मंदिराच्या तळमजल्याचे ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. तळमजला व गर्भगृहाचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर प्राणप्रतिष्ठेची तयारी केली जाईल. पंतप्रधानांना डिसेंबर ते २६ जानेवारी २०२४ पर्यंतच्या कार्यक्रमाची संभाव्य तारीख सांगितली जाईल.

ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका तयार करतील. त्यावर महंत नृत्य गोपाल दास स्वाक्षरी करणार आहेत. ती पत्रिका पंतप्रधानांकडे पाठवली जाईल. देशभरात ७ दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी संत-धर्माचार्यांना आवाहन करण्यात येणार आहे. त्यांना आपापल्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरी करण्याची विनंती केली जाईल.

मकरानाच्या संगमरवराने सजेल तळमजला

चंपत राय म्हणाले, राम मंदिराचा तळमजला मकरानाच्या संगमरवराने सजवला जाईल. जमिनीवर मार्बल टाकण्याचे काम एक-दोन दिवसांत सुरू होईल. राम मंदिराच्या गर्भगृहात कोरीव दगड बसवले जाणार आहेत.

श्रीरामाच्या ३ मूर्ती बनवण्याचे काम सुरू

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी रामललाच्या ३ मूर्ती तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. रामलल्लाच्या डोक्यावर मुकुट व हातात धनुष्यबाण असेल. त्यासाठी कर्नाटकातील २ काळे दगड आणि राजस्थानचे पांढरे संगमरवर वापरले जात आहेत. मात्र, यापैकी कोणती मूर्ती गर्भगृहासाठी निवडली जाईल, हे अद्याप निश्चित झाले नाही.

२ जून रोजी मूर्तींसंबंधीची घोषणा

२ जून रोजी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांचा जन्मोत्सव आहे. या जन्मोत्सवात राम मंदिराचे विश्वस्त आणि देशभरातील संत संमेलनात सहभागी होणार आहेत. ट्रस्टच्या बैठकीत रामलल्लांच्या मूर्तीवर एकमत झाल्यानंतर त्याची घोषणा संत संमेलनात केली जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -