Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीगाढविणीच्या चमचाभर दुधासाठी मोजावे लागतात तब्बल १०० रूपये

गाढविणीच्या चमचाभर दुधासाठी मोजावे लागतात तब्बल १०० रूपये

अनेक आजारांवर गुणकारी अशा या दुधाला मोठी मागणी

उस्मानाबाद : गाढविणीच्या चमचाभर दुधाची किंमत तब्बल श्ंभर रुपये ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना? पण उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग आणि उमरगा परिसरात गाढविणीचे दूध शंभर रुपयाला १० मिली या दराने विकले जाते. या परिसरातील दहा व्यावसायिक सध्या गाढविणीच्या दुधाची घरोघरी जावून विक्री करत आहेत. या दुधातील आरोग्यविषयक गुणधर्म, फायदे आणि दुर्मिळता या गोष्टींमुळे हे दूध दहा हजार रुपये प्रतिलीटरने विकले जाते. राज्यात अनेक ठिकाणी याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.

एक गाढवीण दररोज साधारण पाव लीटर दूध देते. राज्यात ३५ हजार गाढवे आहेत. प्रति दिवस एक गाढवीण २५० ते ३०० ग्राम दूध देते, असे निरीक्षणातून समोर आले आहे. या दुधाचा व्यवसाय करणारे नांदेड जिल्ह्यातील व्यावसायिक सध्या १५ गाढविणींसह नळदुर्ग, उमरगा शहरात दाखल झाले आहेत. या परिसरात गाढविणीचे साधारण ४,५०० रुपये ते ५,००० रुपयांचे दूध विकले जाते. तर शहरात फिरल्यानंतर एका व्यावसायिकाचे ३००-४०० रुपयांचे दूध विकले जाते.

गाढविणीच्या दुधाची ही पद्धती आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये रूढ आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी आहे. या राज्यांत गाढविणीचे दूध आठ हजार रुपये लिटर या भावाने विकले जाते असा दावा केला जातोय. आपल्याला गाय, म्हैस आणि बकरी यांचे दूध पिण्याची सवय असली तरी गाढविणीच्या दुधालाही मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.

गाढविणीचे दूध अनेक आजारांवर गुणकारी समजले जाते. यामुळे सर्दी, खोकला, कफ. न्यूमोनिया असे आजार होत नाहीत. पूर्वीच्या काळी लहान मुलांना सर्दी, पडसे असे आजार होऊ नयेत व झाल्यास उपचार म्हणून गाढविणीचे दूध पाजले जायचे. गाढविणीच्या दुधाचे सेवन केल्याने मानवी शरीरात सायटो कायनिन नावाचा महत्त्वाचा घटक वाढतो ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली होते. शिवाय या दुधात ‘ड’ जीवनसत्व असते ज्याचा फायदा अर्थरायटीस आजारांच्या रुग्णांना होतो, अशी माहिती परभणीच्या पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयातील पशुजन्य पदार्थ प्रक्रिया विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. संदीप रिंढे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -