आयसीसीचे अधिकारी पोहचले पाकिस्तानात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागासाठी आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून हमी घेणार आहे. त्याकरिता आयसीसीचे अधिकारी पाकिस्तानात पोहोचले आहेत.
एकदिवसीय विश्वचषक ५ ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे. आयसीसी अधिकाऱ्यांचा लाहोर दौरा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांच्या वक्तव्यानंतर झाला आहे. जर टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात येणार नसेल, तर पाकिस्तानही विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही, असे पीसीबी अध्यक्षांनी म्हटले आहे. नजम सेठी यांच्या या वक्तव्यानंतर आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले आणि सीईओ ज्योफ अलर्डिस लाहोरला गेले आहेत आणि त्यांना पीसीबीकडून वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी लेखी हमी हवी आहे.
विश्वचषकापूर्वी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात आशिया चषक स्पर्धा होणार आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत आशिया चषक तटस्थ ठिकाणी किंवा अन्य कुठल्यातरी देशात आयोजित करण्याची चर्चा आहे. मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेकडून अद्याप कोणतेही स्पष्ट वक्तव्य आलेले नाही.