Wednesday, July 17, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआवरा रागाला, सावरा जीवाला!

आवरा रागाला, सावरा जीवाला!

  • फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

सातत्याने कोणत्याही गोष्टीचा राग येणे, सतत चिडचिड होणे, संताप होणे, आरडाओरडा करणे, आदळआपट करणे, अर्वाच्य भाषा वापरत राहणे आणि आजूबाजूच्या कोणाचाही, कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता छोट्या छोट्या गोष्टींचा मोठा तमाशा करणे, रणकंदन करणे, इतरांवर हुकूमत गाजवणे, आपली दहशत निर्माण करणे या सवयी असलेली माणसं स्वतःला फार कडक, शिस्तीची, काटेकोर, जराही स्वतःच्या मनाविरुद्ध खपवून न घेणारी, कोणाला न घाबरणारी, खूप खतरनाक असे दाखवत असतात. सतत इतरांना, घरातल्या लोकांनासुद्धा धमक्या देत राहणे, धारेवर धरणे अशी विकृती अशा लोकांच्या स्वभावात असते.

अनेकदा या माणसांना हेच समजत नसते की हे आपले गुण नाहीत तर आपले असे वागणे, अशा सवयी हे आपले खूप मोठे दुर्गुण आहेत आणि अशा वागणुकीला कुटुंबात, समाजात शून्य किंमत असते. तुमचा राग, संताप, आततायी पणा तुमच्या दृष्टीने अगदी योग्य असला, रास्त असला, परिस्थितीला धरून असला तरी बहुतांश वेळा इतरांना त्याच काहीही घेणे-देणे नसते. एखादेवेळी, एखाद्या ठिकाणी खरंच काही गंभीर कारण असेल, तुमचं रागावणं, चिडणं योग्य असेल तर कोणी ते निमूटपणे ऐकून घेईल. वेळप्रसंगी तुमचे दोन शब्द ऐकून घेतले जातील. तुमच्यापुढे माघार घेतली जाईल यात शंका नाही. पण उगाच आणि सतत अशा पॅटर्नमध्ये तुम्ही वागलात तर कोणीही त्याला कवडीची किंमत देत नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

काही लोकांना ऊठसूठ स्वतःच महत्त्व वाढविण्यासाठी, इतरांपुढे स्वतःला खूप काहीतरी वेगळे सिद्ध करण्यासाठी, इतरांचे लक्ष वेधण्यासाठी सतत कोणत्याही विषयावर वाद घालण्याची, राईचा पर्वत करण्याची, विनाकारण इतरांच्या विरोधात जाण्याची, स्वतःच खरे करण्याची तसे न झाल्यास धिंगाणा घालण्याची सवय लागलेली असते. सतत कोणालाही, कोणत्याही विषयाला विरोध करत राहणे. सतत सगळ्यांशी दुश्मनी घेत राहणाऱ्या लोकांना अंगवळणी पडलेले असते. परत परत त्याच त्याच छोट्या मोठ्या गोष्टींवरून यांचा राग उफाळून येत असतो. अशा लोकांना राग यायला फारसे काही मोठे कारण पण लागत नाही. जरा काही मनाविरुद्ध घडले, बिनसले की असे लोक आत्मक्लेश करून घेतात आणि इतरांना पण प्रचंड मानसिक यातना देतात.

तोंडात सतत इतरांसाठी अपशब्द, अपमानास्पद बोलणं, मोठ्याने बोलणं, थयथयाट करणं अशा लोकांच्या अंगवळणी पडलेले असते. अशा लोकांना या सवयीमुळे, विचित्र स्वभावामुळे त्यांना स्वतःला अनेकदा खूप शारीरिक, मानसिक आजारांना सामोरं जावं लागतं हे त्यांच्या लक्षात येत नाही. अनेक मनोविकार, शारीरिक व्याधी या केवळ आपल्याला वेळोवेळी मनाचा तोल सांभाळता न आल्यामुळे उद्भवत असतात. दैनंदिन जीवनात सतत होणारा संताप, इतरांप्रति राग, द्वेष, उद्वेग, चिडचिड, तक्रार, सतत काहीतरी बिनसलेलं असणं, सारखं गैरसमज करून घेणं, सारखं इतरांकडूनही स्पष्टीकरण, समर्थन अपेक्षित असणं, सतत इतरांच्या वागण्याला, बोलण्याला कंट्रोल करत राहणं यामुळे स्वतःवरील कंट्रोल मात्र हरवलेला असतो.

आपल्या मनाचे समाधान आणि रागाचा निचरा होईपर्यंत धुसफूस करत राहणं, सतत चेहेऱ्यावर अति गंभीर अथवा रागीट भाव, सतत वाकडं तोंड यामुळे ही लोकं सतत अस्वस्थ असतात, सैरभैर असतात. काही झालं की हमरी-तुमरीवर येण्याचा स्वभाव, कायम रागीट चेहरा आणि सतत खोड्या काढायला, चुका काढायला कुठे वाव मिळतोय हे शोधणारी ही मंडळी स्वतःच्या आयुष्यातील आनंद गमावून बसतात. या लोकांमध्ये ठासून भरलेल्या नकारात्मक भावना आणि अतिरेकी वागणे इतरांना तर क्लेशकारक ठरतेच पण असं वागणारी व्यक्ती स्वतःला देखील खूप मोठी शिक्षा देत असते. पदोपदी फक्त आपलाच हुकूम चालला पाहिजे असा हटवादीपणा, फुकटचा रुबाब करण्याची वृत्ती आणि इतरांना तुच्छ लेखण्याची मानसिकता या लोकांना स्वस्थ बसू देत नाही. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा आनंद घेणे, इतरांना पण आनंद देणे, उत्साह देणे, सर्वांना सामावून घेणे, प्रेमाने बोलणे, समजुतीने घेणे यांच्या गावीही नसते. सतत रागात असलेली आणि गुरगूर करत राहणारी ही मंडळी इतरांसाठी खूप मोठी डोकेदुखी असते. आपण स्वतः जसे आहोत तसेच इतरांनी असावे, आपण सांगू तसंच सगळ्यांनी वागावे, आपल्यापुढे कोणाचं काहीच चाललं नाही पाहिजे अशा अटी-शर्तीवरच यांच्या आयुष्यातील बहुमोल, अनमोल वेळ यांनी वाया घालवलेला असतो. प्रचंड तापट स्वभाव, काहीही झालं तरी आवरा रागाला, सावरा जीवाला!

तुमचा राग, संताप, आततायीपणा तुमच्या दृष्टीने अगदी योग्य असला, रास्त असला, परिस्थितीला धरून असला तरी बहुतांश वेळा इतरांना त्याचे काहीही घेणे-देणे नसते. एखादेवेळी, एखाद्या ठिकाणी खरंच काही गंभीर कारण असेल, तुमचं रागावणे, चिडणे योग्य असेल, तर कोणी ते निमूटपणे ऐकून घेईल, समजावून पण घेईल, वेळप्रसंगी तुमचे दोन शब्द ऐकून घेतले जातील. तुमच्यापुढे माघार घेतली जाईल यात शंका नाही. पण उगाच आणि सतत अशा पॅटर्नमध्ये तुम्ही वागलात, तर कोणीही त्याला कवडीची किंमत देत नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

स्वतः कधी मनमोकळे, हसून-खेळून, प्रसन्न आणि समाधानी राहायचं नाही आणि इतरांना पण भंडावून सोडायचं या वृत्तीमुळे ही लोकं एकटी पडतात. यांची कटकट नको, यांचे सतत विचित्र बोलणं, ऐकणं नको आणि यांचा सहवास तर मुळीच नको या उद्देशाने जवळील, घरातील लोकं पण लांब राहतात. या लोकांना कोणाच्या चांगल्या सहवासाचा, एकत्र येण्याचा आनंद घेता येत नाही. कुठेही असो, कोणीही समोर असो, कसाही प्रसंग असो त्यात गांभीर्य असो किंवा मजा यांना यांच्या स्वभावापुढे सगळं नगण्य वाटतं असतं. पदोपदी फक्त आपलाच हुकूम चालला पाहिजे असा हटवादीपणा, फुकटचा रुबाब करण्याची वृत्ती आणि इतरांना तुच्छ लेखण्याची मानसिकता या लोकांना स्वस्थ बसू देत नाही. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा आनंद घेणे, इतरांना पण आनंद देणे, उत्साह देणे, सर्वांना सामावून घेणे, प्रेमाने बोलणे, समजुतीने घेणे यांच्या गावीही नसते. आपण पाहतो की अनेकदा अनेक गुन्हे, खून, मारामाऱ्या, कोणालाही जीवे मारण्याचा प्रयत्न, हिंसाचार, आत्महत्या या रागातून, पराकोटीच्या संतापातूनच घडत असतात. राग त्या मिनिटाचा असतो पण एखाद्याचे आयुष्य त्यामुळे कायमच उद्ध्वस्त होते. सतत रागात असलेली आणि गुरगूर करत राहणारी ही मंडळी इतरांसाठी खूप मोठी डोकेदुखी असते. आपण स्वतः जसे आहोत तसेच इतरांनी असावे, आपण सांगू तसंच सगळ्यांनी वागावे, आपल्यापुढे कोणाचं काहीच चाललं नाही पाहिजे अशा अटी-शर्तीवरच यांच्या आयुष्यातील बहुमोल, अनमोल वेळ यांनी वाया घालवलेला असतो. प्रचंड तापट स्वभाव, काहीही झालं तरी बदलायचा नाही, मोडायचं पण वाकायचं नाही हा अहंकार या लोकांना माणसातून उठवतो. त्यामुळे आपण असे असाल, तर स्वतःला ताबडतोब बदला आणि आपल्या आजूबाजूला कोणी असे असेल, तर त्याच्यापासून चार हात लांब राहा.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -