
अहमदाबाद : पावसामुळे अडकलेला चेन्नई सुपर किंग्ज व गुजरात टायटन्स या दोन तगड्या संघांमधील आयपीएलचा अंतिम सामना काल नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला आणि अखेरीस चेन्नईने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. महाविजेतेपद पटकावत धोनीच्या संघाने आयपीएलमध्ये पाचव्यांदा बाजी मारली आहे.
रविवारी पावसामुळे रद्द झालेला अंतिम सामना सोमवारी वेळेवर सुरू झाला. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये पावसाने गोंधळ घातल्याने जवळपास तीन तासांचा खेळ वाया गेला. पंचांनी दोन ते तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार चेन्नईला विजयासाठी १५ षटकात १७१ धावांचे नवीन टार्गेट देण्यात आले होते.
शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने कमालीची खेळी केली आणि चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नई संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. गुजरातकडून शेवटच्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी मोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. मोहितने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. यानंतरच्या तीन चेंडूंवर जडेजाने सलग एक-एक धाव काढली.
शेवटच्या चेंडूवर मात्र दमदार चौकार ठोकत चेन्नईनं अंतिम सामना जिंकला. एमएस धोनीसारख्या शैलीत खेळत त्याने शेवटच्या २ चेंडूत १० धावांची गरज असताना एक षटकार आणि एक चौकार मारून चेन्नई सुपर किंग्जला पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग जेतेपदावर नेले.