Saturday, October 25, 2025
Happy Diwali

वसई-विरार परिसर पावसाळ्यात तुंबण्याची शक्यता

वसई-विरार परिसर पावसाळ्यात तुंबण्याची शक्यता

वसई-विरार : एकीकडे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली नालेसफाईच्या कामांनी वेग धरला आहे. तर दुसरीकडे वसई-विरारसारख्या अनेक पावसाळापूर्व कामे पूर्ण होत नसल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या देखरेखीखाली नालेसफाईचे काम बर्‍यापैकी पूर्ण होत आलेले असले तरी कल्व्हर्ट, रस्त्यांची कामे तसेच अन्य कामे पावसाळा अगदी तोंडावर असताना अपूर्ण राहिल्याने वसई-विरारची तुंबई होऊ शकते.

महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून केवळ नालेसफाई नव्हे तर पाणी साचणा-या ठिकाणांचा सर्व्हे करून उपायोजना हाती घेतल्या आहेत.त्यात वसई ,एव्हरशाईन वालीव, चिंचपाडा सनसिटी गास चुळणे मार्ग , नालासोपारा येथील मार्ग तसेच विरार येथे सखल भाग असलेल्या रस्त्याना उंच केले जात आहे जेणेकरून पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होईल.

पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही तर शहरात पाणी साचते, सखल भागामुळे गृहसंकुलाना पाण्याचा वेढा निर्माण होतो, जनजीवन विस्कळीत होते, अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद होतात. त्यात वसई विरार शहरात १८७ किमी. लांबीचे एकूण १५० नाले आहेत. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात पावसाळी कामांसाठी एकूण १० कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने केली आहे.

वसई विरार शहरात अनेक रस्त्यांची दुरवस्था आहे पावसाळ्यात खड्यातून प्रवास करावा लागतो यावेळी अपघाताची शक्यता असते. त्यामुळे बांधकाम विभागाने निविदा काढून रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत जेणेकरून पावसाळ्यात वाहनांना सोईचे होणार आहे.

एव्हरशाईन येथील काम अंतिम टप्प्यात आले आहे तसेच गास चुळणे येथे रस्ता उंच केला असून खडीकरण काम केले जात आहे परंतु काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना अन्य महत्त्वाची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा