कॉलेजमधील ते दिवस मोरपंखी होते. आम्ही राजाराम कॉलेज, कोल्हापूरमध्ये बी.एस्सी.च्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला. बी.एस्सी. प्रथम वर्षाचा वर्ग पहिल्या मजल्यावर होता. वह्या, पेन सरसावून आम्ही अतिशय उत्सुकतेने आमच्या पहिल्या तासाची वाट पाहू लागलो. तेवढ्यात आमचे लक्ष वेधले ते शर्ट, पँट, हातात वही-पेन, केसांच्या छोट्या-छोट्या वेण्या घातलेल्या एका आफ्रिकन मुलीकडे. ती एकटीच एका रिकाम्या बाकावर शांत बसून राहिली. पहिले थोडे तास पार पडल्यानंतर मधल्या सुट्टीत हळूहळू इतर मुली उत्सुकतेने तिच्याशी येऊन बोलू लागल्या. ती आफ्रिकेतील इथिओपिया या देशातून शिक्षणासाठी भारतात आल्याचे तिने सांगितले.
कॉलेजपासून अंदाजे वीस-पंचवीस मिनिटांच्या अंतरावर तिने दोन खोल्यांचे घर भाड्याने घेतले होते. ‘अबेबा’ तिचे नाव. ती आमच्यात आता मिसळू लागली होती. ती सर्व तासांना लक्षपूर्वक नोट्स लिहून घेत असे. तिच्यासोबत बोलताना तिला एकूण सात भावंडे असल्याचे समजले. त्यातली दोन-तीन भावंडे अशीच परदेशात शिक्षणासाठी गेली होती. ओळख वाढत गेल्यावर अबेबाने आम्हाला तिच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. एका रविवारी संध्याकाळी आम्ही मैत्रिणी तिच्या घरी पोहोचलो. स्वच्छ, टापटीप असे तिचे घर होते. घराबाहेर कुंड्या ठेवून त्यात तिने विविध फुलझाडांची रोपे लावली होती. त्यांना ती नियमितपणे पाणी घालत असे. तिला भारत देश खूप आवडला होता. घरकामाला, साफसफाईसाठी तिने एक बाई देखील ठेवली होती. मग तिने त्यादिवशी आमच्यासाठी एक वेगळाच पदार्थ आणला. कोबी, बटाट्याची भाजी करून, ब्रेडचे टोस्ट खरपूस भाजून त्यात ती भाजी घालून टोमॅटो सॉससहित तिने आम्हाला टोस्ट खायला दिले. ब्लॅक टी हा अबेबाचा आवडता चहाचा प्रकार. तिने मैत्रिणींशी गप्पा करत ब्लॅक टी देखील बनविला. आम्हा मैत्रिणींना इथिओपिया या देशाबद्दल अनेक प्रश्न पडायचे. त्याची उत्तरे देणे अबेबाला खूप आवडायचे. “तुमची राष्ट्रीय भाषा कोणती?” एका मैत्रिणीने तिला विचारले.
“आम्हारिक ही आमची राष्ट्रीय भाषा आहे. आमच्या देशात एकूण नव्वद भाषा वापरल्या जातात.” अबेबा सांगायची, “आमचा देश कृषिप्रधान असून तेथील बहुतांशी लोक शेतीवर अवलंबून आहेत.” अबेबा म्हणाली की, त्यांच्या शिष्टाचाराच्या कल्पना अनेकदा भारतीय कल्पनांशी मिळत्या-जुळत्या आहेत. भारतात राहून इथल्या गोष्टी समजावून घेणे तिला कधी अवघड वाटले नाही. एकटीनेच बाजारहाट सांभाळणे, बँकेचे व्यवहार करणे, घरात आवश्यक त्या वस्तू आणणे हे ती आत्मविश्वासपूर्वक सांभाळत असे. तिच्याशी गप्पा-गोष्टी करून, आमच्या घरी येण्याचे निमंत्रण देऊन आम्ही तिचा निरोप घेतला. तो दिवस रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतील पहिला दिवस होता. आम्ही वेळेनुसार आमचे सर्व साहित्य, ॲप्रन घेऊन प्रयोगशाळेत पोहोचलो. पण तिथे अबेबाबाबत एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. प्रयोग करताना येणाऱ्या वेगवेगळ्या रसायनांच्या वास अबेबाला सहन होईना व अचानकपणे तिचा दंगा सुरू झाला. “ओह गॉड. फायर! स्मेल!!!.” तिच्या या दंग्याने रसायनशास्त्राचे प्राध्यापक, स्टाफ, विद्यार्थी आपापल्या हातातील कामे सोडून तिच्याकडे धावले.
प्राध्यापकांना देखील घाम फुटला. आम्ही मैत्रिणींनी तिला प्यायला पाणी दिले. थोडा वेळ बसायला सांगितले; परंतु हे तिचे कायमचे होऊन बसले. तिला रसायनांची एवढी भीती बसली की, पुढची कितीतरी वर्षे ती रसायनशास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेत नापास होत राहिली. जवळपास पदवीनंतर तीनेक वर्षांनी ती या प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण झाली. मात्र अशा गोष्टींसाठी रडत राहणे, स्वतःला त्रास करून घेणे तिच्या स्वभावातच नव्हते. रसायनांचा त्रास अबेबाला होत असेल, तरी नापास होण्याचा त्रास तिला झाला नाही. ती पूर्वीसारखीच आमच्याशी हसून-खेळून वागत असे. किंबहुना आम्हा मैत्रिणींनाच अबेबा रसायनशास्त्राची परीक्षा कधी पास होणार, असे होऊन जायचे. शेवटी एकदा हा प्रश्न सुटला. ते दिवस पावसाळ्याचे होते. एकदा अबेबाने हॉटेलात कुणाच्या तरी सांगण्यावरून साबुदाण्याची खिचडी मागविली. ती तिला खूप आवडली. तेव्हापासून ही खिचडी तिला घरी करून पाहायची होती. त्यासाठी तिने मला एका रविवारी सकाळी अंदाजे अकरा वाजण्याच्या सुमारास घरी बोलावले.
मी तिच्या घरी पोहोचले. तिच्या घरी तिची कामाची बाई मालती फरशी पुसून घेत होती. अबेबाने आदल्या दिवशी मला विचारून साबुदाणा भिजत घातला होता. अबेबाशी गप्पा करता करता मी साबुदाण्याची खिचडी करण्यास सुरुवात केली. तूप तापवून त्यात जिरे, मिरची घालून साबुदाणा परतवला. मीठ घातले. आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या की, खिचडी वाफवून लगेच खायला घेऊया असे म्हणून आम्ही तीन डिशेस व चमचे घेऊन खिचडी वाढली, वरती हिरवीगार कोथिंबीर व लिंबाची फोड. पहिली बशी अबेबाच्या कामवाल्या बाईला दिली. तिने कसेबसे दोन घास खाल्ले व माझ्यावर ओरडून म्हणाली, “ह्ये काय वो ताई? साबुदाण्याच्या खिचडीचा पाक गोळा केलाय. शेंगदाण्याचे कूट कोण घालणार?” तसे माझे डोळे चमकले. अबेबा देखील माझ्याकडे पाहू लागली. “आता काय करायचे? मला प्रश्न पडला. आता दोघी गप्प-गुमान खावा माझ्यासंगट!” असे म्हणून तिने आपली खिचडी खाण्यास सुरुवात केली. मग आम्ही तिघीही हसू लागलो व आपापली खिचडी संपविली. नंतर अबेबा कोल्हापूर शहर, इथले खाणे-पिणे, निसर्ग, शांत जीवन यांच्या प्रेमात पडली; परंतु तिचे पुढचे आयुष्य, भवितव्य तिला खुणावत होते. तिच्या देशात जाऊन विवाहबद्ध होण्याची तिची इच्छा होती. करिअर, नोकरी अशा गोष्टींची तिला फार इच्छा नव्हती. त्यामुळे तिने प्रेमपूर्वक आमचा, भारत देशाचा निरोप घेतला.
जाताना ती एवढेच म्हणाली, “इथल्या लोकांचे सहकार्य, तुमची सर्वांची मैत्री मी कधीच विसरू शकणार नाही. भारताची संस्कृती, सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती मी कायम लक्षात ठेवीन. इथल्या सुंदर आठवणींचा ठेवा मी घेऊन जात आहे”. आम्ही देखील अश्रूपूर्ण नयनांनी अबेबाचा निरोप घेतला. दुसऱ्या देशाच्या संस्कृतीत सहज मिसळून जाणे ही निश्चितच सोपी गोष्ट नव्हती. पण अबेबाने ती शक्य करून दाखविली. आपल्या निर्मळ स्वभावाचा सुगंधी फुलासारखा ठेवा आमच्यापाशी ठेवून ती मायदेशी परतली. अशा आमच्या मैत्रीचा ठेवा अत्तराच्या कुपीप्रमाणे आम्ही जपून ठेवला आहे. आयुष्यभरासाठी!
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला.…
नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे…
पंचांग आज मीती वैशाख शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी…
नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल…