सर्वांगीण विकासासाठी सेतू बांधा रे…

Share

कोणत्याही विभागाचा आणि तेथील समाजजीवनाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर दळणवळण आणि सहज-सोपी वाहतूक व्यवस्था उभी करणे ही काळाची गरज आहे. ही महत्त्वाची बाब ओळखून विकासपुरुष अशी ज्यांची ख्याती आहे, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेवर येताच देशभरात चांगले, भक्कम रस्ते, मोठमोठाले पूल, उड्डाणपूल यांच्यासह मूलभूत सोयी-सुविधांच्या उभारणीस सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यानुसार केंद्राच्या मार्गदर्शनाखाली बहुतेक सर्वच राज्यांमध्ये विकास प्रकल्प राबविण्यास प्रारंभ झाला. महाराष्ट्रातही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले. त्यापैकी अनेक प्रकल्प पूर्ण झाले, तर काहींचे काम अधुरेच राहिले. मधल्या काळात अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात आला. त्यावेळी राजकीय अभिनिवेश बाळगून काम केले गेल्याने अनेक प्रकल्प रखडले गेले. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन पुन्हा भाजप-शिवसेना युतीचे शिंदे-फडणवीस सरकार विराजमान झाले आणि रखडलेल्या विकासकामांनी गती घेतली. त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू या २२ किमीच्या मुंबई-पारबंदर प्रकल्पाच्या उभारणीने वेग घेतला आणि हा प्रकल्प आता दृष्टिक्षेपात येऊ लागला आहे.
मुंबई आणि नवी मुंबई या शहरांदरम्यान महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी मुंबई ट्रान्सहार्बर सी-लिंक बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलामुळे मुंबई शहरातील वाहतुकीचा बोजा व रहदारी, तर कमी होईलच. पण नवी मुंबईच्या विकासातही भर पडेल. सध्या मुंबईतून नवी मुंबईकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना मुंबई शहरातील रहदारीचे रस्ते पार करून जावे लागते. हा सी-लिंक तयार झाल्यानंतर, शिवडीहून थेट नवी मुंबईसाठी लोक उड्डाणपुलाचा वापर करू शकतील. ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूक आणि प्रवासाचा वेळही कमी होईल. हा प्रकल्प ३५ वर्षांपूर्वी आखण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात बांधकाम एप्रिल २०१८ मध्ये सुरू झाले.

मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ २० ते २२ मिनिटांत पार करता यावे, यासाठी बांधण्यात येत असलेला या प्रकल्पातील मुंबई ते मुख्य भूमी यांना जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे इंधनासोबतच मोठ्या प्रमाणात वेळही वाचणार आहे. तसेच पुढे हा प्रकल्प मुंबई-पुणे महामार्गाशी जोडला जाणार आहे. तिथे जवळच लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येईल. तिथे लोक येतील, राहतील आणि याचा लोकांना फायदा होईल, असा हा गेम चेंजिंग प्रकल्प आहे. मुंबई-पारबंदर प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी १६.५ किमी असून, जमिनीवरील पुलाची लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे. या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील शिवाजीनगर आणि राष्ट्रीय महामार्ग-४बवर चिर्ले गावाजवळ आंतरबदल आहेत. हा प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित नियोजन आहे.

या प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा भौतिक आणि आर्थिक विकास होणार आहे. यामुळे प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट यांच्यादरम्यान वेगवान दळणवळण होणार आहे. मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग यांच्यामधील अंतर सुमारे १५ किमीने कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि मौल्यवान अशा वेळेत सुमारे एक तासाची बचत होणार आहे. तसेच मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही या प्रकल्पाने मदत होणार आहे. मुंबई-पारबंदर प्रकल्प हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा आणि जगभरातील १०व्या क्रमांकाच्या लांबीचा पाण्यावरील पूल ठरणार आहे. विशेष म्हणजे, प्राधिकरणामार्फत प्रकल्प राबविताना प्रकल्पबाधितांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्यात आले असून प्रकल्पबाधित मच्छीमारांना शासनाच्या धोरणानुसार नुकसानभरपाई देण्यात आली आहे आणि देण्यात येतही आहे.

हा प्रकल्प केवळ मुंबईकरांसाठीच उपयुक्त आहे, असे नव्हे, तर नवी मुंबई, रायगड, पुणेकरांसाठीही तो फायद्याचा आहे. पुढे हा मार्ग पुण्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईसह इतरही जिल्ह्यातल्या नागरिकांना या प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिले जाईल. ट्रान्सहार्बर सी-लिंकची सुरुवात ज्या शिवडी जेट्टीपासून होत आहे, त्या ठिकाणी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’तर्फे दरवर्षी फ्लेमिंगो फेस्टिव्हल आयोजित केला जातो; परंतु या सी-लिंकच्या बांधकामामुळे २०१६ पासून हे फेस्टिव्हल आयोजित करणे शक्य झालेले नाही. खरं म्हणजे सी-लिंकच्या बांधकामामुळे निश्चितच फ्लेमिंगो आणि इतर पक्ष्यांचे काही प्रमाणात विस्थापन झाले आहे हे निश्चित; परंतु निसर्गाचा समतोल बिघडणार नाही, याचे भान हा प्रकल्प उभारताना घेण्यात आला आहे, हेही निश्चित.

मुंबईच्या कोस्टल रोडचा एक भाग म्हणून वरळी-शिवडी एलिव्हेटेड कॉरिडॉरचेही काम सुरू आहे. वरळी-शिवडी कॉरिडॉर, शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक आणि मुंबईचा कोस्टल रोड असे सर्व प्रकल्प मिळून मुंबईतील वाहतूक समस्या कमी होण्यास मदत होईल आणि त्यामुळे मुंबईच्या दुसऱ्या टोकाला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल आणि प्रवासाचा वेळही वाचेल. अशा प्रकारे सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘सेतू बांधा रे, बांधा रे…’ या गीतरामायणातील ओळींचे महत्त्व अधोरेखित होते.

Recent Posts

सक्शन पंपात बिघाड, कांदिवली तुंबली!

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…

14 mins ago

CM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…

36 mins ago

ST Bus : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प! जाणून घ्या एसटी बस कुठून व कधी सुटणार?

हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…

45 mins ago

Navi Mumbai news : धावत्या लोकलमधून महिला पडली! जीव वाचला पण गुडघ्यापासून दोन्ही पाय तुटले

मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…

1 hour ago

Mumbai Railway stations : मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाबत आज विधानपरिषदेत होणार महत्त्वाचा ठराव!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…

2 hours ago

Mumbai rain : मुसळधार पावसामुळे दुसर्‍या सत्रातही शाळा, महाविद्यालये बंद!

मुंबई महानगरपालिकेचा आदेश मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे.…

3 hours ago