Saturday, July 6, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकोकणात पर्यटक हाऊसफुल्ल...!

कोकणात पर्यटक हाऊसफुल्ल…!

  • माझे कोकण: संतोष वायंगणकर

कोकण म्हटलं की आंबा, कोकम, जांभूळ, करवंद ही जशी एक ओळख आहे, तशी कोकणात पर्यटनस्थळांचे सौंदर्य अलीकडे जगभरातील पर्यटकांना भुरळ घालीत आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात पर्यटनासाठी येत आहेत. अखंड कोकण हेच मुळी पर्यटनस्थळांची मांदियाळी आहे. प्रत्येक गाव हे विविध वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. यामुळे कोकणात येणारा पर्यटक खरं तर तो रेवसपासून रेडीपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर रमू शकतो, तसा तो अन्य पर्यटनस्थळांनाही भेटी देत तिथली वैशिष्ट्य अनुभवू शकतो. जीवाचा गोवा करण्यासाठी आलेला पर्यटक गोव्यातील पर्यटन केल्यावर त्याला खरा आनंद आणि समाधान कोकणात फिरल्यावर मिळते. याच कारणाने गोव्यात गेली अनेक वर्षे जाणीवपूर्वक पर्यटनस्थळे विकसित करण्यात आली आहेत. या विकसित करण्यात आलेल्या पर्यटनस्थळांचे मार्केटिंगही त्याच पद्धतीने होत राहिले. गोव्यात दारू स्वस्त मिळते म्हणून पर्यटक जातात. हे पर्यटक गोव्यात आकर्षित असल्याचे एक जसं कारण आहे, तशी अनेक कारणे आहेत. गोव्यातील जो मोकळेपणा आहे तो अन्यत्र कुठे मिळत नाही. अशा अनेक कारणांमुळेच गोव्याची अर्थव्यवस्था केवळ पर्यटनावर उभी राहू शकली. गोव्यात सत्तेवर आलेल्यांनीही पर्यटन व्यवसाय विकसित व्हावा, यासाठी फार पद्धतशीरपणे नियोजन राबवले.

कोकणात निसर्गाने खूप काही देऊन ठेवलंय; परंतु त्यापलीकडे जाऊन १९९७ साली कोकणातील पर्यटन विकासाचा जो आराखडा आखला गेला, त्याची अंमलबजावणी नंतरच्या काळात ज्या गतिमानतेने व्हायला हवी होती, ती गतीच मंदावली. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना ज्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते, त्या सोयीसुविधा नंतरच्या काळात झाल्याच नाहीत. याला सत्तेवर असलेले नेते, पुढारी कारणीभूत आहेत तसेच कोकणात पर्यटन व्यवसायाशी संबंधित येणाऱ्या प्रकल्पांनाही आपण विरोध करीत राहिलो. कोकणात होणाऱ्या विरोधामागे राजकीय नेते, पुढाऱ्यांची संकुचित मनोवृत्ती कारणीभूत आहे. कोकणात उभ्या राहणाऱ्या ताज, ओबेरॉयसारख्या पंचतारांकित हॉटेल, प्रकल्पांना विरोध झाला. तो विरोधही त्याकडे राजकीय ‘इश्यू’ म्हणून पाहता येईल, असाच होता. त्याला लोकहिताचा जरी मुलामा देण्यात आला असला आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार म्हणून जरी ढोल वाजवले गेले तरीही ते खरं नाही. त्या प्रकल्पात शेतकऱ्यांचे जे काही नुकसान होणारे होते, त्यासाठी पुढच्या पन्नास-शंभर वर्षांचा हिशोब घालून नुकसानभरपाई देण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आला होता; परंतु ज्यांना काही विकास करायचा नव्हता, त्यांनी मात्र विरोधाचा सूर लावून प्रकल्प होऊ दिला नाही. पंचतारांकित पर्यटन संस्कृती कोकणात नको म्हणून बेसुराची आळवणी करणाऱ्यांमुळे कोकणाचे मोठे नुकसान झाले आहे.

आता कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. दरवर्षी एप्रिल-मे, दीपावली, वर्षअखेर अशा सुट्टीच्या हंगामात येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे. येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक त्या सोयीसुविधा देण्यात कोकण कमी पडतेय. मालवण म्हणजे पर्यटनस्थळ, असा एक समज पर्यटकांमध्ये निर्माण झाला आहे. तारकर्ली, देवबाग, तोंडवली अशा काही मोजक्या पर्यटनस्थळांवर प्रचंड गर्दी होते. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आपला वाढदिवस कोकणातील भोगवे या पर्यटनस्थळी साजरा केला. साहजिकच जगभरातून या भोगवे पर्यटनस्थळाचा शोध सुरू झाला. भोगवे पर्यटनस्थळ म्हणून पर्यटकांना आकर्षित करीतच होते; परंतु क्रिकेटर सचिन तेंडुलकर भोगवेमध्ये आल्याने साहजिकच त्याची चर्चा तर होणारच. त्याचा फायदा वाढणाऱ्या पर्यटन व्यवसायाला होणारा आहे.

कोकणात पर्यटकांची संख्या वाढेल. पर्यटक येतील; परंतु एकदा येणारा पर्यटक पुन्हा-पुन्हा आपणाकडे यायला हवा, असं त्यांचं आगत-स्वागत झालं पाहिजे. येणाऱ्या पर्यटकांना जसं छान रूचकर जेवण देत आणि येणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल, त्याला समाधान वाटेल, याची काळजी घेत पर्यटन व्यवसाय वाढवला पाहिजे. अलीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते आजही तसेच आहेत. या रस्त्यांसाठी फूटभराची जागा देण्याची आपली मानसिकता नाही. येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगची व्यवस्था नाही. आज कार पार्किंगची आवश्यकता असते. कोकणातील अनेक पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावरून दोन गाड्या जाऊ शकतात, असे रस्ते निर्माण होणे आवश्यक आहेत; परंतु अरुंद रस्त्यांवरून पर्यटकांना करावा लागणारा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी जशी जबाबदारी शासनाची रहाते, तशी ती आपलीही आहे. पर्यटन व्यवसायातून मिळणारा फायदा आपणाला हवा आहे; परंतु त्यासाठी आपल्या घरासभोवती घातलेल्या कंपाऊंड वॉलला जरा धक्काही दिला जाता कामा नये. असं कसं होऊ शकते? आपल्या आर्थिक समृद्धीचा पर्यटन हाच मार्ग आहे. या पर्यटनाच्या मार्गातूनच अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन कोकणातील प्रत्येक घरात समृद्धी आणू शकते; परंतु तो विचारही आपण करत नाही. तिथेही विरोधाचीच मानसिकता आहे.

अगदी आज जगभरातून पर्यटक मालवणमध्ये येतात. इथल्या पर्यटनस्थळांकडे जाताना त्यांना जो त्रास सहन करावा लागतो त्याचा विचार आपण करणार आहोत की नाही. हा काही काळापुरता करावयाचा विचार नाही, तर या चांगल्या विचारातून कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन त्यांचे चांगले परिणाम समोर येणारे आहेत. कोकणात पर्यटकांची संख्या आणखी वाढत जाणार आहे. या वाढत जाणाऱ्या पर्यटकांना कोकणात पुन्हा यावेसे वाटले पाहिजे, असे आनंददायी वातावरण निर्माण करून त्यांना समाधान देण्याची पर्यटन व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या सर्वांचीच जबाबदारी आहे.

अवघं कोकण सध्या पर्यटकांनी ‘फुल्ल’ आहे. पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. या आलेल्या पर्यटकांमुळे सर्वच व्यवसाय वाढले आहेत. कोकणात तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांना चांगली मागणी आहे. जर कोकणातील व्यवसायिकांनी दर्जा सांभाळला, तर निश्चितच त्या वस्तूंना पुन्हा-पुन्हा मागणी येत राहिल. लोकचर्चेतून आपोआपच छान मार्केटिंग होईल; परंतु पर्यटक पुन्हा आपल्याकडील वस्तू खरेदी करायला यायला हवा, अशी मानसिकता कोकणातील विविध व्यवसायात असणाऱ्यांची असायला हवी. ‘ग्राहक हवा, तर येईल’ या मानसिकतेतून बाहेर येऊन व्यावसायिकता असली पाहिजे. ती जपलीही पाहिजे, तर आज पर्यटनात हाऊसफुल्ल असणारे कोकण असेच पर्यटनासाठी नेहमीच हाऊसफुल्ल होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -