Monday, October 27, 2025
Happy Diwali

पन्हाळगडावर समाजकंटकांकडून ऐतिहासिक तानपीर मजारीची नासधूस

पन्हाळगडावर समाजकंटकांकडून ऐतिहासिक तानपीर मजारीची नासधूस

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावरील ऐतिहासिक तानपीर मजारीची काही अज्ञात समाजकंटकांनी काल रात्री नासधूस केली. सकाळी खिदमत बदलायला गेले असता तेथील नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर लगेच हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी या मजारीची डागडुजी सुरु केली. या पार्श्वभूमीवर या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर तानपीर मजारीबाबत एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्यानंतर काल रात्री काही अज्ञातांकडून नासधूस करण्यात आली. त्यामुळे पर्यटकांना सध्या पन्हाळगडावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर पन्हाळगड पर्यटनासाठी खुला केला जाईल. सध्या कडक पोलीस बंदोबस्तासोबत येथे कमालीची शांतता निर्माण झाली आहे.

या घटनेबाबत स्थानिक मुस्लिम बांधवाने दिलेल्या माहितीनुसार, दररोज सकाळी नमाजनंतर ६ वाजता सर्वजण मजारीजवळ जायचे. फक्त गुरुवारी साफसफाई व इतर कामांसाठी ४:०० वाजताच मजारीजवळ जायचे. आज ४ वाजता गेले असता कोणीतरी मजारीची नासधूस केली होती. आता त्याची डागडुजी करुन मजारी पूर्ववत केली आहे.

दरम्यान, इथे राहणार्‍या हिंदू व मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आम्ही दोन्ही समाज इथे गुण्यागोविंदाने राहतो. समाजकंटकांनी जाणूनबुजून जे काही केलं ते आम्ही शांततेनं घेतलं आहे. त्यामुळे बाहेरच्या कोणीही असं कृत्य करु नये आणि झालेल्या कृत्यासंबंधी पोस्ट व्हायरल करु नये, अशी विनंती नागरिकांनी केली.

पन्हाळ्याच्या माजी नगराध्यक्षांनीही आपलं मत व्यक्त केलं. "आम्ही दोन्ही समाज इथे गुण्यागोविंदाने राहतो, हे कोणाला तरी बघवलेलं नाही. त्यामध्ये विघ्न आणायला कोणीतरी जाणूनबुजून हे केलेलं आहे. परंतु गावक-यांनी व इतरांनी त्याच्यावर विश्वास न ठेवता पूर्वीप्रमाणेच गुण्यागोविंदाने राहावं. यासंबंधी कुठलीही चांगली किंवा वाईट पोस्ट आली तरी ती फॉरवर्ड न करता तिथल्या तिथे डिलीट करुन टाकावी, म्हणजे कोणतेही दंगे भडकणार नाहीत", असं ते म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा