आयसीसी एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या स्पर्धेत भारतीय फलंदाजांची बॅट चांगलीच धुमाकूळ घालत असताना आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत मात्र भारताच्या बॅटर्सना फटका बसला आहे. जागतिक क्रिकेटच्या पटलावर लिंबू टिंबू समजल्या जाणाऱ्या आयर्लंडचा फलंदाज हॅरी टेक्टरने भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांना मागे टाकले आहे.
आयसीसीने जारी केलेल्या फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत आयर्लंडच्या हॅरी टेक्टरने सोळाव्या स्थानावरून सातव्या स्थानी झेप घेतली. विराट कोहली आठव्या स्थानी असून रोहित शर्मा दहाव्या स्थानी आहे. विशेष म्हणजे भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल या क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तानचा बाबर आझम ८८६ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. दक्षिण आफ्रिकेचा रॅसी वॅन डर डसन दुसऱ्या स्थानी आहे. पाकचा फखर झमान तिसऱ्या स्थानी आहे. टॉप १० मध्ये भारत आणि पाकिस्तान यांचे सर्वाधिक प्रत्येकी ३ फलंदाज आहेत.
आयर्लंडच्या हॅरी टेक्टरने सोळाव्या स्थानावरून सातव्या स्थानी झेप घेतली. अलीकडेच बांगलादेशविरूद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत टेक्टरने १४० धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. त्या मालिकेत टेक्टरने सर्वाधिक धावा केल्या होत्या, ज्याचा फायदा त्याला या क्रमवारीत झाला आहे.