मुंबई : विधानसभा अध्यक्षांवर बेताल आरोप करून त्यांच्या अधिकारावर शंका घेऊन जनमानसात विधानसभा अध्यक्षांची पर्यायाने विधीमंडळाची प्रतिमा मलिन करणाऱ्या राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले आहे. मुर्खासारखे वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतला धडा शिकवला पाहिजे. यासाठी हक्कभंगाची कारवाई आवश्यक आहे, असेही शिरसाट यांनी या पत्रात म्हटले आहे. शिरसाट यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.
विधानसभा अध्यक्ष लंडन दौऱ्यावर होते ते नुकतेच भारतात आले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात ठाकरे गटाकडून आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत. त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केला आहे. तसेच खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने नार्वेकर यांच्यावर टिप्पणी केली जात असल्याचा आरोप देखील शिरसाट यांनी केला आहे. याच अनुषंगाने आज शिरसाट यांनी नार्वेकरांची भेट घेत हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी याबाबतचे पत्र दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा सदस्य संजय राऊत हे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री तसेच शिवसेनेच्या आमदारांबद्दल अतिशय वाईट शब्दांत टीका करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार हे घटनाबाह्य, बेकायदेशीर असल्याचा कांगावा राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून करीत असून आता अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राऊत हे सन्माननीय विधानसभा अध्यक्षांवर बिनबुडाचे आणि बेताल आरोप करीत आहेत.
महोदय, भारतीय संविधानाने विधानसभा अध्यक्ष यांना व्यापक, नियमनात्मक, प्रशासकीय आणि न्यायिक अधिकार दिलेले आहेत. विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत अधिकार आहेत. कायदेमंडळाचा अध्यक्ष या नात्याने विधानसभा अध्यक्ष हे न्यायाधीशांच्या भूमिकेत असतात. विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात देखील आव्हान देता येत नाही इतके अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिलेले असतात.
अशा परिस्थितीत विधानसभेच्या अध्यक्ष पदावर नियुक्त व्यक्तीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून होत असलेले आरोप गंभीर आहेत. विधानसभा अध्यक्ष हे विधिमंडळाच्या कार्यप्रणालीत कोणत्याही पक्षाचे नेतृत्व करीत नाहीत. किंवा त्यांना कोणत्याही पक्षाची झालर लागलेली नसते तर ते सर्वच पक्षांचे विधीमंडळातील पीठासिन अधिकारी असतात. त्यामुळे त्यांच्यावर खोटे, बेफाम आरोप करून जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याबरोबरच विधिमंडळाचे पावित्र्य धोक्यात आणण्याचे काम राऊत हे करीत आहेत. त्यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांवर केले जाणारे आरोप हे त्यांना धमकावण्यासाठी केले जात असून अध्यक्ष पदाची मानहानी करीत आहेत.
राऊत यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न होत असून तो हक्कभंग या प्रकारात मोडत असल्याची आमची धारणा आहे. विधानसभा अध्यक्ष या नात्याने आपल्यावर संजय राऊत यांच्याकडून होणारे आरोप, या पदाची त्यांच्याकडून केली जाणारी मानहानी, अपमान या सर्व गोष्टींचा विचार करता राऊत यांच्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंग दाखल करण्यात यावा, अशी विनंती आमदार संजय शिरसाट यांनी नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…