Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखभटक्या कुत्र्यांपासून वाढता त्रास

भटक्या कुत्र्यांपासून वाढता त्रास

  • विनायक बेटावदकर, ज्येष्ठ पत्रकार (कल्याण)

महाराष्ट्राचा फार मोठा भाग आजही ग्रामीण आहे. तेथे शेती हेच मुख्य उत्पनाचे साधन आहे. शेतीसाठी जनावरे लागतात. त्यांना सांभाळण्यासाठी (राहण्यासाठी) गोठे आले. गोठ्यात बैल, गायी, शेळ्या यांना ठेवण्याची सोय करण्यात आली. या जनावरांचा सांभाळ, तसेच संरक्षणासाठी कुत्री पाळण्याची प्रथा सुरू झाली. कुत्रा हा अत्यंत इमानी प्राणी आहे. आपल्या मालकाची भाषा त्याला बरोबर कळते. मालकाच्या आज्ञेबाहेर तो कधी जात नाही. कुत्र्यामध्ये जशा अनेक जाती आहेत तसे अनेक प्रकारही आहेत. त्यांना जे शिक्षण देऊ त्यांचे ते चांगले अनुकरण करतात, गुन्हेगाराचा शोध घेणे, निरोप पोहोचवणे, गुन्हेगारी रोखणे, मालकाचे, त्यांच्या जनावरांचे सरक्षण करणे यासाठी शेतकरी किंवा ग्रामीण भागात कुत्र्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

पण, कुत्र्याच्या या उपयोगाप्रमाणेच ज्या कुत्र्यांना कोणी वाली नाही, त्यांना भटकी कुत्री म्हणतात. ती रस्त्यातच राहतात. मिळेल ते खातात. या कुत्र्यांचा नागरिकांना खूप त्रास होतो. शहरी भागात मोठ्या संख्येने लोकसंख्येत वाढ झाली आहे. निरनिराळ्या सोसायट्यांत जसे लोक राहतात, त्याचप्रमाणे या सोसायट्यांच्या आश्रयाने ही भटकी कुत्री ग्रुप करून राहातात. नवीन कुणीही सोसायटीत आले. तर ते भुंकून लोकांना सावध करतात. काही कुत्र्यांना रेबीज नावाचा आजार असतो. असा कुत्रा माणसाला किंवा अन्य प्राण्याला चावला, तर त्यालाही तो रोग होतो. वेळीच त्यावर उपचार झाले नाही, तर मृयुही ओढवतो. जी पाळीव कुत्री असतात, त्यांना रेबीज विरोधी लस देऊन चांगली निगाही राखली जाते. पाळीव कुत्रा शक्यतो बांधून ठेवला जातो. भटक्या कुत्र्यांचे तसे नसते. नसबंदी करून त्यांची उत्पत्ती थांबवण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून केले जातात त्याची गणतीही केली जाते. २०१४ मध्ये फक्त मुंबईत अशी गणती केल्याचे सांगितले जाते.

अलीकडच्या काळात ग्रामीण, शहरी भागात लोकसंख्या खूपच वाढली. परिणामी दिवसा-रात्री वाहनांची वाहतूक वाढली. माणसांना दुचाकी वाहनांनी कामानिमित्त जावे लागते, त्यांच्यामागे ही कुत्री लागतात. त्यातून वाहनांचे अपघात होतात. फार वर्षांपूर्वी कल्याणमध्ये पश्चिमेला भिवंडी रोडवर हिराबागेत एक तबेला होता. त्यातील एक म्हैस अशीच वाहनांमागे लागत असे. आता जनावरांना वाहनांची सवय झाली असली तरी भटकी कुत्री वाहनांमागे लागतात. अनेक नागरिक भूतदयेने अशा भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ, बिस्किटे देतात, त्यामुळे अशी कुत्री रस्त्यात गटागटाने राहतात. वाहनांवर किंवा नवीन माणसावर धावून जातात. काही कुत्री शाळेत जाणाऱ्या लहान मुलांवर हल्ले चढवून त्यांचे लचके तोडतात. पहाटेच्या वेळी सायकलवरून दूध नेणारे दूधवाले बेकरीवाले यांच्यामागे कुत्री लागतात. दुचाकीवरून घरी परतणाऱ्या लोकांवर ते हमखास धावून जातात. अशावेळी जर वाहन थांबवले, तर ते पायाला चावा घेतात.

कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पेढ्यासारख्या पदार्थातून विष देत. पण भूतदयेपोटी प्राणी मित्रांनी त्याला विरोध केला. मुलांवर कुत्री फार प्रेम करतात. मुलेही त्यांच्यावर तसेच प्रेम करतात. एकमेकांची गट्टी जमून ते चांगले खेळतात, पण खेळताना कधी कधी कुत्रा चिडतो. मुलांवर हल्ला करून चावतो. किंवा लचका तोडतो. म्हणून कुत्र्यांना मुलांपासून दूर ठेवणे चांगले असते. कुत्र्यांचा त्रास खूप वाढल्याने पुण्यात पाळीव कुत्र्यांवर काही निर्बंध घातले आहेत. तसेच ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल संस्थेच्या सहाय्याने जूनपासून कुत्र्यांची गणती करण्याचे जाहीर केले आहे. चार-पाच महिन्यांतच त्याचा अहवाल अपेक्षित आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -