-
ऐकलंत का!: दीपक परब
दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘यशोदा गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेची कथा यशोदाची म्हणजेच एका अशा आईची आहे, जिने साने गुरुजींना घडवले. ही मालिका आपल्या मुलांवर संस्कार व्हावेत आणि त्यांना संस्कृतीबद्दल कळावं यासाठी सुरू करण्यात आली होती. पण मुलांना दुपारी ही मालिका पाहणे शक्य होत नसल्याने या मालिकेची दुपारची वेळ बदलावी यासाठी अनेक पालकांचे निर्मात्यांना फोन कॉल्स आणि मेल आले होते. त्यामुळे प्रेक्षकांचा आदर राखत निर्मात्यांनी या मालिकेची वेळ बदलली आहे. ‘यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. पण टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका मागे पडली आहे. ‘यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका आता रंगतदार वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत लवकरच यशोदा आणि सदाशिवराव साने यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. हा विवाह विशेष भाग प्रेक्षकांना १६ मे रोजी संध्याकाळी ६ वा. झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका एक नवीन वळण घेणार आहे. अवखळ, अल्लड तसेच अतिशय धीट असलेल्या बयोच्या आयुष्यात नवीन घटना घडणार आहे ती म्हणजे बयोचा लवकरच सदाशिवरावांबरोबर विवाह होणार आहे. प्रेक्षकांची लाडकी बयो आता यशोदा सदाशिवराव साने होणार आहे. सदाशिवराव साने यांच्याबरोबर सहचारिणी म्हणून यशोदेचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. बयोचा वैशाख कृष्ण द्वितीयेला विवाह सोहळा संपन्न होणार आहे. निरनिराळ्या पात्रांची सुरेख गुंफण करुन सुंदर कलाकृती घडवण्याचा प्रयत्न ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’ या मालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’ या मालिकेची कथा सानेगुरुजींना घडवणाऱ्या त्यांच्या आईच्या आयुष्यावर आधारित आहे.