-
विशेष: सुरक्षा घोसाळकर पवई, मुंबई
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्त्वांचे पालन करण्यात आहे. धर्म म्हणजे स्वतःमधील सामर्थ्य. आज सगळीकडे धर्माच्या नावाखाली होणारा अंदाधुंद व्यवहार, दंगे, भांडणे बघून लोकांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. धर्म आणि प्रेमभावना यांचा वैयक्तिक स्वार्थापोटी विपर्यास होत आहे. सध्याच्या परिस्थितीत धर्म आणि प्रेम याची परिभाषा प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करून त्यानुसार आत्मसन्मानाने परिवर्तनाला सामोरे गेले पाहिजे. स्वतःच्या जीवन शिल्पाला आकार देताना सामाजिक एकात्मतेचे शिल्प बिघडणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे.
जन्माला येताना प्रत्येकाची ओळख बालक म्हणून असते, नंतर त्याच्या पालकांच्या मर्जीनुसार धर्माशी नाते जोडले जाते. पहिला घास आणि प्रगतीचा ध्यास त्यांच्यावरच अवलंबून असतो. सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे. म्हणजेच निष्पाप बालकाच्या मनात धर्म आणि प्रेम हा संस्कार सात्त्विक की तामसी वृत्तीने रुजविणे ही नैतिक जबाबदारी गर्भाशयात नाळ जोडलेल्या आईची आणि नामकरण करणाऱ्या वडिलांचीच असते. कारण मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. त्यामुळे मनाचे संस्कार महत्त्वाचे. आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या अशा सर्व बऱ्या-वाईट गोष्टीचे मन हे उगमस्थान असते. मनात सद्विचार असतील, तर त्या व्यक्तीचे शब्द आणि कार्ये दोन्हीही चांगले असतात. आपण आपल्या विचारांप्रमाणे घडत असतो. आपला भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असलेला जागतिक पातळीवर नैतिक मूल्य जपणारा देश म्हणून विविध क्षेत्रांत वंदनीय आहे. आपल्या राष्ट्राची ओळख सर्वदूर पसरविणाऱ्या ज्यांच्या विचारांना वाचून ऊर्जा उत्पन्न होते असे मानवजातीचे मार्गदर्शक तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा अभिमान वाटतो.
भारताचे माजी राष्ट्रपती तसेच मिसाइल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार सांगतात, ‘जीवनात यश मिळवण्यासाठी आपल्याला सूर्यासारखे सर्वात आधी तापावे लागेल. आपण केवळ एक व्यक्ती होण्यासाठी आपला जन्मसिद्ध हक्क टिकवून ठेवून जिंकू शकतो. जीवनासारख्या कठीण खेळाला योग्य प्रकारे खेळताना लहान लक्ष ठेवणे गुन्हा आहे, महान उद्दिष्टे असली पाहिजेत. आयुष्य खडतर आहे त्याची सवय करून घेतली पाहिजे. संयम हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास हे टॉनिक आहे. कोणत्याही धर्मात कोणत्याही धर्माला टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी दुसऱ्यांना मारणे सांगितले नाही. तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, सवयी बदलू शकता.’
लेखक, विचारवंत, समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले समाज प्रबोधन करताना सांगतात, जात ही एका विशिष्ट धंद्याशी निगडित असते. केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे. चामड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे. पूजापाठ करणे हा ब्राह्मणांचा धर्म नसून धंदाच आहे. तसेच आतंकवाद हा धर्म नाही. त्याप्रमाणे सध्याचे फुटिर वृत्तीचे राजकारण, चित्रपट, प्रसारमाध्यमे, सोशल नेटवर्क हा केवळ धंदाच आहे. त्याच्या आहारी जाऊन देशहित धोक्यात आणू नका. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे, पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन आहे. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही. ध्येय नसलेली लोकं साबणाच्या फेसासारखी चिथवणाऱ्यांच्या बाजूने क्षणासाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात. जीवनात कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली की, ती विष बनते. मग तो पैसा असो की ताकद. जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील, तर त्यांची जात विचारू नका. जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे. मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा. विकृतीला धर्म नसतो.
मराठी साहित्यातील महान लेखक, कवी विष्णू सखाराम खांडेकर म्हणतात, व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल, तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. जो विश्वास करतो तो सर्वकाही मिळवू शकतो. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत. कारण ओळख ही क्षणभरासाठी असते. तर जपवणूक आयुष्यभरासाठी. आयुष्यात प्रत्येकाने दुसऱ्याच्या सुखात सुख मानायला हवं त्यामुळे एकमेकांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत मिळते. प्रेम हा सौदा नाही ते एक वरदान आहे. प्रकाशासारखं, पावसासारखं कुणाचंही दुःख असो ते कळण्याचा एकच मार्ग आहे आपण त्या व्यक्तीच्या जागी असणे.
प्रसिद्ध लेखक वसंत पुरुषोत्तम काळे म्हणतात, अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचा हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कोणाला तरी हवा असतो. मन मारून मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करायला मिळालेली कुशी अधिक सुरक्षित असते. उडून जाणाऱ्या अत्तरापेक्षा निःस्वार्थी भावनेने उत्कट प्रेम करणारी व्यक्ती महत्त्वाची असते. प्रेमात पडून बुडण्यापेक्षा सावरणारे प्रेम महत्त्वाचे. जीवनात कधी कधी अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते की, ज्यामुळे माणसाला दुःख, निराशा येते. हा अविभाज्य भाग असतो. जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण लागतो. आपण काही लोकांसाठी स्पेशल असतो पण फक्त काही काळासाठी. माणूस बदलत नाही, बदलते ती परिस्थिती. कोणाला चुकीचे समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून घ्या. विपरीत परिस्थितीमध्ये काही लोक तुटून जातात, तर काही रेकॉर्ड तोडून टाकतात. ज्यांचं मस्तक फक्त मातृभूमीसाठी झुकतं त्यांना कुठचं मस्तक झुकवावे लागत नाही.
धर्म व प्रेम या दोन्हीमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास, कर्तव्यनिष्ठा, सन्मानाची भावना, समान विचारधारेमुळे एक दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये बरोबरीने साथ देणे. व्यक्ती व सामाजिक जीवनाची गोडी निर्माण करण्याचे काम धर्म आणि प्रेम करते. धर्मामध्ये समाज हा एकत्रित असतो. धर्म आणि प्रेमाची संकल्पना ही आनंदी, समृद्ध जीवनासाठी प्रेरणादायी असते. त्यामध्ये व्यवहार आणि आचरणामध्ये बदल, नैतिकता, आत्मशक्ती,जनहिताकरिता प्रवृत्त होणे अपेक्षित असते. करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही. मानवधर्म आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सध्याची स्थिती पाहून खेदाने नमूद करावेसे वाटते की, भारतात आलेल्या विभिन्न वंशातील लोकांचे पूर्णतः एकत्रीकरण झालेले नाही. लोकसमूहाच्या एकत्वासाठी केवळ सांस्कृतिक ऐक्य हेच एकात्मकतेचे गमक आहे. शिक्षक, शेतकरी, सैनिक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनीयर, सफाई कामगार यांनी केवळ आपापल्या धर्मातील व्यक्तींनाच सेवा देण्याचा निश्चय केल्यास सुजलाम, सुफलाम, अखंड भारतासाठी प्राणांची आहुती दिलेल्या क्रांतिकारक पूर्वजांची जयंती, पुण्यतिथी साजरी करताना धर्म आणि प्रेम शाश्वत राहील का? याचे आत्मपरीक्षण करावे. त्यापेक्षा भारतीय लोकसमूह एकसंध राहण्यासाठी सबका मालिक एक, युद्ध नको मज बुद्ध हवा या विचाराने मार्गक्रमण करणे हेच तरुणाईच्या हिताचे नाही का? खऱ्या अर्थाने संस्कृती जपायची असेल, तर वास्तववादी दृष्टिकोनातून जन्म, शिक्षण, नोकरी, मृत्यू प्रमाणपत्रासारख्या सरकारी कागदपत्रातील धर्म, जात हा उल्लेखच मिटवून व्यक्तीच्या कर्तृत्वाला प्राधान्य दिले पाहिजे.