Monday, May 5, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

संजय शिरसाट यांनी केला मोठा दावा

संजय शिरसाट यांनी केला मोठा दावा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात यांना मिळणार संधी

संभाजीनगर : राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. या विस्तारासंदर्भात अनेक चर्चा सुरु असतानाच शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटातील दोघांना संधी मिळणार असल्याचा मोठा दावा केला.

राज्यात सत्तासंघर्षाच्या निकालानुसार शिंदे-फडणवीस सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार एकदाच झाला. त्यामुळे पहिल्या विस्तारामध्ये स्थान न मिळालेल्या अनेकांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. अनेकांना मंत्रिपदाची आस आहे. त्यासंदर्भात शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. यावेळी राज्य मंत्रिमंडळात २० जणांना संधी मिळणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातही दोन मंत्री शिवसेनेचे होतील, असे त्यांनी सांगितले.

याआधी बच्चू कडू यांनीही माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगितली होती. २० व २१ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे, त्यामुळे मलाही मंत्रिपद मिळणार, असा दावाही बच्चू कडू यांनी केला होता.

पुढे संजय शिरसाट यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी झाला हा भाजपचा दावा बरोबर आहे. आम्हीसुद्धा शिवसेना भाजपचे सरकार येईल, या आनंदात होतो, पण अचानक बदल झाल्याने आपण भाजप सोबत जाणार नाही, असं कळले. मग त्यावेळी भाजपने जी खेळी केली, ती योग्य होती.

संजय राऊतांना इतरांच्या आनंदात आनंद साजरा करण्यात इंटरेस्ट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला हे दिवस आले आहेत. उद्धव ठाकरे यांना इतकं लाचार संजय राऊत यांनी केलीय त्याची आम्हाला लाज वाटतेय, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी राऊतांवर टीका केली. त्याचबरोबर कर्नाटकच्या निकालाचा काहीही परिणाम दुसऱ्या राज्यावर होणार नाही, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

Comments
Add Comment