Tuesday, April 22, 2025

शिक्षा…!

  • कथा: रमेश तांबे

वर्गात गोंधळ सुरू होता. प्रचंड आवाजाने वर्ग दणाणून गेला होता. तेवढ्यात अचानकपणे टिळक सर वर्गात आले. साधारण पाच सव्वापाच फूट उंचीचे. अंगात सफेद शर्ट, काळी पॅन्ट अन् डोक्यावर पांढरीशुभ्र गांधी टोपी. डोळ्यांवर काळा जाड भिंगाचा चष्मा अन् करारी चेहरा. पाहताक्षणी धडकी भरावी, असं व्यक्तिमत्त्व! टिळकसर वर्गात येताच सारा वर्ग चिडीचूप झाला. त्यांनी साऱ्या वर्गावर नजर फिरवली अन् ५-६ मुलामुलींना वर्गात उभं केलं.

त्यात मी अन् माझा टवाळखोर वर्गबंधू उदयही होता. आम्हा दोघांची झटापट सरांनी खिडकीतूनच पाहिली होती. त्यामुळे “मी काही नाही केलं सर” असं म्हणण्याची सोय नव्हती. “भूगोलाचा आठवा धडा दहा वेळा लिहून आणा. उद्या माझा तास तुमच्या वर्गावर आहे. मी तुमच्या वह्या तपासणार आहे.” एवढं बोलून सर निघून गेले. झालं नको तेच झालं. आता लिहून लिहून हात दुखून येणार. कारण भूगोलाचा आठवा धडाच मुळी १० पानांचा होता. तो १० वेळा लिहायचा म्हणजे झाली १०० पाने! शिवाय यात माझी काहीच चूक नव्हती. शेजारचा उदय मला चिमटे काढत होता म्हणून मी त्याला मारलं. आमची ही झटापट सरांनी बघितली अन् सरळ शिक्षा ठोठावली. भूगोलाचा आठवा धडा १० वेळा लिहा! माझ्या बाबतीत नेहमीच असं का घडतं? माझी चूक नसताना मलाच शिक्षा का होतात? मी विचार करीत करीतच घरी पोहोचलो. लगेचच भूगोलाचे पुस्तक काढले अन् आठवा धडा लिहायला सुरुवात केली. तीन-चार तास मी लिहितच होतो. तब्बल चार तासांनी माझं लिहून पूर्ण झालं. अन् मी एकदाचं हुश्श केलं. पुस्तकात एकटक बघून डोळे दुखू लागले होते. लिहून लिहून बोटं पार हुळहुळी झाली होती. पण धडा लिहून पूर्ण झाल्याचं मला समाधान वाटत होतं. आता उद्या टिळकसरांच्या तासाला मला मान खाली घालून बसण्याची गरज नव्हती. शिवाय १० वेळा लिहिल्यामुळे भूगोलाचा आठवा धडा, तर एकदम तोंडपाठच झाला होता.

दुसऱ्या दिवशी पहिलाच तास टिळकसरांचा होता. मी शिक्षा म्हणून धडा लिहून आणलेली वही अगदी जपून ठेवली होती. माझा शेजारी वर्गमित्र उदयही आज शाळेत आला होता. आता सर वर्गावर येणार हे लक्षात येताच उदयने माझी काॅलर पकडली अन् म्हणाला, “टिळकसर वर्गात येताच विचारतील, काल कुणाकुणाला भूगोलाचा धडा लिहून आणायला सांगितला होता. त्यावेळी तू गपगुमान बसून राहायचं. जर का उभा राहिलास, तर मग तुझी खैर नाही.” उदयचा दरारा साऱ्या वर्गात होता. त्याच्या दादागिरीचा मी, तर खूप वेळा अनुभव घेतला होता. त्यामुळे मी अगदी घाबरून गेलो होतो.

तेवढ्यात टिळकसर वर्गात आले. सर वर्गात येताच साऱ्या वर्गात सन्नाटा पसला. हातातली पुस्तकं टेबलवर ठेवत साऱ्या वर्गाला उद्देशून म्हणाले, “काल ज्यांना शिक्षा झाली होती त्यांनी उभे राहावे.” तशी ४-५ मुलंमुली वह्या हातात घेऊन उभी राहिली. मी मात्र तसाच बसून राहिलो. कारण उदय माझ्याकडे मारक्या बैलासारखा बघत होता. उभ्या राहिलेल्या मुलांच्या वह्या सरांनी न बघताच त्यांना खाली बसायला सांगितलं अन् शिकवायला सुरुवात केली. मी हा सारा प्रकार बघतच बसलो. काल ४ तास खपून १० वेळा धडा लिहला होता. ते सारे एका क्षणात वाया गेले. निदान सरांनी विचारल्यावर हातात वही घेऊन उभं राहण्याचं सुखही मला उदयने घेऊ दिलं नव्हतं. माझ्या भित्रेपणाची मला कीव वाटू लागली अन् उदय मात्र मला बघून माझी टिंगल केल्यासारखा फिदीफिदी हसत होता! हा प्रसंग आजही मला कालच घडल्यासारखा वाटतो अन् माझेच मला हसू येते!

पण नंतर दहा-बारा वर्षांनी घडलेल्या एका घटनेने मला कळाले की, शाळेत टिळकसरांनी केलेल्या अनेक शिक्षा काही अगदीच वाया गेल्या नव्हत्या. कारण एक दिवस उदय कराडकर या माझ्या शाळकरी मित्राचा अन् माझा फोटो एकाच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला, अगदी शेजारी-शेजारीच!
फरक इतकाच होता की, उदयच्या फोटोवर मथळा होता ‘चोरीच्या गुन्ह्याखाली अटक’ अन् माझ्या फोटोचं शीर्षक होतं, ‘भूगोल विषयात डॉक्टरेट…!’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -