पुणे: ‘मदर्स डे’च्या आदल्या दिवशी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. स्वत:च्या लेकराचा मृत्यूने पुण्यात एका आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. साधना स्कूलच्या जलतरण तलावात पोहताना एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी हडपसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
हडपसर येथील माळवाडी काळूबाई वसाहत येथील रहिवासी असलेला कृष्णा गणेश शिंदे हा साधना शाळेतील नववीत शिकणारा विद्यार्थी आपल्या पोहायला गेला होता. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ जलतरण तलाव आहे. काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णा स्विमिंग पूलमध्ये शिरला. त्यावेळी सोबत असलेल्या कृष्णाच्या काकांच्या लक्षात आले की तो तलावात बुडाला आहे. उपस्थित इतरांनी कृष्णाला तातडीने बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कृष्णाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेच्या वेळी जलतरण तलावावर जीवरक्षक उपस्थित होते का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.