Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखगावप्रेमी चाकरमान्यांचे हाल काही सरेनात...

गावप्रेमी चाकरमान्यांचे हाल काही सरेनात…

मुंबईतील चाकरमानी दरवर्षी उन्हाळ्यात आपल्या सुट्ट्यांचे नियोजन करत असतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र बघूनच त्यांना वेध लागतात ते आपल्या गावाकडे जाण्याचे. अनेकजण उन्हाळी सुट्टीसाठी कुटुंबीयांसह गावची वाट धरतात व गावी जाण्यासाठी रेल्वेचाच प्रवास किफायतशीर, सुरक्षित, वेळेची बचत आणि कमीत कमी त्रासदायक असा वाटत असल्याने त्यांची पहिली पसंती ही रेल्वे गाड्यांनाच असते. त्याचमुळे कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांसह स्पेशल गाड्यांचे तिकीट मिळवण्यासाठी चाकरमानी जंगजंग पछाडत असतात. काहीजण रात्रीपासूनच तिकीट खिडक्यांच्या बाहेर रांगा लावतात. मात्र, तिकीट खिडकी उघडताच अवघ्या ५ ते १० मिनिटांतच आरक्षण हाऊसफुल्ल होत असल्याने तासनतास रांगेत उभ्या राहणाऱ्या अनेक चाकरमान्यांच्या पदरी घोर निराशाच पडते. सद्यःस्थितीत उन्हाळी सुट्टीत गावी येणारे कित्येक चाकरमानी गावी पोहोचले असले तरी काहीजण मात्र अद्याप प्रतीक्षा यादीवरच आहेत. जनशताब्दी, मांडवी एक्स्प्रेसचे वेटिंग तिकीटही संपले आहे. तुतारी एक्स्प्रेसचेही प्रवासी प्रतीक्षा यादीवरच आहेत. प्रवाशांची होणारी ही वारेमाप गर्दी ध्यानी घेऊन उन्हाळी सुट्टीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने यंदा तब्बल ९४२ उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्या चालविण्याची घोषणा केली. या संदर्भातील आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसी संकेस्थळांवर सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व उन्हाळी स्पेशल रेल्वेगाड्याही विक्रमी गर्दीनेच धावत आहेत. उन्हाळी सुट्टीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एकामागोमाग एक उन्हाळी स्पेशल गाड्या जाहीर करत चाकरमान्यांना दिलासाच दिला असला व या गाड्या विक्रमी गर्दीनेच धावत असल्याने या एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा सपाटाही सुरूच आहे. मात्र नियमित गाड्यांचे व या अतिरिक्त गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने उन्हाळी सुट्टीसाठी गावी जायचे तरी कसे? अशी चिंता अद्यापही काही चाकरमान्यांना सतावत आहे. त्यामुळेच ‘वेटिंग’वर असलेले चाकरमानी खासगी वाहनांचा आधार घेत गाव गाठत आहेत. उन्हाळी सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, विरार या भागांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लाखो चाकरमानी वास्तव्यास आहेत.

काहींच्या गावांपासून रेल्वे स्थानक लांब असल्याने किंवा रेल्वेप्रवास करून अखेर गाव गाठण्यासाठी पुढे रिक्षा किंवा अन्य खासगी वाहनांचा महागडा प्रवास करणे भाग पडत असल्याने असे लोक ‘एसटी’ला पसंती देतात व आगाऊ आरक्षणासाठी मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, ठाणे, बोरिवली, नालासोपारा अशा अनेक डेपोंवर गर्दी करतात आणि आपले नशीब आजमावतात. ज्यांना मनाप्रमाणे तिकिटे मिळतात ते खरे नशीबवान ठरतात, ज्यांची संख्या फारच कमी असते व इतरजण हवा तो दिवस व ठरावीक वेळेची तिकीट न मिळाल्याने साहजिकच कमनशिबी ठरून हिरमुसले होतात. त्यातील कित्येकजण अखेर खासगी लक्झरी बसेस किंवा अन्य प्रवासी वाहनांचा नाईलाजाने आसरा घेतात. अशा अडलेल्या-नाडलेल्या लोकांची खासगीवाले चांगलीच लूट करत असल्याचे वास्तव आहे. पण काहीही करून गाव गाठणे हे एकमेव ध्येय या सर्वांसमोर असल्याने कोणाचीही तक्रार नसते. त्यामुळे या लोकांचे फावते. चाकरमानी उन्हाळ्याच्या या कालावधीमध्ये गावी आंबे, काजू, फणस, करवंदे आदी चवदार फळांचा यथेच्छ आस्वाद घेण्यासाठी, फिरण्यासाठी, तसेच गावागावांमध्ये याच काळात सार्वजनिक पूजा, मंदिरांचे नूतनीकरण, कलषारोहण, लग्न सोहळे अशा कार्यक्रमांसाठी कोकणात धाव घेतात. अशा वेळी रेल्वेसुद्धा हाऊसफुल्ल झाली असल्याने चाकरमानी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे मुंबई सेंट्रल, परळ, दादर रेल्वे, बस स्थानकांवरून कोकणवासी आपली कोकणाची वाट धरतात. सध्या राज्यभरात दररोज १३ हजार बसेस धावत आहेत. कोकण एसटीप्रेमी संघटनेच्या वतीने एसटी महामंडळाला जादा बसेससाठी प्रस्ताव देण्यात आला होता. त्यामध्ये कणकवली-बोरिवली, बोरिवली-पाचल, विजयदुर्ग-दापोली, विठ्ठलवाडी-खेड, विठ्ठलवाडी-राजापूर, अशा मार्गाची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी बोरिवली-कणकवली, बोरिवली-पाचल, विठ्ठलवाडी-खेड या अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे कामाच्या ठिकाणी सुट्टी मिळविण्यापासून नंतर तिकिटांसाठी मारामारी आणि खस्ता खाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल काही संपताना दिसत नाहीत. ते जर कमी झाले तर त्यांचा आनंद आणखी द्विगुणित होईल यात वाद नाही. गावाकडे जाण्याबरोबरच धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठीही पर्यटक बाहेर पडायला लागले आहेत. रेल्वे स्थानकांवर अवजड बॅगांसह गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे, तर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे, गाव-खेडी आता गजबजून गेली आहेत. सिंधुदुर्गातील आंबोली हिल स्टेशन, मालवण, वेंगुर्ले, देवगड येथील रमणीय समुद्रकिनारे आणि किल्ले पर्यटकांनी फुलून गेले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -