Monday, May 12, 2025

ठाणे

महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना १५ जूनच्या आधी पुस्तके द्या

महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना १५ जूनच्या आधी पुस्तके द्या

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी, १५ जूनच्या आधी क्रमिक पुस्तके मिळायला हवीत, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मनपाच्या शालेय विभागाला दिले आहेत.



महापालिका शाळांमधील गुणवत्ता वाढ, तंत्रज्ञानाचा वापर, गणवेशाचा नवीन रंग, त्याची उपलब्धता आणि शालेय क्रमिक पुस्तकांची उपलब्धता आदी विषयांचा आढावा आयुक्त बांगर यांनी मंगळवारी घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून क्रमिक पुस्तके विनामूल्य दिली जातात. तर, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना महापालिका क्रमिक पुस्तके विनामूल्य देते. या संदर्भात, बालभारतीकडील पुस्तकांची उपलब्धता आणि खरेदी या दोन्ही गोष्टी ५ जूनपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे. शाळा सुरू झाल्यावर पुस्तके देणे हे पालिकेचे अपयश असून त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसतो. याची जाणीव ठेवून शिक्षण विभागाने जलद पावले उचलवीत, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.



त्याचबरोबर, स्टेशनरीच्या खरेदीसाठी असलेले दर निश्चित करून ते २० मेपर्यंत शाळांमार्फत पालकांना कळवावेत. म्हणजे पालकांना १५जूनच्या आधी त्यांची खरेदी करणे शक्य होईल. तसेच, शाळा सुरू झाल्यावर त्यांची बिलेही शाळांकडे तत्काळ सादर केली जातील. विद्यार्थ्यांकडून बिले आल्यावर ते पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा होतील, याची दक्षता विभागाने घ्यावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.



इंग्रजी माध्यम आणि सीबीएसई शाळा


महापालिकेच्या अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे सीबीएसई शाळा सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात २ शाळा सुरू केल्या जातील. त्यातील एक शाळा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून तर दुसरी महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. या शाळांसाठी असलेल्या अटींची पूर्तता करणे सुरू आहे. त्याचा आढावा आयुक्तांनी घेतला. तसेच, पहिल्या टप्प्यात इंग्रजी माध्यमांच्या आणखी किमान १० शाळा सुरू करण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे. त्यासाठी शिक्षक उपलब्ध करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.


गणवेशाचा नवीन रंग


महापालिका शाळांमधील गणवेशाचा रंग बदलण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी यापूर्वीच दिले होते. त्यानुसार, सध्या गणवेश निवडीचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया जलद पूर्ण करावी. तसेच, गणवेश आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास यांचे जवळचे नाते आहे. त्यामुळे टिकावूपणा सोबत त्याचा रंग आकर्षक आणि खाजगी शाळांच्या गणवेशांप्रमाणे उठून दिसणारा असावा, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment