छगन भुजबळ यांनी सुनावले
नाशिक: ‘आरएसएस’ संघटनेवर कोणी देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही. करू नये, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. पुण्याच्या ‘डीआरडीओ’चे संचालक व तत्कालीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिस्ट (इंजिनिअर्स आर अँड डीई) प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणी त्यांनी हे वक्तव्य केले. प्रदीप कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचा आरोप केला जात असून त्यांच्याविरोधात पुण्यात आंदोलन झाले. अनेक राजकीय नेते सुद्धा त्यामुळे ‘आरएसएस’वर आरोप करत आहेत. मात्र, यावर छगन भुजबळ यांनी या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. छगन भुजबळ यांच्या प्रत्युत्तराने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘डीआरडीओ’चे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला गोपनीय माहिती पुरवली. या प्रकरणी त्यांना एटीएसने अटक केली आहे. या कुरुलकर यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचा आरोप होत आहे. त्यावरून अनेकांनी ‘आरएसएस’वरही आरोप करायला सुरुवात केली आहे.