मुंबई : RTE अंतर्गत खाजगी शाळांमध्ये राखीव प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेची मुदत १५ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. १५ मे २०२३ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. विहित मुदतीमध्ये राज्यभरातून फक्त ४८,०१२ बालकांच्या प्रवेशाची नोंद झाली. तब्बल ५३,८३४ जागा रिक्त आहेत. ८ मेपर्यंत दिलेल्या मुदतीत जेमतेम निम्म्या जागाच भरल्याने आता मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार, वंचित घटकांसाठी खाजगी शाळांमध्ये आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांसाठी मार्च महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. ५ एप्रिल रोजी आरटीई प्रवेशाची लॉटरी जाहीर केल्यानंतर प्रत्यक्षात प्रवेशाची प्रक्रिया ही १३ एप्रिलपासून सुरू झाली. मात्र आरटीईचे संकेतस्थळ संथ गतीने सुरु होते. अनेक तांत्रिक अडचणींमुळे असंख्य पालकांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी आल्या होत्या. त्यामुळे शिक्षण संचालकांनी हे प्रवेश घेण्यासाठी सोमवारी ८ मे पर्यंत मुदत दिली होती.
मात्र त्यानंतरही हजारो जागांवरील प्रवेश अद्यापही होऊ शकले नसल्याने पुन्हा एकदा १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर वेटिंग लिस्टमधील मुलांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली जाईल.