Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखएबीपी माझा महाकट्टा मुलाखत : राणे परिवार राजकारणापलीकडे...

एबीपी माझा महाकट्टा मुलाखत : राणे परिवार राजकारणापलीकडे…

  • शब्दांकन: ज्योत्स्ना कोट-बाबडे
राजकारणाच्या पलीकडचे हे तिघे राणे कसे आहेत? हे या मुलाखतीतून स्पष्ट होईल. जेव्हा आपले करिअरचे क्षेत्र एकच असते, तेव्हा बाप-लेकाचं नातं नेमकं कसं असतं, आपल्या जोडीने जेव्हा आपला लेक काम करत असतो तेव्हा प्रत्येक बापाला वाटते की, बाप से बेटा सवाई व्हावा, तर नारायण राणेंनी आपल्या दोन्ही लेकांसाठी स्वप्नं कशी पाहिलेली आहेत आणि राजकारणात आम्ही कधीच कोणाला भीत नाही, असे म्हणणाऱ्या निलेश-नितेश यांना आपल्या वडिलांचा धाक वाटतो का? राजकारणात कायम आक्रमकपणे वावरणारे नारायण राणे आपल्या दोन्ही मुलांच्या बाबतीत हळवे आहेत का? त्यांचं कौटुंबिक नातं कसं आहे? घरामध्ये कशा गप्पा रंगतात. अशा राजकारणापलीकडच्या गप्पागोष्टी या कट्ट्यावर रंगल्या. एबीपी माझाचे संचालक, संपादक राजीव खांडेकर व त्यांच्या टीमने विचारलेल्या प्रश्नांना नारायण राणे, निलेश राणे व नितेश राणे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. त्या मुलाखतीचा काही निवडक भाग…

प्रश्न : असे तीनही राणे एकाच मंचावर कदाचित पहिल्यांदाच असतील. तुमची दोन्ही मुले, त्यांना जय-विरू म्हणूया, करण-अर्जुन म्हणूया, तर ते करण-अर्जुनसारखी आपल्या संघर्षाच्या काळात आपली मुले सोबत आली की, आपल्याला बळ मिळेल व आपण तो संघर्ष जिंकू, असे त्यात राखीला वाटते, तर तशी तुम्हाला तुमची दोन्ही मुले राजकारणात यशस्वी झालेली दिसत असताना तुमची भावनाही त्या राखीसारखीच आहे का?
नारायण राणे : (हसतहसत) माझी भावना नारायण राणे सारखी आहे. वेगळी नाही माझी भावना. माझी दोन्ही मुलं कर्तृत्ववान व्हावीत, अशी माझी इच्छा होती आणि दोन्ही मुलं शिक्षण, राजकारण आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांतच अतिशय चांगलं काम करताहेत. कर्तबगारी त्यांनी सिद्ध केलीय. त्यामुळे माझ्या अपेक्षा ते पूर्ण करताहेत.

प्रश्न : जेव्हा मुले शिकत होती, तेव्हा तुमची इच्छा त्यांनी राजकारणात यावे अशीच व्यवस्था घरामध्ये केली होता की ते ओघाओघानं होत गेलं?
नारायण राणे : हे ओघाओघानं झालं. माझी अजिबात इच्छा नव्हती की दोघांनी ही राजकारणात यावं.

प्रश्न : तुमची इच्छा काय होती?
नारायण राणे : त्यांनी व्यवसाय करावा. आपला जो व्यवसाय आहे तो अधिक वाढवावा, अशी माझी इच्छा होती. पण दोघेही राजकारणात आले.

प्रश्न : पण त्यांनी राजकारणात येऊ नये अशी तुमची इच्छा का होती?
नारायण राणे : मी राजकारणात आलो, यशस्वीही झालो. पण राजकारण दिवसेंदिवस ज्या प्रकारे बदलले जातेय आणि विश्वासार्हता हरपली जातेय, त्या राजकारणात माझ्या मुलांनी यावे, असे मला वाटत नव्हते. विश्वासार्हता नाही, एकमेकांबद्दल सुडाची भावना आलीये. निष्ठा, प्रामाणिकपणा याचे मूल्यमापन पद देताना होत नाही. मी अनेक गोष्टी सहन केल्या असतील. मुलांना त्या सहन करता येणार नाहीत कदाचित, म्हणून त्यांनी तिकडे येऊ नये, असे मला वाटले.

प्रश्न (नितेशला) : दादांची इच्छा तुम्ही राजकारणात येऊ नये अशी होती, तर तुम्ही बिझनेस वाढवावा, अशी होती. तुमच्या दोघांमध्ये निलेश आधी राजकारणात आले. त्यानंतर नितेश. तर मग दादांची इच्छा तुम्ही राजकारणात येऊ नये, अशी असताना तुमचा ओढा राजकारणाकडे कसा निर्माण झाला?
निलेश : जेव्हा त्यांच्याबरोबर आम्ही फिरायला लागलो. म्हणजे माझी जेव्हा सुरुवात झाली. मला असं वाटतं, तो संघर्षाचाच काळ होता. विरोधी पक्षनेते होते आणि दिवस-रात्र एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष चालायचा. आता त्यांचं (नारायण राणे) जीवन म्हणजे आपल्याला चांगलं माहित्येय. राणे असे शांत बसले व आम्हाला त्यांनी टेन्शन फ्री ठेवले, असे दिवस फार कमी आले. (हशा) ते स्वतः टेन्शनमध्ये आले आणि त्यांचा चेहरा बघितलात की ऑटोमॅटिक टेन्शन येते. म्हणून ते जसे राजकारणात वावरले. मला असे वाटते, ती प्रेरणा होती की, वडिलांना कुठेतरी माझी गरज लागेल. मग नितेश आला. लंडनला शिकला नि मग आला व जेव्हा आम्ही त्यांचा संघर्ष बघितला, तेव्हा कुठेतरी आम्हाला वाटले की, आमची मदत होईल म्हणून आम्ही राजकारणात आलो. तसे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना बघत बघत आम्ही मोठे झालो. म्हणजे आमचं दैवतच… त्यांना बघूनच, म्हणजे आजपण आम्ही जी काही भाषा वापरतो ती आमच्यातली शिवसेना गेलेली नाही, आम्ही तिथेच अडकलोय. नितेेश बऱ्यापैकी बीजेपीमध्ये आलाय. माझं अजून तिथेच आहे. कूळ…!
नितेश : राजकारणात असं मला तरी यायची कधी इच्छा नव्हती. मी २००६ पर्यंत लंडनमध्येच होतो आणि शिक्षण संपता संपता थोडा धाडस करून प्रयत्न केला. पहिले आईला सांगितले की, मला परत यायचं नाहीय. मला लंडनमध्ये राहणे शक्य आहे का? पण तो अर्धाच व्हिसा मिळाला, उर्वरित व्हिसा मिळू शकला नाही. म्हणून लंडनवरून मुंबईला यायला लागलं. कारण लहानपणापासून राजकारणात निलेशजी वडिलांसोबत शिवसेनेच्या काळात राहिलेले आहेत. ते फिरायचे अन् मी बाहेरगावीच होतो, कारण मी दहावी आणि अकरावीनंतर बाहेरगावी गेलो होतो आणि मी तिकडेच शिक्षण केलेले असल्यामुळे तसा जास्त इथे येण्याचा ओढाच नव्हता. पण वडिलांची भूमिका अतिशय स्पष्ट होती की, शिकल्यानंतर परत भारतात यायचे आणि व्यवसाय आणि काय त्या गोष्टी करायच्या. त्यामुळे परत आलो आणि आल्यानंतर हळूहळू एकेक गोष्टी घडत गेल्या.
ज्या वर्षी आलो २००६ आणि २००७ ला. तेव्हाच साहेबांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या, त्याच्यानंतर एकेक गोष्टी घडत गेल्या. २००९ला निवडणूक लढवण्यासाठी वडिलांनी एकदा विचारले. तेव्हा वाटलं, फार लवकर राजकारणात आलो आहे. थोडा महाराष्ट्र समजून घेतला पाहिजे. थोडं फिरलं पाहिजे. योग्य राजकारण समजून घेतले पाहिजे. मी म्हणून तेव्हा थांबलो आणि पुढे सर्व गोष्टी घडत गेल्या. आताचे राजकारण हे एक वेगळ्या दिशेला जात आहे. जसे साहेबांनी सांगितले ते अतिशय बरोबर आहे की, आगोदरचे राजकारण आणि आताचे राजकारणात फरक आहे. विश्वास कोणावर ठेवायचा आणि विश्वास ठेवल्यानंतर तो किती काळ टिकेल? याच्यावर फार विचार करून चालायला लागतं. निलेशने सांगितले की, मी भारतीय जनता पक्षामध्ये रुळलो आहे. कारण १२ वर्षे आम्ही काँग्रेसमध्ये असलो तरी काँग्रेसने कधी आम्हाला स्वीकारले नाही. नेहमी राणे समर्थक किंवा राणे हे वेगळेच आहेत म्हणून वेगळं ठेवलं आणि भारतीय जनता पक्षामध्ये आम्हाला एक परिवार म्हणून स्वीकारले आहे. जवळ घेतले आहे. त्यामुळे आज भारतीय जनता पक्षात कामे करायला मजा येते.

प्रश्न : तिघेही भाजपमध्ये आहात की…? (हशा)
नितेश (निलेशकडे हसून पाहत) : नाही हळूहळू त्याला आणणार…
निलेश : माझी वाट नका लावू. २०२४ मला लढवायची आहे. मेंबरशिप नंबर पण दाखवतो आपल्याला.(हशा)

प्रश्न : दादा तुमचे बालपण फार प्रतिकूल परिस्थितीत गेले. प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला शिकाव लागले. ती वेळ आपल्या मुलांवर येऊ नये, असे तुम्ही ठरवले होते आणि त्यांच्या शालेय जीवनाबद्दल तुम्ही अवेअर होतात का? की मुलं काय शिकत आहेत?
निलेश : आम्ही त्यांच्यापर्यंत ते (रिपोर्ट) कधी पोहोचू दिले नाहीत. (हशा).
नारायण राणे : मी कधीही आत्मचरित्र लिहिले, त्यामध्येही बालपणाचा उल्लेख केलेला नाही. मी आत्मचरित्र लिहिले तोही एक ठरावीक काळ घेऊन सुरुवात केली. मी जेव्हा पाचवीत होतो, तेव्हा माझे वडील मफतलाल मिलमध्ये नोकरीला होते. मी पाचवीत असताना माझे वडील आजारी पडले आणि त्यांना काम करणे अशक्य झाले आणि त्यांनी नोकरी सोडली व म्हणाले की, मला गावी जायचंय. इथे राहायचे नाही. मग ते माझ्या भावंडाना घेऊना गावी घेऊन गेले. आईने मला चेंबूर येथे माझ्या मामांकडे ठेवले आणि ते सगळे गावी गेले. मी एकटा मामांकडे राहत होतो. यात लहानपण जसे अपेक्षित असते तसे गेले नाही. पण मी कधी सांगायचा प्रयत्न करत नाही. लहानपणातच साहवीत चेंबूरला आलो आणि सातवीनंतर रात्र शाळेला जाऊ लागलो आणि सकाळी नोकरी करू लागलो. मी आठवी ते अकरावीपर्यंत सात नोकऱ्या केल्या. जुनी अकरावी पास झालो आणि मला आयकर विभागातून कॉल आला आणि त्यामध्ये मी लेखी, ओरल टेस्टमध्ये पास झालो व ती इन्कम टॅक्सची नोकरी मिळाली. मी क्रिकेट चांगले खेळायचो, त्यामुळे आयकर विभागाच्या टीममध्ये मी खेळायचो आणि बॅटिंग-बाॅलिंग दोन्ही करायचो, राजकारणात करतो तशी. (हशा) आणि तेव्हाही मी आठवीत असतानाच छोटे-मोठे मुंबईत व्यवसाय करू लागलो. जेव्हा नोकरीला लागलो तेव्हादेखील माझा स्वतःचा व्यवसाय करत होतो.

प्रश्न : छोटे-मोठे म्हणजे कोणकोणते व्यवसाय करत होतात?
नारायण राणे : मी स्पेअर पार्टचा बिझनेस सुरू केला. गॅरेज सुरू केले. फटाक्यांचा बिझनेस सुरू केला, हॉटेलच्या व्यावसायात मी आमदार झाल्यानंतर आलो. हे सर्व व्यवसाय मी लहानपणापसून करू लागलो. कारण मला शेवटी माझी लहान भावंडं… चार भाऊ व आई-वडील गावी राहायचे. त्यांना प्रत्येक महिन्याला काहीतरी मनिऑर्डर पाठवावी, असे मला वाटायचे. जरी आमची शेती असली तरी पुरेशी नव्हती. माझे वडील सांगायचे की, मला तुझ्या व्यवसायातले पैसे नको. म्हणून मी ३१ तारखेला जसा पगार व्हायचा तसा पूर्ण पगार मी मनिऑर्डर करत होतो.

प्रश्न : किती पगार होता ?
नारायण राणे : तेव्हा क्लार्कला दीड हजार पगार होता.

प्रश्न : किती साली? आणि ज्या सात प्रकारच्या नोकऱ्या केल्या त्या काय प्रकारच्या होत्या?
नारायण राणे : १९७१ साली. एक जोगेश्वरीला गमटेकमध्ये पहिली नोकरी २ रु. रोजावर केली. हिंदुस्तान मिलमध्ये सुपरवायझरची नोकरी केली. कॉटन ग्रीनला क्लासेस असायचे. पगार जास्त मिळायचे. मिलमध्ये विंग डिपार्टमेंटला काम करत होतो. पण मी ती सोडली. त्याच वेळेला आयकर विभागातून बोलवणं आलं आणि मी आयकरमध्ये गेलो. पण मी कधीही एकच व्यवसाय नाही केला.
मी ८४ साली नोकरी सोडली आणि कॉर्पोरेशनला उभा राहिलो. नोकरी सोडली आणि म्हटलं की, आपल्याला नोकरी नाही करायचीय. व्यवसायच करायचाय आणि मी कॉर्पोरेशनला स्टँडिंग कमिटीचे चेअरमन डॉ. मुजुमदार यांच्याविरोधात उभा राहिलो आणि चेंबूरला जिथे मी राहायचो, सुभाषनगर कॉलनीत, तेथे मराठी वस्ती फक्त १८ टक्के. त्या १८ टक्के वस्तीत मी निवडणुकीला उभे राहायचे ठरवले. मला तिकीटही मिळाले. साहजिकच तिथे हिंमत करत नव्हते कोणी, मला मिळाले आणि पहिल्याच वेळेला मी निवडूनही आलो. त्यामुळे मी फार स्ट्रगल करत करत इथपर्यंत आलोय. पण हे मी कुणाला सांगितले नाही की, मी लहानपण असं सोसलं, अमूक झालं, मामांकडे होतो. कधीच बोललो नाही.

प्रश्न : तुम्ही जी पहिली इलेक्शन लढलीत, ती प्रेमाने मला निवडून द्या, अशी होती की, राणे खाक्यामध्ये होती?
नारायण राणे : राणे पॅटर्न तयार केला मी. अशक्यच होतं म्हणजे वैचारिकदृष्ट्या प्रचार करून ती निवडणूक जिंकणे अशक्य होते.

प्रश्न : मग काय पॅटर्न केला?
नारायण राणे : नाही, ते सांगायचं नाही. (हशा) तो पॅटर्न नको. कारण लोक म्हणतील हे पिक्चर टाइप आहे. ओघाने आपण विचारलं म्हणून सांगतो मी. माझा मित्र आहे हाण्या परब. माझ्या पार्टनरसारखाच आहे. आदल्या रात्री, निवडणूक उद्या आहे. २४ एप्रिल १९८५ला. त्याला आठ वाजता बोलावलं. त्याला एक लिस्ट दिली. बाबा हे वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत. रात्री दहा वाजता आपल्या ऑफिसच्या कार्यालयात त्यांना बोलवं, घेऊन ये.
हो, तो येसच म्हणायचा. तो नाही केव्हा म्हणाला नाही आणि मी राऊंड मारून वगैरे दहा वाजता शिरलो. सगळे सीनियर लोक होते. मी लहान होतो आणि ते सगळेजण, आम्हाला का आणलंय, हे काय अमूक आहे तमूक आहे, असं बोलायला लागले. आमचं कार्यालय जिथे शिवसेनेचं होतं, तो मेन रोड स्टेशनला जातो. मी त्यांना म्हणालो, ऐकून घ्या, उद्या मला फक्त एक तास द्या. सकाळचा. मी तुम्हाला रिक्षात बसवेन. तुमच्या हातात हँडबिल माझी लोक देतील. समोर येणाऱ्या लोकांना सांगा, ‘धनुष्यबाण, नारायण राणे’ एवढंच बोला, बाकी काही बोलायचं नाही.
आता त्याने मते ज्या प्रकारे मिळवली ते काय मी सांगणार नाही. पण तिथली हंड्रेड पर्सेंट मते मला मिळाली. शेवटच्या, काऊंटिंगच्या वेळी शेवटचे बूथ येईपर्यंत मी पन्नास एक ७०-८० मतांनी मागे होतो. पण मला माहीत होते, शेवटचं बूथ आपलं आहे. मग तिथे ओपन झाल्यावर मी ७५० मतांनी जिंकलो. म्हणजे १०० टक्के तिथली मते होकारच होती. मी निवडणूक जिंकलो आणि यातूनच नारायण राणे उदयाला आला.

प्रश्न : आता यावर कोणी म्हणेल की पहिली निवडणूक ही नारायण राणे यांनी दांडगाईच्या जोरावर आणि पैशांच्या जोरावर जिंकली.
नारायण राणे (मिश्कीलपणे) : दांडगाई शब्द वापरला का मी? दांडगाई नाही. दम दिला नाही कोणाला. बस एवढंच, ‘हे बघा हँडबिल घ्या, धनुष्यबाण…’ किती चांगल्या भाषेत सांगितले, दांडगाई वगैरे काही नाही.

प्रश्न (निलेश-नितेशला) : यांचं लक्ष असायचं का तुमच्या शाळेबद्दल? तुम्ही शाळेत काय करताय याच्याबद्दल?
नितेश : साहेबांबद्दल मी एवढंच सांगेन की, ठीक आहे ते दौरे खूप करायचे, म्हणजे कामामध्ये अतिशय व्यस्त असायचे. आमची आईच आमच्या दोघांचा अभ्यास आणि सगळ्या गोष्टी करायची. पण साहेब पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत, आता नातवांबद्दल असेल. शिक्षणासंदर्भात साहेब अतिशय सीरियस म्हणजे शिक्षणाबद्दल काही तडजोड नाही. जेव्हा जेव्हा घरी यायचे, तेव्हा आई सांगायचीच. पण त्यांचीही उत्सुकता असायची की, याच्यामध्ये काय चाललंय? नेमकं काय चाललंय? कुठे आहे? आणि सगळ्या काही गोष्टी रिपोर्ट कार्डच्या निमित्ताने कळायच्या.
नारायण राणे : तुम्हाला एक सांगतो मी, आमच्या घरात फार डिसिप्लीन आहे. बाहेर आम्ही कसेही इंडिव्हिज्युअल असलो तरी घरातली शांती प्रत्येकजण पाळतो. आता माझ्यामुळे पाळतो असे नाही. प्रत्येकजण एक ठरावीक वेळेच्या आत घरी यायचे. ठरावीक वेळेला एका टेबलावर जेवायला बसायचं. शाळेत एवढे गुण, टक्के मिळायलाच पाहिजेत. निलेश एक सांगायचा की, ‘बाबा ६०च्या वर अपेक्षा करू नका. मी पास होणार. पण अपेक्षा करू नका.’ नितेश सांगितल्याप्रमाणे तोही करायचा. आमच्या घरात डिसिप्लीन तेव्हाही, ४३ वर्षे झाली माझ्या लग्नाला. आमच्या घरात काही… आणि आमच्या घरात दुसरं एक आहे, कोणालाही व्यसन नाही. घरात आमच्या चालत नाही. कोण सिगारेट प्यायलेला अमुक प्यायलेला, आलेला पण चालत नाही. घरात शिस्त आहे. माझे नातू एक ६ वर्षांचा आहे, तर एक १२ वर्षांचा आहे. तेसुद्धा आता घरात जे कल्चर आहे त्याप्रमाणे वागतात. आम्ही बाहेर असलो तरी आमचा पहिला व्यवसाय. तिघेही आम्ही व्यावसायिक आहोत. मी व्यावसायिक होतो, शिकून आल्यानंतर एकदम राजकारणात नाही. हे तुझं ऑफिस, हा तुझा व्यवसाय, हे तू सांभाळायचं, वाढवायचं, तू सांगायचे… आम्ही एकत्र बसतो. व्यवसाय कुठे? काय? आम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहोत. अनेक क्षेत्रांत आहोत. फिश एक्सपोर्टमध्ये आहोत. व्यवसायाला पहिलं प्राधान्य. राजकारण दोन नंबर आहे.

प्रश्न (निलेश-नितेश) : पण हे स्वातंत्र्य तुम्हाला होतं का, की हा व्यवसाय मला करायचाय की नाही? की दादांनी सांगितलं की, हा तुझा व्यवसाय… हा तू करायचा. की हे तुझे ऑफिस… व्यवसाय… मला ठरवू दे असं झालंय?
निलेश राणे : बऱ्यापैकी तेच ठरवतात, कारण का मला परत घरी जायचंय! (हशा) आणि आतापर्यंत तरी तसं त्यांनीच जे जे सुरू केलं, त्यालाच यश मिळत गेलं. ते आपण कुठे तरी व्हॉट्सअॅपवर ऐकतो ना, ‘मजा तर आपण आई-वडिलांच्या पैशावर मारतो. आपल्या पैशाने तर फक्त गरजा पूर्ण झाल्या.’ ते खरंच आहे. जिथे जिथे नितेशने काही स्वतःहून व्यवसाय सुरू केले असतील, मीही काही सुरू केलेत. जास्त प्रमाणात यश आलं नाही. पण त्यांनी जिथे जिथे हात ठेवलाय आणि सांगितलं का, आजपासून याचा रिझल्ट मला दे. तो रिझल्ट देवाच्या कृपेने आणि त्यांचा हात होता म्हणून ते सगळं यश मिळत गेलं. पण हो, आपला प्रश्न जसा होता, की हे बघायचं… ठरलं… मग तिथे पुढे यू टर्न नाही.

प्रश्न : तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा तुमच्या करिअरच्या बाबतीत घरात त्यांचं आईचं किंवा दादांचं त्याच्या बाबतीत दबाव होता? की तुम्हाला स्वातंत्र्य होते?
निलेश : खरं तर मला क्रिकेटरच व्हायचं होतं. ते म्हणायचे, तुला व्हायचं तर तू हो. मग बाळासाहेबांना बघून, त्यांचा प्रवास बघून… मला असे वाटलं की, नाही, सचिन एकच होऊ शकतो म्हणून ते क्षेत्र नको. हा जो प्रवास आहे, म्हणजे तेव्हा शिवाजी पार्कला झेंडे लावताना पण एक वेगळी मजा असायची, हाफ पँटमध्ये! तेव्हा काय आतासारखं डिजिटलमध्ये नसायचं. ती वेगळी मजा होती. आम्ही सगळे मित्र जायचो. म्हणून तेवढं स्वातंत्र्य त्यांनी नेहमी दिलं की, तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. राजकारणातच या आणि याच मतदारसंघात उभा राहा, असं कधीच नाही. तुला वाटेल, जिथून तू निवडून येशील, तो मतदारसंघ तू निवडायचा, तेवढं स्वातंत्र्य घरामध्ये होते.
नितेश : मला कसं वकील होण्याची इच्छा फार होती. फार धाडस करून, एमबीएच्या अगोदर, फार धाडस करून बाबांना सांगायला गेलो की, मी एलएल.बी. करू का? थोडा वेळ गप्प बसून, त्यांच्या पद्धतीने माझ्याकडे बघितलं आणि सांगितले की, नितेश एक तुला सांगू का… ते एक साहेबांबद्दल मी सांगतो की, ते ‘नाही’ का बोलतात? याच्याबद्दल ते समजून सांगतात. असं नाही की, बाबा तू नाही करायचं. तू निघून जा, असा विषय नाही. पण त्याच्याबद्दल त्यांची एक भूमिका आहे. ते समजून सांगतात की, नितेश हे बघ तू या क्षेत्रात आहेस, तर तू बिझनेस केलास, तर त्याचे हे फायदे आहेत आणि त्यांनी एक सांगितले की, नितेश आपण वकील बनण्यापेक्षा वकिलांना हायर केलंस, तर तुला जास्त फायदा आहे! आणि ती अ‍ॅडव्हॉइस आता मी घेतोय चांगल्या पद्धतीने. भरपूर वकिलांची फौज आजूबाजूला आहे. त्यामुळे प्रत्येक विषय त्यांनी का ‘नाही’ करायचा? ते व्यवस्थित पद्धतीने सांगायचे म्हणून आम्हाला पटायचे आणि त्या पद्धतीने आम्ही जायचो.
नारायण राणे : आपण एक प्रश्न विचारला की, मी यांच्यावर फोर्स करायचो का? यांचा अभ्यास कधी पाहायचो का? हे दोघेही अमेरिकेत होते. कधी कधी याला (निलेश) बरं नसायचं, कधी याला (नितेश) नसायचं. आम्ही रात्री फोन करायचो तेव्हा तिकडे दिवस असायचा. बरं नसलं का आम्ही दोघंही नवरा-बायको जागे राहायचो. परत तो बरा आहे का हे ऐकेपर्यंत. भले उद्या सकाळी मीटिंग असूदे, हाऊस असूदे. ते केल्याशिवाय निलेश किंवा नितेश बरा आहे हे ऐकल्याशिवाय झोपायचो नाही आणि मी नेहमी बोलायचो. ते कुठेही असू देत, आजही दौऱ्यावर गेलो तरीही कुठे आहेस? कोणती सभा आहे? मी दोघांचीही डिटेल घेतो आणि मीच नाही, तर दर दोन-चार तासांनी मिसेस त्यांच्या संपर्कात असते, बोलते. आमच्याकडे हे को-ऑर्डिनेशन अतिशय चांगलं आहे.

प्रश्न : आता मध्यंतरी आपल्याकडे जेव्हा महाराष्ट्रातल्या राजकारणाची पातळी खाली जातेय, असे जेव्हा बोलले जाते तेव्हा भाजपकडून संजय राऊत आणि शिवसेनेच्या काही नेत्यांकडे बोट दाखवले जाते आणि विरोधी पक्षांकडून खासकरून नितेश आणि निलेश यांच्याकडे बोट दाखवले जाते आणि जर आपल्याला ती पातळी सावरायची असेल, तर त्यांना आधी गप्प करा, त्यांना आधी शांत करा, असं बोललं जाते, तर तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे?
नारायण राणे : माझं असं मत आहे, ज्याअर्थी नितेश, निलेशबद्दल तक्रार संजय राऊत आणि बाकीचे करतात. तेव्हा मला वाटते, नितेश, निलेश योग्य काम करतात. (हशा) दखल घेतली ना विरोधकांनी! विरोधक दखल घेताहेत म्हणजे आपली मुलं चांगले काम करताहेत. बरं ते काय व्यसन करत नाही. कोणाला दारू पिऊन बोलत नाहीत. ते बोलताहेत आणि दोघेही शिकलेत. वेल क्वाॅलिफाइड आहेत. अज्ञानाने तर काही बोलत नाहीत ते. बरं ते अभ्यास करताहेत. दोघांच्याही बेडरूममध्ये जातो आणि पाहतो ते कोणती पुस्तकं वाचतात, हे दोघेही. वाचनही त्यांचं असते तसं. हा आता एकतर काय दोघंही इंग्लिश मीडियममधून शिकलेत. त्यामुळे मराठी बोलताना एक वेळ चूक होऊ शकते. पण त्यांना जे बोलायचंय, ते बोलत असताना, आता वय आहे, आमचे राणेंचं रक्त आहे, त्यामुळे ते अग्रेसिव्ह असणारच ना. त्यामध्ये काय चुकीचं आहे? आणि मी पण सुरुवातीला येताना माझ्याकडे बोट असेच दाखवले लोकांनी… तेव्हा बाळासाहेब म्हणायचे, ‘त्याचा तो स्वभाव आहे. त्याला जे दिसत तो परखड बोलणारच’ मग साहेबांनी माझं रक्षण केलं, तर माझं काम आहे, कामच आहे.
नितेश : एक आवर्जून सांगतो, आमच्या दोघांच्या वतीने की, आता उल्लेख केला आमच्या भाषेबद्दल किंवा कधी काय आमचं बोलणं हे वैयक्तिक असते. पण आम्ही आज कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते आहोत. निलेशजी खासदार राहिलेले आहेत. आज मी आमदार आहे. पण त्याच्या अगोदर कुणाची तरी मुले आहोत. कधीही कुठलेही प्रकरण काढा. चुकीची वैयक्तिक टीका, राजकीय टीका झालीच पाहिजे, आम्ही राजकीय क्षेत्रात आहोत. वडिलांच्या बाबतीत टीका करणं, आम्ही ज्यांच्याबरोबर काम करतो, त्या वरिष्ठ नेत्यांबद्दल टीका करणं. पण टीका जर का वैयक्तिक झाली, तर सगळ्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये वडिलांना शिवी घालण्यापर्यंत मजल जाते. असंख्य उदाहरणे तुम्हाला देऊ शकतो. मग आम्ही आमदार-खासदारांच्या आधी मुलं आहोत. आम्हालाही भावना आहेत. तुम्ही ज्या संबंधित लोकांबरोबर आम्ही टीका करतो, त्या प्रत्येकाला विचारा किंवा त्यांच्या मुलांना विचारा इथे बोलवून की, बाबा हाच विषय जर का तुझ्या वडिलांबाबत झाला, तुझ्या नातेवाइकांबाबत झाला, तुझ्या आईबद्दल झाला, तर तुझी काय भावना असेल? मला वाटतं आपण पत्रकार होण्याच्या आगोदर कोणाचे तरी वडील आहात, कोणाचे तरी मुलं आहात म्हणून मला असे वाटते की, ही भावना आमचीही समजली पाहिजे. जेव्हा निलेशजींच्या ट्वीटबद्दल असंख्य लोक बोलतात म्हणजे पातळी बरोबर आहे का? पण निलेशजी ती टीका का करतात? त्याच्या अगोदर झालेली टीका कोणीच बघत नाही. त्या संबंधित राजकीय लोक, ते आपापल्या अनुभवाने मोठे असतील. पण जेव्हा आमच्या वडिलांबद्दल, आमच्या कुटुंबाबद्दल खालच्या पातळीवर जेव्हा टीका होते ना साहेब, तेव्हा बोलणं हे क्रमप्राप्त असतं आणि त्यानुसार आम्ही टीका करतो. कधीही पहिला वार किंवा पहिलं बोलणं, अामचं दोघांचं तुम्हाला कधीच सापडणार नाही.

प्रश्न : माझे दोन प्रश्न आहेत. पहिले राणेसाहेबांना आहे. अापण आताच भाषेबद्दल बोललो. या दोघांच्या भाषेबद्दल बोललो. पण एकंदरीतच बघितलं, तर सुरुवातीला आपणसुद्धा म्हटलंत, ज्या पद्धतीने राजकारणाचा आज जो दर्जा झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलंय की, कटुता संपवायला पाहिजे. सकाळी संजय राऊत आले होते, त्यांनीसुद्धा एकंदरीत ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, यावर त्यांचेसुद्धा आक्षेप अाहेत. आता एकंदरीत बघितले तर सगळेजण इंडिविज्युअली जेव्हा बोलतात तेव्हा, जे काही महाराष्ट्रात सुरू आहे त्याबद्दल कोणीच खूश नाही. मात्र शेवटी पाऊल मागे कोण घेणार?
नारायण राणे : तुम्ही ज्यांचं नाव घेतलंत. मला नाव घ्यायचं नाहीय. एक तर संपादक आहेत आणि मराठी भाषेच्या एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. मी एकतर प्रिंट मीडिया आणि मोस्टली मराठी. यांचे पहिले अग्रलेख वाचतो. सकाळी नऊच्या आत. सर्व वृतपत्रांचे अग्रलेख लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स सगळे अगदी सामन्याचा पण वाचतो. त्यात जर आपण वैचरिक विचार, मार्गदर्शन, बौद्धिकता, कुठल्या वृत्तपत्राच्या संपादकांकडून शिकता येते, अनुभवता येते, ते मी पाहतो. ज्याचे तुम्ही नाव घेतले, त्यांचे लेख वाचा. सच्चाई, काय भाषा! मागे त्यांना अटक झाली, त्यानंतरची त्यांची भाषण काढा. किती शिव्या, किती अपशब्द!
कुठल्या राजकारणी एवढ्या खालच्या थराला गेला नाही. ही अशी भाषा असावी? एका संपादकाची, एका शिवसेना नेत्याची? असू दे. मागे म्हणजे त्यांनी पाय आता मागे घेणे त्यांना क्रमप्रात आहे कारण, राजकारणात संजय राऊत यांनी स्वत:च राजकारणामध्ये लक्ष्मणरेषा घातली. माणसाने जबाबदारीने वागले पाहिजे, जर ठीक आहे माझे राजकारण संपत असेल. वर समाजात येणारी तरुण पिढी, पुरुष, महिला असतील. त्यांच्यासाठी काहीतरी वैचारिक, बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक काही तरी या क्षेत्रातील काही सोडाल की नाही? स्वत:ही काही करायचे नाही. फक्त शिव्या घाला. हा असा, तो तमूक तसा… ठीक आहे, माझ्याबद्दल जो काही बोलले. हा जेव्हा शिवसेनेत आला, तेव्हा मी नगरसेवक होतो. बेस्टमध्ये चेअरमन होतो. हा केव्हा आला? हा तेव्हा एका मराठी साप्ताहिकमधून लोकप्रभातून माननीय बाळासाहेब, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फार लिहिले आहे. माझ्याकडे ती पुस्तिका प्रहारमध्ये छापलेली आहे. किती घाणेरडे लिहिले आहे – कपडे उतरवील, मला जर तिकीट नाही दिले तर… ही त्याचीच भाषा आहे. काय-काय लिहिले तेव्हा. शिवसेनेत नव्हता. त्यानंतर शिवसेनेत आला आणि आल्यानंतर त्याला कळलं संपादक बनून चालणार नाही, नेते बनले पाहिजे आणि म्हणून बाळासाहेबांनी जेव्हा राजकारणाकडे दुर्लक्ष करत उद्धवकडे राजकारण देत गेले. तशी उद्धवला त्याची गरज भासली. आज तुम्ही सांगा, साहेब असताना आणि तेव्हा हा नुसता संपादक असताना, शिवसेना कोणत्या स्थानावर होती? कसे नेते होते? त्यांची वैचरिकता, त्यांचा रिस्पेक्ट समाजात काय होता? आज एकतरी नेता दाखवा शिवसेनेचा… जो बौद्धिक आणि सन्मानपूर्वक वैचारिकदृष्ट्या बोलेन आणि समाजाला प्रभावित करेल असा एक शिवसेनेचा नेता दाखवा. जो शिवसेनेचे काम, कार्य सांगेल की, आम्ही हे निर्णय घेतले, आमची सत्ता होती. कोण नाहीच सांगणार. नाहीच. फक्त शिव्या, हा असा आहे, तसा आहे… अमूक आहे… हे काय तुम्हाला लायसन्स दिले आहे का तुम्हीच बोलू शकता? माझं म्हणणं आहे मी बाकीच्या कोणाबद्दल त्या भाषेत बोललो? संजय राऊतांबद्दलच का बोलतो? कारण, तो कोणाची इज्जत ठेवत नाही, वरून घरातून उतरायचं आणि पत्रकारांना बोलवायचं आणि काहीतरी भाष्य करणार, त्याची एक वेगळी प्रभात असते. आपण शुभ प्रभात करतो.

त्याची एक वेगळीच प्रभात चालू होते. हो काय आहे तो माणूस आहे की, काय? मी त्याला माणसात आहे, असे आजिबात समजत नाही. फक्त शिव्या देणे घाणेरडे बोलणं एवढंच माहिती आणि स्वत: जे काय आहेत ना अजूनही महाराष्ट्रात, माझ्यासह, माझ्या मुलांसह यांची बरीच माहिती अाहे ठाकरे लोकांची. ठाकरे म्हणजे उद्धवबद्दल बोलतोय. सर्वांबद्दल नाही. बाकीचे आज आलेले ठाकरे नाही. नाहीतर उद्या बोलाल. आम्ही जर निपजलो नसतो, साहेबांना अभिप्रेत शिवसेनेत, तर शिवसेना पुढे आली नसती. त्यासाठी आमचा फार त्यागच आहे. हा कुठे होता तेव्हा?

१९६६ ला आमच्यासारख्यांचीच गरज होती. मी हाफ पँट घालून पैसे असो नसो साहेबांच्या मागे असायचो. आम्ही त्या त्यागासाठी कोणतीही पर्वा केली नव्हती. आमचे उद्या काय होईल कधीही पर्वा केली नाही. माझे लग्न झाले १९७९ला, दुसऱ्याच दिवशी मला पाठवले की, इथे लक्ष द्या. माझे आई-वडील सांगत होते की, या क्षेत्रात जाऊ नको. आम्ही वाचलो ती आमच्या आई-वडिलांची पुण्याई. पण हा जो आहे याला बोलायचा काही अधिकार नाही. हा आयत्या बिळावरचा नागोबा आहे. तो आला शिवसेना सत्तेत आल्यानंतर. आहे पगारावरचा माणूस. त्याची प्रॉपर्टी बघा किती आहे. किती संपादकांचं स्वत:चं असं घर आहे. कांजूर गावात पण त्याने बोलू नये. गप्प बसावे. नाहीतर संन्यास घ्यावा किंवा कुठेतरी जावे. तशीही याची फार वाईट अवस्था होणार आहे.

प्रश्न : आज इकडे चौथी खुर्ची असायला हवी होती.
१९७९ ते आतापर्यंत तुमचा जो संसाराचा प्रवास झाला, त्याबद्दल तुमचे तुमच्या सहकारणीबद्दलची थोडी माहिती द्याल?
नारायण राणे : माझ्या आणि मुलांच्या प्रगतीमध्ये माझ्या पत्नीचा माझ्यापेक्षाही मोठा वाटा आहे. मुलांचं बालपण, संगोपन, शिक्षण आजही सगळ्या गोष्टी म्हणजे याला काय लागते? मला काय लागते? मी दौऱ्यावर असताना औषध घेतले की नाही, हे सर्व आजही ती पाहते. आज जे यशस्वी कुटुंब तुम्ही म्हणालात, त्याचे सर्व श्रेय माझ्या पत्नीला जाते आणि तो वारसा माझ्या सुनापण चालवत आहेत.

प्रश्न : तुमच्या पत्नीच्या मते, त्यांना जास्त बोलू दिले जात नाही. कारण तुम्ही तिथे व्यासपीठावर असता आणि जास्त बोलत असता.
नारायण राणे : बोलणं म्हणजे आणि सर्वजण संध्याकाळी सहा ते सात घरी टेरेसवर जातो. आणि एकमेकांचे बोलणे होत असते. मला ४३ वर्षांत कोणाला दम द्यावा लागला नाही. फक्त त्यांना सांगतील की बाबा हे करू नकोस बस झाले. की तो सरळ होतो. बाहेर कोणीही आमच्याबद्दल काहीही बोलो घरात आम्ही सरळ असतो. त्यामुळे आमच्यात काही भांडण नाही, तंटा नाही.

प्रश्न (निलेशकडे पाहत) : तुमच्याकडे चांगला ह्यूमर आहे. पण व्यासपीठावर तुम्ही अँग्री यंग मॅन म्हणून असता.
निलेश : साहेबांची जी काही ख्याती आहे तिला साजेसं आम्हाला राहावे लागते. त्यामुळे कडकपण हा चेहऱ्यावर आणावा लागतो. तसेच आम्ही जे काही काम करतो त्या कामाचे आम्हाला परिणाम जागच्या जागी हवे असतात. त्यामुळे आम्हाला कडक भूमिका घ्यावी लागते.

प्रश्न (ज्ञानदा) : घरात काही वाद निर्माण झाला, तर तो कोणत्या भाषेत होतो? मालवणीत की मराठीत?
नारायण राणे : तुम्ही पण सिंधुदुर्गातल्या आहात. त्यामुळे तेथील घरात एकतरी दिवसातून बाचाबाची होते. त्याशिवाय दिवस जात नाही आणि संसार म्हटले की, बाचाबाची होणार. त्यामध्ये एक इटालियन म्हण आहे की, पती-पत्नीमध्ये एकाने बहिरे व्हावे लागते आणि एकाने आंधळे व्हावे लागते, हे मी लग्न झाल्यानंतर माझ्या बायकोला म्हणालो होतो. त्यामुळे कोणती भूमिका कोणी घ्यावी ते कळते. त्याप्रमाणे आम्ही वागतो. त्यामुळे आमच्यात कधीच काही नाही. मी कुठून कुठे आहे, बांद्रा हाऊसिंग बोर्डमध्ये राहायचो, तेथून मी चेंबूरला आलो. हाऊसिंग बोर्डमध्ये तुम्हाला माहिती आहे की, केवढ्या खोल्या असतात. मी अनेक पदे सांभाळत इथपर्यंत आलो. नगरसेवक, बेस्ट चेअरमन, आमदार, मंत्री, जवळपास १३ ते १४ खात्यांचा मंत्री मी झालो. त्यानंतर खासदार, मुख्यमंत्री, गृहमंत्री हे सर्व सांभाळत मी माझ्या मुलांना वेळ दिला. तसेच त्यांनीही मला संपूर्ण टाइम राजकारणात वेळ मिळावा म्हणून प्रयत्न केले.

तुम्ही विचारले, मुलांकडे, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष होते का? तर मी त्यांची विचारपूस करत असे. तसेच ते जेव्हा अमेरिकेत शिक्षण घेत होते. तेव्हा मी माझी पत्नी आणि वर्षाला एकदा जात असत. पण आम्हाला माहिती आहे दोघेही मुले ही व्यवस्थित आहेत. ते आपले शिक्षण व्यवस्थित घेत आहेत. एअरपोर्टला त्यांना मी एक गोष्ट सांगितली. जाताना त्यांनी मला नमस्कार केला. मी म्हटले बघा जाताय शिकून परत इथेच यायचे आहे. दुसरे आपल्या नात्यातील किंवा कोणी ओळखीचे दिसले, तर जाऊन नमस्कार करायचा आणि आपले संस्कार त्यांना दाखवायचे. तिसरे त्यांना सांगितले की, व्यसन अजिबात नाही करायचे. शनिवारी क्लबमध्ये जाणे ही आपली संस्कृती नाही.

प्रश्न : आज दोघेही चांगल्या पदावर आहेत. त्यात तुम्ही समाधानी आहात की काही अपेक्षा आहेत?
नारायण राणे : दोघेही चांगल्या पदावर आहेत. त्याबद्दल मी समाधानी आहे. तसेच पुढे त्यांनी वरची पदे गाठावी अशी अपेक्षा आहे.

ज्ञानदा : तुम्ही तिघेही इथे आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करत आहोत.
नारायण राणे : आभार व्यक्त करण्याअगोदर तुम्ही माझा महाकट्टा याची ११ वर्षे पूर्ण केली, ती १०० व्हावीत, यशस्वी व्हावीत, एबीपी माझाची लोकप्रियता वाढत जावी, तसेच तुम्ही राजकीय नेत्यांची माहिती देता तशी तुम्ही शैक्षणिक, भौगोलिक, नवीन तंत्रज्ञान याची माहिती तरूण पिढीला कशी देता येईल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. मी एमएसएमई मंत्री आहे, मी दिल्लीत सुद्धा हे केले आहे. अमेरिका, जपानची लेटेस्ट टेक्नॉलॉजी भारतीय उद्योगधंद्यात यावी त्यामुळे भारत एक आत्मनिर्भर भारत व्हावा, एक महासत्ता बनावा यासाठी तुमचे योगदान असावे. धन्यवाद.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -