मे महिना! नवे काही शिकणे, पाहणे, ऐकणे, अनुभवणे यासाठी सर्वसामान्यांपासून मान्यवर लेखकांनी लिहिलेली प्रवास वर्णनं या मोठ्या सुट्टीत वाचावीत. स्वानुभवातून स्थलदर्शन होते! २०१९च्या नोव्हेंबरमध्ये आम्ही दोघांनी वीस दिवसांत ऑस्ट्रलियातील पाच शहरांना स्वतंत्रपणे भेट दिली. आजपर्यंत अनेकांनी अनेक ठिकाणी सूर्यास्त पहिले; परंतु फिलिप बेटावरील सूर्यास्त आणि सूर्यास्तानंतरची पेंग्विन परेड पाहणे, खरोखरंच अविस्मरणीय अनुभव. हीच जगप्रसिद्ध, अद्वितीय, एकमेव पेंग्विन परेड पाहण्यासाठी ग्रे लाइन बसमार्फत फिलिप बेटाच्या भेटीचे आरक्षण केले.
आरक्षणाची कथा – मेलबर्न, व्हिक्टोरिया राज्याची राजधानी. मेलबर्नवरून पेंग्विन पॅरेड आणि ग्रेट ओशन रोड या अर्ध दिवसीय सहलीच्या आरक्षणासाठी फिल्डर्स रेल्वे स्टेशन जवळ आलो. मोशन चित्रपट ACMI च्या पुढे सहल बुथवर या दोन सहलींचे आरक्षण तिकीट दर आम्हाला जास्त वाटल्याने सवलतीच्या शोधात मागे फिरलो. जागोजागी ऑस्ट्रेलियन टुरिझम विभागाचे लाल ड्रेस घातलेले स्वयंसेवक मदतीला तत्पर होते. त्यापैकी एकाकडून अर्धे तिकिटासंबंधी समजले. फेडरेशन चौकाच्या जवळच मुख्य रस्त्याला सरकारमान्य अधिकृत अर्धे तिकीट ऑफिस आहे. अर्धे तिकिटाची सवलत फक्त रोख पैसे भरल्यास उपलब्ध आहे. कार्ड चालत नाही. आम्ही त्याचा फायदा घेतला. तरी मनात सहल होईपर्यंत धाकधूक होती.
सॅन रेमो शहरातील आदिवासी बुनुरोंग लोक मासेमारीसाठी समरलँड बीचवर येत होते. १७९८ मध्ये युरोपियन नाविक जॉज बास यांनी या बेटाचा शोध लावला. फिलिप बेट समरलँड प्रदेशात आहे. १९२०मध्ये समरलँड बेटावरील काही रहिवाशांनी पेंग्विनला बुरुजातून परताना पहिले. न्यू साऊथ वेल्सचे पहिले गव्हर्नर आर्थर फिलिप्स यांचे नाव त्या बेटाला देण्यात आले. १९३९ मध्ये सॅन रेमो ते फिलिप बेटांपर्यंत पूल बांधण्यात आला आणि फिलिप बेटांवर जागतिक पर्यटन उद्योग सुरू झाला.
फिलिप बेट हे मेलबर्न, व्हिक्टोरियाच्या दक्षिण पूर्वेस १२५ किमी अंतरावर आहे. फिलिप बेट हा पाणथळ प्रदेश असून १०१ चौ. कि. मी. भागावर पसरलेला मोठा विस्तृत लँड स्केप! मोठी खडकाळ किनारपट्टी, छोटी छोटी झुडपे, २६ कि. मी. लांबीच्या या बेटामुळे येथे समुद्री लाटा अडविल्या जातात. या बेटाभोवतीच्या समुद्रांत २५००० पेक्षा जास्त पेंग्विन राहतात. येथे छोट्या पेंग्विन पक्ष्याचा मोठा अधिवास आहे. दहा-बारा घरट्यांचा समूह म्हणजे एक वसाहत. वाळूत, झुडपात, जमिनीच्या बिळात, खडकाळ कपारीत पेंग्विनची बिळे आहेत. त्यातले काही हजार सूर्यास्तानंतर लहान पेंग्विन समुद्राच्या लाटेबरोबर बाहेर येऊन काही अंतर चालत आपल्या घराकडे परततात. हीच पेंग्विन परेड.
फिलिपबेटाच्या सहलीत मार्गदर्शक अतिशय अनुभवी होते. पूर्ण प्रवासांत सर्वांशी संवाद साधत गाडीतूनच रस्त्यावरील स्थळाची माहिती देत होते. ऑस्ट्रलियातील विशेष वनस्पती बरोबर आणून त्याची माहिती सांगितली. या सहलीत वन्यजीव उद्यान आणि कोआला संवर्धन केंद्र ह्या दोन ठिकाणी थांबलो. मुख्यतः तेथे सारे फ्रेश झाले. त्या उद्यानात ऑस्ट्रेलियातील मूळ वन्य जीव कांगारू, वॉलबीज, कोआला, इमू पाहिले. हेच वन्य जीव फिलिप बेटाजवळ निसर्गात फिरताना पुन्हा बघितले.
फिलिप बेटावर जाण्यापूर्वी अंदाजे १ किमी लांबीच्या किनाऱ्यालगतच्या टेकड्यांमधून सुरक्षित वॉक बोर्ड आहे. त्यावरून अगदी सहजपणे, सुलभपणे चालता येते. चालताना दूरवर असलेली खाडी, त्याच खाडीत वर आलेला मोठा दगड, काही व्ह्यू पॉइंट, सभोवतालच्या खडकाळ भागात पेंग्विनची घरे पाहिली. एखादा पेंग्विन दिसतो का? कुतूहलाने, शोधक नजरेने नजर फिरत होती, त्यावेळी कुठे माहीत होते, नंतर जवळून त्यांना पाहणार आहोत.
सूर्यास्ताच्या अर्धा तास आधी व्ह्यूइंग प्लॅटफॉर्म पर्यटकांनी भरला जातो. साऱ्यांच्या नजरा समुद्राकडे केंद्रित असतानाच, अंधार पसरताच ८/१० जणांचा छोटा पेंग्विन गट बाहेर येऊन चालू लागताच पर्यटकांत एकच औत्सुक्याची लहर उमटते. त्यांचे स्वागत केले जाते. नंतर सातत्याने, गटागटाने ते येतच राहतात. आपले न उडणारे पंख हलवत, डुलत डुलत, थोडे फेंगडे चालत, आपल्याच नादात असतात. पेंग्विन उजवीकडून घराकडे जाताना पाहताच सारे त्या दिशेला गेले. सुरक्षित वॉक बोर्डवर सारे उभे राहून शांतपणे, निःशब्दपणे त्यांना अगदी जवळून न्याहाळत होतो. घरट्यातून येणाऱ्या आवाजाचा कानोसा घेत, बिळापाशी थोडा वेळ थांबून, काही पेंग्विन बिळात शिरतात, नाहीतर पुढे जातात. चोचीत तोंड भरून आणलेला खाऊ बाळाला भरवितात. असे हे अनोखे आई-मुलाचे नाते! त्यावेळी हळू दबक्या आवाजात उमटलेल्या भिन्न भाषेतील प्रतिक्रिया एकच होत्या. पेंग्विनला कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा प्रकाश अपायकारक असल्याने पेंग्विनचे फोटो काढू नका, असे सांगूनही हळूच फोटो काढले जातात. पेंग्विन कुटुंबप्रिय आहेत. पेंग्विन पक्षाची घरवापसी पाहणे ही पर्यटकांसाठी
अपूर्व पर्वणीच!
पेंग्विन पक्षी : दक्षिण गोलार्धात आढळणारा, पंख असूनही न उडणारा, समुद्रात/समुद्रकिनारी/बर्फात राहणाऱ्या पेंग्विन पक्षाचे शरीर पोहण्यास अनुकूल आहे. पेंग्विन उत्तम पोहणारा, अन्नासाठी महासागरावर अवलंबून असतो. पेंग्विनचे डोळे मोठे, पिवळ्या रंगाची लहान मान, बदकाप्रमाणे लहान पण मजबूत पाय, हे पाय शरीराच्या मागे म्हणून पेंग्विन सरळ उभा राहू शकतो. पेंग्विनचे शरीर लांबट आहे. शेपटी लहान, उंची अंदाजे ३३ से मी., वजन १ किलो, दात नाहीत, चोचीने खातो. काळ्या-पांढऱ्या रंगाचा, त्यांचे पंख फ्लॅपर्सप्रमाणे आहेत. शरीरावर जाड चरबी, पेंग्विन पक्षी सतत एकमेकांच्या आवाजातून एकमेकांना ओळखतात. त्यांना बर्फ वितळण्याचा, प्लास्टिकचा आणि तेल गळतीपासून धोका आहे.
फिलिप आयलंड नेचर पार्क येथील नोबीज केंद्रात पेंग्विनसह अन्य वनस्पती, प्राण्यांचे संरक्षण, संवर्धनासोबत प्रगत तंत्रज्ञानातून अभ्यास केला जातो. अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. फिलिप बेटाजवळ अजूनही पाहण्यासारखे आहे. आम्ही फक्त दिवसभर खोल समुद्रात मासेमारी केल्यानंतर, पोट भरल्यानंतर अंदाजे ४५ मिनिटांचा छोट्या पेंग्विन पक्षाचा समुद्र ते घराच्या बुरूजापर्यंतचा वास्तव प्रवास अनुभवाला, त्या प्रवासाचे साक्षीदार झालो. मुंबईच्या जिजामाता प्राणिसंग्रहालयात हम्बोल्ट पेंग्विन पार्कमध्ये आपल्याला (सात) पेंग्विन पक्षी पाहायला मिळतात.
mbk1801@gmail.com
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…