-
विशेष: सुरक्षा श. घोसाळकर, पवई
कुटुंब संस्थेतील महत्त्वाचे घटक म्हणजे स्त्री-पुरुष या दोघांनाही मुक्तपणे एकमेकांचे विचार एकमेकांना पटवून देणे. एकमेकांच्या सवयींमध्ये तडजोड करणे गरजेचे आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण, निवडलेले कार्यक्षेत्र, जीवनसाथी आणि समाजातील स्थान हे अतिशय महत्त्वाचे असते. लग्नासाठी मुलीचे वय कमीतकमी १८ वर्षे व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे कायद्याने बंधनकारक आहे. याचाच दुसरा अर्थ दोघांनी शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्ट्या सक्षम होऊन मुलीपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलाने त्याच्या कुटुंबात पत्नी म्हणून कायमस्वरूपी वास्तव्याला येणाऱ्या मुलीकरिता भावनिक व सुरक्षित वातावरण निर्मितीची जबाबदारी स्वीकारणे व मुलीने आदरयुक्त दोन्ही कुटुंबांतील दुवा होणे हा बदल सध्याच्या घटस्फोटाच्या वाढत्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अपेक्षित आहे.
लग्न हा एक संस्कार आहे. त्यानुसार कायद्यात बसणाऱ्या समाजमान्य पद्धतीने एक सज्ञान स्त्री आणि एक सज्ञान पुरुष यांच्यात जवळकीचे व लैंगिक नाते विवाह संस्था संस्कृतीस अनुलक्षून केलेला कायदेशीर करार असतो. विवाह याचा अर्थ विशेष जबाबदारीची जाणीव यापुढे घेणे. हे एक प्रकारचे वचन व सामाजिक बंधन आहे.
लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सप्तपदी. यातील सात वचनांचा अर्थ दोघांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देणे हाच आहे. एकमेकांच्या आयुष्यात अढळ स्थान राहो. यासाठी ध्रुव ताऱ्याची साक्ष घेण्यात येते. शरीरातील सात चक्र, सात सूर, इंद्रधनुष्याचे सात रंग, सात ऋषी, सात द्वीप, सात परिक्रमा या सर्व गोष्टी सात असल्याने सप्तपदीला महत्त्व आहे. यामध्ये दोघांनी एकमेकांना योग्य सन्मान देत आयुष्यामध्ये हव्या असलेल्या गोष्टींचे धेय्य पूर्ण करण्यासाठी एकत्र पुढे चालण्याची प्रार्थना असते. मानसिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक पातळ्यांवर एकता ठेवून एकमेकांवर कायम प्रामाणिकपणे प्रेम करत राहणे, जीवनातील प्रत्येक चढ-उतारांमध्ये एकमेकांची सुरक्षा आणि साथ देणे, सर्वकाही एकत्र सहन करण्याची ताकद असणे, संतुलित आणि आनंदमयी जीवन जगण्यासाठी एकमेकांप्रती प्रेम, भक्ती, सन्मान, प्रामाणिकपणा, योग्य निर्णय क्षमता अपेक्षित आहे. कुटुंबामध्ये सगळ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी एकात्मतेची शिकवण असते. जन्माला आलेल्या मुलांचे संगोपन करताना त्यांना कर्तृत्ववान करण्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुजाण पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्याची योग्य क्षमता निर्माण करणे.
लग्नानंतर जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलतो. तो बदल स्वीकारण्याची मानसिकता तयार करणे महत्त्वाचे. वैवाहिक जीवनातून दोघांच्याही सुखासाठी, विकासासाठी आणि पूर्णत्वासाठी आवश्यक सेवा सहयोगाची, प्रेमाची, निःस्वार्थ त्यागाची भावना अपेक्षित असते. कारण प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता संविधानाने दिलेली आहे. त्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास मतभेद निर्माण होतात. औद्योगिक क्रांती आणि शिक्षणाच्या प्रसाराने विवाहयोग्य मुलं-मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत आहेत; परंतु बहुतांशी घटनांमध्ये त्यांच्यामध्ये मूल्य शिक्षणाचा अभाव जाणवतो. सध्याच्या युगात स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सहज पाच वर्षे देतात; परंतु संसाराची तयारी करण्यासाठी, जोडीदार निवडण्यासाठी काही तास किंवा मिनिटे दिली जातात. योग्य शहानिशा न करता विवाह संकेत स्थळ, सोशल मीडियाच्या आहारी जातात. सिनेतारकांचे अनुकरण करून त्यांच्या प्रमाणे महागडे कपडे, दागदागिने खरेदी, लग्नपत्रिका, लग्नाआधीचे फोटो शूट, मेहंदी, नृत्य दिग्दर्शक बोलावून चित्रपटातील गाण्यांवर दोन्ही परिवारात नृत्य करण्याची स्पर्धा, लग्न सोहळा अविस्मरणीय थाटामाटात करण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंग, हनिमून पॅकेज यांसारख्या इव्हेंटवर ऐश्वर्य आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन करण्यासाठी वेळ आणि ऋण काढून लग्न हा संस्कार आहे हे विसरून पैसा खर्च करण्याकडे कल वाढलेला आहे. त्यावेळी बचतीचे सल्ले देणाऱ्याला मागासलेल्या विचारांचा म्हणून अवहेलना केली जाते.
रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी जसे तज्ज्ञ ड्रायव्हिंग प्रशिक्षण, शाळेतून गाडी चालविण्याचे प्रशिक्षण व परवाना घेतला जातो. तसेच वैवाहिक जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी योग्य संस्कारांचे प्रशिक्षण व समुपदेशन घेणे बंधनकारक केले पाहिजे. केवळ वयात आले म्हणून बिघडलेल्या, नाकर्त्या, व्यसनी मुला-मुलींना सुधारण्यासाठी, शरीर संबंधाची सोय म्हणून लग्न या संस्काराचा दुरुपयोग करू नये. विवाहबाह्य लैंगिकसंबंध, हुंडा, एखाद्या विषयावर प्रतिस्पर्ध्यासारखे भांडल्याने नात्यात नकारात्मकता निर्माण होऊ शकते. जी व्यक्ती प्रेमात धन, संपत्ती, पदाचा अभिमान कधीच दाखवत नाही, आत्मसन्मान जपत सुरक्षित वाटेल, असे वातावरण निर्माण करते. त्यांचेच नाते दीर्घकाळ टिकते.
महाविद्यालयात जसे नवीन विद्यार्थ्यांने प्रवेश घेतल्यावर रॅगिंग केले जाते. त्याप्रमाणे गृहप्रवेशानंतर काही दिवसांतच नवविवाहितेचे मानसिक, भावनिक प्रसंगी शारीरिक पातळीवर रॅगिंग सुरू होते. मुलाला साधा चहा करता येत नाही, असे कौतुकाने सांगणारी वरमाई सुनेने मात्र हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतलेल्या हवाई सुंदरी, परिचारिकेप्रमाणे कुटुंबातील सदस्यांना सेवा देण्याची अपेक्षा करते. स्वतःच्या मुलाची संगत आणि सवयी इतके वर्षे बदलू न शकणारे सुनेकडून त्वरित बदलाची अपेक्षा करतात. तिथेच वादाची पहिली ठिणगी पडते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमच्या घराची पद्धतच किती योग्य आहे, याबद्दल टोमण्यांसारख्या धारदार शस्त्रांचा वापर व प्रसंगी माहेरचा उद्धार केला जातो. त्यामध्ये जर प्रेमविवाह असेल तर लग्न करून घरात प्रवेश देऊन उपकार केल्याची जाणीव पदोपदी दिली जाते. अशावेळी चुकून सासऱ्याने बाजू घेतल्यास सासूचा अपमान होतो. कारण तिच्या सासूने दिलेल्या त्रासाचा बदला घेण्याच्या स्वातंत्र्यात अडथळा निर्माण होतो. स्त्री कितीही कर्तबगार असली तरी घरात तिला दुय्यम स्थान दिले जाते. सासरच्या घरात वारंवार हे आमचे घर आहे असे म्हणून ती आश्रित असल्याची जाणीव करून दिल्याने तिच्या मानसिक खच्चीकरणाला सुरुवात होते. ती स्वतः अर्थार्जन करत असली तरी स्वतःच्या इच्छेप्रमाणे पैसे खर्च करण्याची मुभा दिली जात नाही. नोकरी व घरच्यांची सेवा अशी तारेवरची कसरत करताना तिची तारांबळ उडते. स्वतः स्वावलंबी, सक्षम नसलेला नवरा मिळाल्यास परक्या घरी मानसिक आधार मिळणे अशक्य होते. कित्येकदा लग्न म्हणजे मनमानी पद्धतीने अनैसर्गिकरीत्या स्त्रीच्या मनाविरुद्ध शरीरसुख मिळविण्याचा परवाना मिळाल्याप्रमाणे नवऱ्याकडून अधिकार गाजविला जातो, तेव्हा इकडे आड तिकडे विहीर अशी पत्नीची बिकट अवस्था होते. कित्येकदा गर्भधारणा व गर्भपात या स्त्रीच्या वैयक्तिक अधिकाराकडे, आरोग्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. अशावेळी आयुष्यभर जपलेल्या आणि वाढवलेल्या मुलीला परक्या घरी द्यायची वेळ येते तेव्हा भावनाप्रधान झालेले पालक मात्र कन्यादान करून सुटकेचा श्वास घेतल्यासारखे अमानुषपणे तिच्यावर होणाऱ्या कौटुंबिक हिंसेकडे दुर्लक्ष करतात. कारण, लग्न जुळवताना त्यांनी नवऱ्याचे पत्रिकेतील गुण, सॅलरी पॅकेज, त्याच्या आई-वडिलांची श्रीमंती, समाजातील प्रतिष्ठेला प्राधान्य दिलेले असते. नवऱ्या मुलाचे स्वकर्तृत्व, त्याच्या सवयी, व्यसन याला झुकते माप दिलेले असते. माझ्या मुलीच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा, तिला दैनंदिन कामात सहकार्य करणारा जावई असावा मात्र माझ्या सुनेने मात्र कुटुंबातील सर्वांची मर्जी सांभाळताना मुलाने केलेले सहकार्य खपवून घेतले जात नाही, या मानसिकतेमध्ये बदल होणे आवश्यक आहे.
आजची स्त्री विविध क्षेत्रांत आघाडीवर आहे; परंतु घरातील सर्व कामे, जबाबदाऱ्या उरकून जावे ही अपेक्षा आजही प्रत्येक घरात दडलेली आहे. यातून त्या स्त्रीचे होणारे शारीरिक व मानसिक शोषण, तिला स्वतःसाठी न मिळणारा वेळ, धावपळीचे आयुष्य त्यातून निर्माण होणारे शारीरिक प्रश्न आणि अशामधून निर्माण होणारी नवीन अशक्त पिढी. समाज उभारणीचा सशक्त पाया म्हणजे कुटुंब संस्था आणि या कुटुंब संस्थेतील महत्त्वाचे घटक म्हणजे स्त्री-पुरुष या दोघांनाही मुक्तपणे एकमेकांचे विचार एकमेकांना पटवून देणे. एकमेकांच्या सवयींमध्ये तडजोड करणे गरजेचे आहे. ही झाली एक बाजू. तटस्थपणे भूमिका मांडताना दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची ठरते.
मुलगा आणि मुलगी दोघांच्या मनावर लहानपणापासून झालेले संस्कार, त्यांची संगत व सवयी यांचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर प्रभाव पाडतात. लाडात वाढलेली मुलगी सासरी गेल्यावर केवळ नवऱ्याला केंद्रस्थानी ठेवून कुटुंबाची सामूहिक जबाबदारी नाकारते. स्वतःच्या असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व देते. वारंवार माहेरच्या सेवा-सुविधांसंदर्भात सासरी तुलना करते. छोट्या-छोट्या गैरसोयीच्या वेळी तडजोड करण्यास नकार देते. नात्यातल्या किंवा मैत्रिणींच्या राहणीमानानुसार नवऱ्याकडे अपेक्षा करते. दोघांनाही एकमेकांच्या मित्रमंडळीविषयी आक्षेप, सोशल मीडियाचा अतिरेक, संशय, निर्माण होतो. स्वयंकेंद्री झाल्यामुळे वारंवार होणारी भांडणे यामुळे त्यांच्या मुलांना सरकारी अनाथाश्रम व वृद्ध माता-पित्याला वृद्धाश्रमाचा आसरा घ्यावा लागतो.
नैसर्गिक ऋतूचक्राप्रमाणे मानवी सहजीवनाचे चक्र विस्कळीत होते. त्याच्या दुष्परिणामांना कुटुंबासोबत समाजालाही सामोरे जावे लागते. त्यावर रामबाण उपाय म्हणजे लग्नापूर्वी वास्तवतेचे भान ठेवून आत्मपरीक्षण व सहजीवनाकरिता तज्ज्ञांचे समुपदेशन होय. ज्यांच्यामुळे घटस्फोटांचे प्रमाण, न्यायासाठी खर्च होणारा पैसा व वेळ यावर नियंत्रण येऊन विवाह संस्थेचे पावित्र्य राखण्यास सहकार्य होईल. तसेच उत्कृष्ट मानवी संबंध प्रस्थापित होतील.