चेन्नई (वृत्तसंस्था) : मथिशा पथिराणासह गोलंदाजी विभागाने केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. त्यानंतर फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हा सामना गमावल्याने गत सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी मुंबईने गमावली. चेन्नईने मुंबईचा सहा विकेटने पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
मुंबईने दिलेले १४० धावांचे आव्हान चेन्नईने १४ चेंडू आणि सहा विकेट राखून सहज पार केले. चेन्नईकडून कॉनवे याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. मुंबईच्या नेहाल वढेराची अर्धशतकी झुंज व्यर्थ गेली. यंदाच्या हंगामात चेन्नईने मुंबईचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे.
मुंबईने दिलेल्या १४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी दमदार फलंदाजी केली. दोघांनी चार षटकांत ४६ धावांची सलामी दिली. ऋतुराज गायकवाडने १६ चेंडूंत ३० धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले. ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि कॉनवे यांनी डाव सावरला. अजिंक्य रहाणे याला चावलाने बाद केले. अजिंक्य रहाणेने १७ चेंडूंत २१ धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर अनुभवी अंबाती रायडूने कॉनवेला साथ दिली. पण स्टब्सच्या गोलंदाजीवर रायडू बाद झाला. अंबाती रायडूने ११ चेंडूंत १२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार लगावला. रायडू बाद झाल्यानंतर शिवम दुबे आणि कॉनवे यांनी चेन्नईची धावसंख्या वाढवली. अखेरीस मधवाल याने कॉनवेला बाद करत चेन्नईला चौथा धक्का दिला. कॉनवेने संयमी फलंदाजी करत चेन्नईची धावसंख्या हलती ठेवली. कॉनवेने ४२ चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. अखेरीस शिवम दुबेने धोनीच्या साथीने चेन्नईला विजय मिळवून दिला. शिवम दुबेने तीन षटकारांसह नाबाद २६ धावांची खेळी केली. धोनी दोन धावांवर नाबाद राहिला. पीयूष चावलाचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. पीयूष चावलाने चार षटकांत २५ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. स्टब्स आणि मधवाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. चेन्नईच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईची फलंदाजी ढेपाळली. मुंबईने निर्धारित २० षटकांत आठ विकेटच्या मोबदल्यात १३९ धावांपर्यंत मजल मारली. पथिराणाने चेन्नईकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. नेहाल वढेराचे अर्धशतक वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पॉवर प्लेमध्ये मुंबईच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. पहिल्या चेंडूपासूनच चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. मुंबईकडून सलामीला ईशान किशन सोबत कॅमरून ग्रीन मैदानात आला होता. पण मुंबईचा हा डाव अपयशी ठरला. कॅमरुन ग्रीनला तुषार देशपांडे याने त्रिफाळाचीत केले. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार रोहित शर्माला भोपळाही फोडता आला नाही. ईशान किशनही सात धावा काढून माघारी परतला. पॉवरप्लेमध्ये मुंबईने तीन महत्त्वाच्या विकेट गमावत फक्त ३४ धावा केल्या होत्या. चेन्नईकडून पथीराणाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. चार षटकार पथीराणा याने फक्त १५ धावा खर्च केल्या. दीपक चहर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर रविंद्र जाडेजा याने एक विकेट घेतली.