Share
  • रवींद्र तांबे

कोकणामध्ये घराच्या पुढच्या दरवाजाच्या समोरची जी मोकळी जागा असते, त्या जागेला सपाट करून तीन बाजूने कठडा बांधला जातो. त्या जागेला कोकणात खळे असे म्हणतात. या ठिकाणी बसल्यावर ऊन लागू नये किंवा डोक्यावर काही पडू नये म्हणून मांडव घातला जातो. तो सुद्धा घराच्या पावळेक लागून. कोकणी माणूस प्रशिक्षित नसला तरी उत्तम प्रकारे मांडवाची सजावट करतो. लग्नकार्याला तर बघायलाच नको. प्रत्येक मेढीला आंब्याचे टाळ बांधणे आणि मांडवाला रंगीबेरंगी पताका लावल्यामुळे मुंबईतील एसीच्या हॉलपेक्षा मांडवाचा रुबाबच काही वेगळाच असतो. आजही अशा मांडवाचे ग्रामीण भागात आकर्षण आहे. त्यात फॅन लावलेले नसूनसुद्धा मांडवाच्या आजूबाजूची झाडे फॅनची उणीव भासू देत नाहीत.

घराच्या समोर मांडव घालणे ही पण एक कला आहे; परंतु खळ्यात मांडव घालणे सर्वांना जमतेच असे नाही. त्यात कोकणी माणूस फार चतुर असतो. चाकरमानी गावी गेल्यावर तो मांडवाखाली बसून विसावा घेत असतो. इतकेच काय रात्रीसुद्धा याच मांडवाखाली झोपतो. पुन्हा सुट्टी संपल्यावर रोजीरोटीसाठी शहरात जाताना दोन्ही हात जोडून डोळ्यांत पाणी भरून परतीच्या प्रवासाला निघतो. मनातल्या मनात पुटपुटतो, ‘जगलंय वाचलंय तर पुन्हा पुढच्या वर्षी तुज्या सावलीखाली आसरा घ्यायला येईन. चुकला मापला, तर माप कर.’ इतकेच काय घरातील एखादे लग्नकार्य म्हणा किंवा वाडीची बैठक सुद्धा मांडवाखाली बसून घेतली जात असते. तेव्हा काही लोक म्हणायचे अमुकाच्या खळ्यात बैठक घेत असून मांडव साक्षीदार आहे. विशेष म्हणजे कोणतेही काम असो मांडवाखाली बैठकीचे आयोजन केले जाते. इतके कोकणामध्ये मांडवाला महत्त्व आहे. आम्ही मांडवात गोट्यांनीही खेळायचो. त्यात चाकरमान्यांची मुले एकत्र गोळा झाल्यावर क्रिकेटसुद्धा खेळायचो. काही ठिकाणी एका बाजूला मांडवात कावान काढून बैलांनासुद्धा रात्रीच्या वेळी बांधले जाते. असे हे आता लवकरच इतिहासात जमा होणार ते म्हणजे, कोकणातील घरासमोरील मांडव होय.

कोकणातील घरासमोरील मांडवाविषयी…

घराच्या दरवाजासमोरची जागा सपाट करून झाल्यावर त्याच्या चारी बाजूच्या कोपऱ्यात एकाच उंचीच्या मेढी पायरीने नॅम काढून पुरले जाते. बऱ्याच वेळा मेढी या आयनाच्या वापरण्यात येतात. सर्रास घराच्या खळ्याच्या जागेचा विचार करून मेढी किती घालायचे हे घरमालक ठरवितो. मात्र घराला साजेसा मांडव घातला जातो. मेढी आमने-सामने पुरल्या जातात. त्यावर आडवा वासा ठेवला जातो. त्यानंतर अंदाजे एका फुटाच्या अंतराने आडवे चिव्याचे बांबू ठेवले जातात. त्यानंतर एक बांबू सरळ ठेवून खात्याच्या दोरीने वेणीप्रमाणे बांधले जाते. त्यावर तांबटीच्या गवताच्या पेंढ्या बांधून एका लाइनीत लावल्या जातात. त्यावर भूईमुगाचा गुळा, कुळदाचा गुळा तसेच पयानाच्या पेंढ्यासुद्धा ठेवण्यात येतात. बऱ्याच वेळा जमिनीवर माच करून ठेवल्यामुळे मोकाट जनावरे नासधूस करतात. तेव्हा मांडवावर ठेवल्यामुळे मोकाट सुटलेल्या जनावरांच्यापासून गवत सुरक्षित राहते.

महत्त्वाची बाबा म्हणजे, खळ्यात बसण्यासाठी आता चटई घालत असलो तरी मी लहान असताना बांबूच्या बेळांनी विणलेली डाळी घालायची. त्याआधी सर्व जागा कुदळाने खणून माती सारखी करायचे. सारख्या केलेल्या मातीत पाणी घालून ओली केली जायची. त्यानंतर दोन-तीन दिवस सुकवायचे. वाळत जमीन आली की,चोपन्यांनी जमीन चोपायची. पूर्ण जमीन वाळल्यानंतर मातीचा गिलावा घेतला जायचा. त्यानंतर शेणांनी सारवन करून घ्यायचो. त्यावर घरातील आयाबाया सफेद खडी फुगत घालून तिचे घट्ट पाणी करून त्यात कापड ओले करून हातात घरून चार बोटांनी नक्षीदार कणे खळ्याच्या बाजूने व मध्यभागी काढायचे. आता जरी त्याची जागा रांगोळीने घेतली तरी कण्याची सर त्याला यायची नाही. त्यात डाळी घालून बसल्यावर ताजमहालमध्ये बसल्यासारखे वाटायचे. त्याचबरोबर त्याठिकाणी बसल्यावर आनंद काही वेगळाच असायचा. नंतर जुन्या आठवणींना उजाळा दिला जात असे.

मी लहान असताना पावसाळ्यातील चार महिने सोडले, तर माझे उठणे, बसणे, झोपणे व अभ्यास असे सर्व काही मांडवाखाली असायचे. मांडव हेच माझे सर्वकाही होते. अलीकडे मात्र मांडवाचे स्वरूप बदलून टाकले आहे. खळ्यात कायम स्वरूपी चार कोपऱ्यात व मध्यभागी बाजूने चिऱ्याचे खांब उभे केले आहेत. त्यावर लोखंडी पाइप टाकून पत्रा टाकण्यात आला आहे. म्हणजे दरवर्षी मांडव घालायला नको. असे असले तरी गवत घातलेल्या मांडवाखाली बसण्या-उठण्याची मजाच काही वेगळी असते. तशी बंदिस्त पत्र्याच्या मांडवाखाली येणार नाही. आता फक्त मांडवाच्या आठवणी असल्या तरी अजून काही ठिकाणी घरामध्ये उष्णता येऊ नये म्हणून गावकरी मांडव घालत असतात.

Recent Posts

Horoscope: जुलै महिन्यात या ४ राशींचे जीवन होणार सुखकर, होणार हे बदल

मुंबई: जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जुलै २०२४मध्ये ४ मोठे ग्रह शुक्र, बुध, मंगळ आणि…

7 mins ago

Indian Team: टीम इंडियाच्या परतण्याला पुन्हा उशीर, चक्रवाती वादळामुळे सातत्याने येतायत अडचणी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…

1 hour ago

आजपासून महाग Jioचे सर्व प्लान, ग्राहकांना द्यावे लागणार इतके पैसे

मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…

2 hours ago

Belly Fat: १५ दिवसांत बाहेर निघालेले पोट होईल कमी, वापरा हे उपाय

मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या…

3 hours ago

हिंदूंचा अपमान हा विरोधकांचा अजेंडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…

12 hours ago

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त वयाची मर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढवली

कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…

12 hours ago