उत्सव आंबा खरेदी आणि स्वादाचा

Share
  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

आंबा म्हटला की, हापूस आणि तोही रत्नागिरी – देवगड यापैकी कोकणातला असेल, तरच तो खरा हापूस! असं एक घट्ट समीकरण वर्षानुवर्षांपासून आपल्या डोक्यात रुजलेलं असताना आज त्या अस्सल हापूसच्या नावाखाली बाजारात नकली हापूसने अक्षरशः धुमाकूळ माजवलेला आहे. कोकणच्या राजाला संपूर्ण जगात जो नावलौकिक आणि सन्मान मिळाला त्यामुळे या नावाभोवती एक वलय निर्माण झालं आणि मग त्यातूनच त्याचं बाजारीकरण झालं. आंबा महोत्सवात असली-नकलीची भेसळ झाली आणि त्यामुळे ‘कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो…’ ऐवजी आता ‘कोकणच्या राजा बाई खो खो खेळतो,’ असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. मात्र चाणाक्ष आंबेप्रेमी दोहोतला फरक अगदी अचूकपणे ओळखतात बरं!

माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीत घडलेला एक किस्सा या ठिकाणी मला सांगावासा वाटतो. माझी ही मैत्रीण मुंबईतली असली तरी मूळ कोकणातली आणि आंब्याची अचूक पारख असलेली! काही कारणाने तिचा नेहमीच्या आंबेवाल्याने यंदा स्टॉल न लावल्याने ती एका दुसऱ्या आंबेवाल्याकडे गेली.

‘असली देवगढ है बहेनजी,’ असे म्हणून त्याने एक आंबा तिच्यासमोर कापून दाखवला. तो खरोखरच अस्सल होता. तरी पण तिला थोडा संशय आला आणि म्हणून तिने त्याला पेटी उघडायला सांगितली. पेटी उघडल्यानंतर आतमध्ये असलेलं पेपर पॅकिंग दाक्षिणात्य भाषेतल्या वर्तमानपत्रांचं आढळलं. तेव्हा त्याला ते दाखवत ती म्हणाली, ‘अरे भय्या, यह तो कर्नाटक हापूस है!’ त्यावर हा धूर्त विक्रेता तिला म्हणतो कसा, ‘अरे बहेनजी, वो तो रद्दी उधर से इधर जाती है ना…’

मग तिने स्वतः एक पिकलेला आंबा निवडला आणि त्याला कापायला सांगितला तर तो आतून पिवळा जर्द आणि चवीला अत्यंत आंबट निघाला. तिचा मुद्दा सिद्ध झालेला होता. विक्रेता खजील झाला. खऱ्या आंबेपारख्याला कोणी सहजी फसवू शकत नाही हेच खरं!

अर्थात अस्सल हापूस आंबा कसा ओळखायचा याचं तंत्र सांगून मात्र समजू शकणार नाही. अहो, कारण कस्तुरीचा गंध कसा असतो याचं वर्णन कसं करणार? अमृताच्या स्वादाची रेसिपी कशी लिहिणार? किंवा लता मंगेशकरांच्या आवाजातला गोडवा वर्णन करून कसा सांगणार? तो अनुभवल्यानेच कळतो ना? आंब्याच्या गंध आणि चवीचंदेखील तसंच आहे. ती एक अनुभूती आहे. निरंतर आम्रप्रेम आणि अनुभवाने ती सिद्ध होते, एवढंच सांगता येईल! सोनं खरेदी करताना आपण जशी आपल्या नेहमीच्या सुवर्णकाराकडूनच खरेदी करतो. कारण तिथे दर्जा आणि विश्वास यांची हमी असते तसंच काहीसं आंबे खरेदीच्या बाबतीत सुद्धा म्हणता येईल.

मात्र आंबा खरेदी करण्याचीही एक पद्धत असते. कारण, आंबा म्हणजे काही स्वयंपाक घरातली भाजी नव्हे, की द्या हो दोन किलो किंवा दोन जुड्या द्या आणि भरल्या पिशवीत. असं काही आंब्याच्या बाबतीत घडत नाही. आंबा खरेदी करताना प्रत्येक फळ न् फळ नीट पारखून घेतलं जातं. आधी पेटीतला किंवा हारीतला आंबा आपल्या हाती घ्यायचा. त्यावर प्रेमाने दुसरा हात फिरवायचा. मग अनिमिष नेत्रांनी कटाक्ष टाकत त्याचं रंग-रूप न्याहाळायचं. कुठे डागाळलेला तर नाही ना? कुठे हिरवाच राहिला नाही ना? किंवा कुठे काही कीड वगैरे तर नाही ना? याची खातरजमा केल्यानंतर मग तो आंबा आपल्या हातात धरून हलकेच आपल्या नाकापाशी नेऊन त्याचा गंध आपल्या रोमारोमात भरभरून घ्यायचा. मग पुन्हा त्या फळाकडे पाहायचं, पुन्हा गंध घ्यायचा, फळ उलट सुलट करून पुन्हा पुन्हा नीट पारखायचं. हो, अगदी सोन्याचा दागिना आपण जसा पारखतो ना, तसंच आंब्याचंही आहे आणि मग आंबा पुन्हा त्याच्या जागेवर ठेवत किमतीसाठी दुकानदाराशी घासाघीस करायची. आपण भाव आधीच पाडून सांगणं आणि दुकानदाराने आधीच तो वाढवून सांगणं हे गणित ठरलेलंच असतं. त्यातून सुवर्णमध्य काढून एका ठरावीक दरावर आल्यानंतर आता आंबे किती घ्यायचे ते ठरवायचं. म्हणजे डझन, दोन डझन की अर्धाच डझन? काहीजण संपूर्ण पेटी घेतात. कारण ते फायदेशीर ठरतं. काहीजण सुट्टे आंबे घेणं पसंत करतात. आणि मग अशा प्रकारे फळांच्या राजाचं घरात आगमन होतं. पूर्वी अक्षय तृतीयेच्या सणापासून आंबा खाण्यास सुरुवात होत असे. आज-काल तेवढी वाट पाहायला सवड कोणाला आहे? बाजारात आंबा आला रे आला की, तो केव्हा एकदा आपल्या घरी येतो आणि आपण तो चाखतो असं होऊन जातं. असो! कालाय तस्मै नमः… दुसरं काय?

आता घरी आलेल्या या राजमान्य राजश्री आंब्यांचा रस करण्याची देखील एक विशिष्ट पद्धत असते बरं का! प्रथम चांगले पिकलेले आंबे निवडून ते थंड पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवायचे म्हणजे त्यांच्यातील त्यातील उष्णता निघून जाते म्हणे. पाण्याने कूल कूल झालेला आंबा स्वच्छ पुसून हलक्या हाताने तो मऊ करण्यास सुरुवात करावी. मऊ करताना अत्यंत काळजीपूर्वक, खालून वरच्या दिशेने, आंबा फुटणार नाही याची पुरेपूर काळजी घेत तो मऊ करावा. त्यानंतर मऊ केलेले आंबे स्वच्छ पातेल्यात पिळून त्याचा रस काढून त्यात वेलची पूड किंवा मिरपूड टाकावी. चवीसाठी काही जण थोडी साखरही टाकतात. अशा प्रकारे तो केशरी जर्द आमरस चमच्या चमच्याने चवीने खाताना किंवा पुरीसोबत ओरपताना ब्रह्मानंदी टाळी न लागली तरच की हो नवल! आपल्यासाठी हाच खरा आम्र महोत्सव असतो!

तर प्रिय वाचकहो, असं हे अमृतमयी आम्रफल आपणा सर्वांवर सदैव प्रसन्न राहून ते आपणास भरभरून मिळत राहो, हीच ॠतुराज वसंताच्या चरणी विनम्र प्रार्थना!

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २९ जून २०२४.

पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी…

2 hours ago

जनहितैषी अर्थसंकल्प!

ज्या अर्थसंकल्पाची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता व आतुरता होती, तो अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार…

5 hours ago

एनडीए सरकारचा नवा संकल्प हवा

रवींद्र तांबे केंद्रात सरकार स्थापन झाले की, सर्वांचे लक्ष लागलेले असते ते म्हणजे देशाच्या केंद्रीय…

6 hours ago

एनटीएच्या अक्षम्य घोडचुका…

हरीश बुटले, करिअर सल्लागार पेपरफुटी किंवा सॉल्व्हर गँग हे समाजकंटक आणि नतद्रष्ट लोकांचे काम आहे…

6 hours ago

पैसाच पैसा, टी-२० वर्ल्डकप विजेता संघ होणार मालामाल, रनर-अप संघावरही कोट्यावधींचा पाऊस

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) सुरू होण्याआधीच या स्पर्धेसाठी एकूण…

9 hours ago

Jio आणि Airtel युजर्स स्वस्तामध्ये करू शकता रिचार्ज, २ जुलैपर्यंत आहे संधी

मुंबई: जिओ(jio) आणि एअरटेलने(airtel) आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांनी आपले प्लान्स…

10 hours ago