-
प्रासंगिक : डॉ. राजेश कार्यकर्ते
बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, XBB.1.16 संक्रमित रुग्णांची लक्षणे आणि परिणाम इतर ओमिक्रोन संक्रमित व्यक्तींसारखेच आहेत. हा अभ्यास जिनोम सिक्वेनसिंग प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी SARS-CoV-2 विषाणूची उत्क्रांती आणि त्याचे महामारीविषयक ट्रेंड समजून घेण्यासाठी भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) च्या SARS-CoV-2 विषाणूंच्या जनुकीय अनुक्रमाचा (Genome Sequencing) एक भाग म्हणून महाराष्ट्रात केला आहे. तपासासाठी आवश्यक असलेली जनुकीय अनुक्रमे (Genome sequences) ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लुएंझा डेटा (GISAID) येथून पुनर्प्राप्त करण्यात आली, हे जनुकीय अनुक्रम १ डिसेंबर २०२२ पासून ते ८ एप्रिल २०२३ पर्यंत, भारतातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जमा करण्यात आले होते.
एप्रिल २०२३ पर्यंतचे जनुकीय अनुक्रम क्युरेट करून, नंतर त्यांचे वंश (lineage) आणि फायलोजेनेटिक विश्लेषण केले गेले. महाराष्ट्रातील रुग्णांचा शास्त्रीय आणि क्लिनिकल डेटा प्राप्त करण्यात आला आहे. लोकसंख्याशास्त्रीय डेटासाठी, महाराष्ट्रातील रुग्णांचे वय, लिंग, निवासस्थान, संपर्क क्रमांक आणि नमुना संकलन आणि RTPCR चाचणीच्या दिनांकाबद्दलची माहिती रुग्णांकडून गोळा केली गेली. २६ एप्रिल रोजी, अभ्यासाचे निष्कर्ष medRxiv वर प्रकाशित झाले, (हे एक आरोग्य विज्ञान-संबंधित पोर्टल आहे) २०२३च्या पाचव्या आठवड्यात भारतातील XBB.1.16 चे प्रमाण ९.३०% होते, तर २०२३ च्या १३ व्या आठवड्यात हे प्रमाण ७९.१७% पर्यंत वाढले. भारतातील जनुकीय अनुक्रम नमुन्यांमध्ये XBB.1.16 चे (३६.१७%) वर्चस्व सर्वात आढळून आले, त्यानंतर XBB.2.3 (१२.११%) आणि XBB.1.5 (१०.३६%). XBB.1.16 संक्रमित रुग्णांमध्ये लक्षणात्मक रोग सौम्य लक्षणांसह, ताप, खोकला, नाका संबंधित लक्षणे, अंगदुखी आणि थकवा आढळून आला. काही रुग्णांमध्ये कॉमोरबिडीटी नोंदवली गेली, ज्यामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह आणि दमा यांचा समावेश होता.
बहुसंख्य XBB.1.16 संक्रमित रोगी गृहविलगीकरणात (Home isolation) होते, काही रुग्णांना हॉस्पिटल किंवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याची तर काही रुग्णांना ऑक्सिजन थेरपीची आवश्यकता भासली. XBB.1.16 च्या संक्रमणामुळे मरण पावलेल्यांपैकी बहुसंख्य रुग्ण एकतर वृद्ध (६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे) होते किंवा त्यांना इतर सहव्याधींचे आजार होते आणि त्यांना पूरक ऑक्सिजन थेरपीची आवश्यकता होती. यामुळे, जरी रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली, तरी बहुतांश रुग्णांमध्ये आजाराची लक्षणे सौम्य असल्याचे पुणे येथे बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सिक्वेन्सिंग लाब्रोटरीने केलेल्या क्लिनिकल स्टडीमध्ये आढळून आले आहे. ऑक्सिजनची गरज भासणे, रोग्याची स्थिती गंभीर होणे ही परिस्थिती आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ६० वर्षांवरील व्यक्ती, कोविड-१९ ची लस न घेतलेले, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि दमा, यांसारख्या सहव्याधी किंवा इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक होते. देशभरात करण्यात आलेल्या पाहणीतही असेच आढळून आले आहे. २७ एप्रिल २०२३ रोजी भारतातील COVID-19 ची एकूण रुग्णसंख्या ५७४१० इतकी आहे. भारतातील काही राज्यांची आकडेवारी
खालीलप्रमाणे आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील COVID- १९ची रुग्णांची दि. २७-४-२०२३ पर्यंतची स्थिती:
- एकूण रुग्णांची संख्या : ४८७४
- गृह विलगीकरण : ४६६१ (९५.६%)
- रुग्णालयात दाखल करण्यात आलेले रुग्ण : २१३ (४.४%)
- रुग्णालयात दाखल करण्यात आलेले; परंतु ICU ची गरज नसलेले रुग्ण : १७२ (३.५%)
- ICU ची गरज असलेले रुग्ण : ४१ (०.८%)
या आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येते की, रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. नागरिकांनी शासनाने सांगितलेल्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सरकारी आणि निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये आणि बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक आहे, तसेच साप्ताहिक बाजार, बस स्टँड आणि लग्न समारंभ यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर राखा व हाताची स्वच्छता राखा असेही या निर्देशांमध्ये म्हटलेले आहे.
(लेखक बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयात सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख पदावर कार्यरत आहेत.)