
भाजप आमदार नितेश राणे यांची राज्य शासनाकडे मागणी
मुंबई: भारतात ‘लव जिहाद’ या दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदू मुलींचे वास्तव चित्रण करणारा ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन केली आहे.
नितेश राणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, विपुल अमृतलाल शहा यांनी निर्मिती केलेला व सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेला 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला, हा चित्रपट ५ मे २०२३ पासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दिसून येते की हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून यात लव्ह जिहात हा विषय मांडण्यात आला आहे.
नितेश राणे यांनी पुढे म्हटले आहे की, लव्ह जिहाद हा विषय काय आहे हा राज्यातील सर्व घटकांतील जनतेस सामाजिक दृष्ट्या माहित होणे अत्यंत गरजेचे आहे, लव्ह जिहाद या मध्ये हिंदू, विशेष करून हिंदू गोर गरीब मुलींना पैसा व विवाह अशी अनेक आमिषं दाखवून त्यांच्याशी विवाह करुन अल्पावधीतच त्या मुलींना धर्म परिवर्तन, मानसिक व शारीरिक त्रास देऊन सोडण्यात येते. त्यामुळे मुलींच्या आयुष्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब उधवस्त होण्याचे अनेक प्रकार राज्यातील विविध भागांत घडले आहेत. अनेक फसगत झालेल्या हिंदू मुलींनी आत्महत्या केल्याचे प्रकार यापूर्वी घडलेले असून या बाबत अनेक हिंदू संघटनांनी वेळोवेळी आवाजही उचलला आहे.
त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा चित्रपट पहावा व त्या पासून सामाजिक प्रबोधन व्हावे याकरिता राज्य शासनाकडून या चित्रपटाचा करमणूक कर संपूर्णतः माफ करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.