ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे वाहतूक पोलिसांचा मोठा आर्थिक घोटाळा सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी उघडकीस आणला आहे. दुचाकी वाहनचालकांकडून अमर्याद वसुली करूनही ती शासनदरबारी जमाच केली जात नाही. हा महसूल शासन दरबारी जमा करावा लागू नये, यासाठी टोइंग व्हॅनचालक आणि वाहतूक पोलीस अत्यंत कमी केसेस झाल्याचे कागदोपत्री दाखवत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे, अशी माहिती अजय जेया यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे वाहतूक पोलिसांनी ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोइंग व्हॅन मालकांशी करार केला आहे. या करारामध्ये करण्यात आलेल्या दंडवसुलीपैकी प्रत्येक दंडामागे टोइंगच्या मालकांना जीएसटीसह २०० रुपये देण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने टोइंग व्हॅन मालकांना पैसे देण्यात येत असल्याचे जेया यांना माहिती अधिकारात पोलिसांनीच कळविले आहे. जेया यांना जी माहिती पोलिसांकडून दिली, त्या माहितीमुळेच वाहतूक पोलिसांचा हा कारभार उघडकीस आला.
अजय जेया यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांच्या वागळे पोलीस ठाण्यात ४ टोइंग व्हॅन आहेत. या गाड्यांनी १ मार्च ते १० एप्रिल या चाळीस दिवसांत अवघ्या १९६ केसेस म्हणजेच दिवसाला अवघ्या २० केसेस केल्या आहेत. या २० केसेसमुळे टोइंग व्हॅन मालकांना दिवसाला अवघे ४००० रुपये मिळाले असून प्रत्येक व्हॅनला फक्त १ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एका व्हॅनवर साधारणपणे ५ कामगार काम करतात. त्यांचे वेतन, इंधन खर्च, गाडीची दुरूस्ती आणि गाडीचे भाडे पाहता १ हजार रूपयात हा खर्च कसा काय भागवला जातो, असा सवाल जेया यांनी उपस्थित केला आहे.
जो प्रकार वागळेच्या बाबतीत आहे, तसाच प्रकार इतर पोलीस ठाण्यातही आहे. कापूरबावडी वाहतूक पोलिसांकडे ३ टोइंग व्हॅन आहेत. या तीन व्हॅनने ४० दिवसांत १८२० कारवाया केल्या असून त्यातून दिवसाला ९ हजार १०० रूपये; कोपरी वाहतूक पोलिसांकडे २ टोइंग व्हॅन आहेत. त्यांनी ६५४ कारवायांमधून ३ हजार २७० रुपये; नौपाडा वाहतूक पोलिसांकडे २ टोइंग व्हॅन आहेत. त्यामाध्यमातून ८७१ कारवायांमधून दिवसाला ४,३५५ रुपये; कासारवडवली वाहतूक पोलिसांकडे २ टोइंग व्हॅन आहेत. त्यांनी २७०९ कारवायांमधून दिवसाला ११ हजार ३९५ रुपये; ठाणे नगर वाहतूक पोलिसांकडे टोइंग व्हॅन आहेत. त्यातून १६०० कारवाया करून दिवसाला ८ हजार ४२० रुपये; राबोडी वाहतूक पोलिसांकडे १ टोइंग व्हॅन आहे. त्या माध्यमातून २७७ कारवायांमधून दिवसाला १३८५ रूपये; मुंब्रा वाहतूक पोलिसांकडे १ टोइंग व्हॅन आहे. त्यांनी दिवसाला ११०९ कारवायांमधून दिवसाला ५ हजार ५४५ रुपये तर कळवा वाहतूक पोलिसांकडे १ टोइंग व्हॅन वापरून ६१९ दुचाकींवर कारवाई करून दिवसाला ३,०९५ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
वास्तविक पाहता, एका टोइंग व्हॅनवर किमान ५ कामगार काम करीत असतात. या कामगारांचे वेतन, गाड्यांचा इंधन खर्च, मेंटेनन्स, गाडीचे भाडे यासाठी दिवसाला किमान ६ ते ७ हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र एका टोइंग व्हॅनला दिवसाला सरासरी एक ते दीड हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे टोइंग मालक पोलिसांच्या मदतीने मोठा आर्थिक घोटाळा करीत असून त्याचा मोठा वाटा पोलिसांनाही दिला जात आहे. दिवसाला शेकडो वाहनांवर कारवाई करून त्याचे पैसे शासनदरबारी जमाच केले जात नाहीत. त्यामुळेच टोइंग व्हॅन मालकांना आपला खर्च चालविणे शक्य होत आहे, हे पोलिसांनीच दिलेल्या माहितीमधून स्पष्ट होत असल्याचा आरोप जेया यांनी केला.
कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार
९ पोलीस ठाण्यांकडे १९८ जॅमर आहेत, तर ४०० ई-चलन यंत्रे आहेत. या जॅमरचाही समावेश टोइंग व्हॅनद्वारे होणाऱ्या उत्पन्नात दाखविण्यात आला आहे. हा सर्व प्रकार कुंपणानेच शेत खाण्यासारखा आहे. प्रत्यक्षात अनेक वाहनांवर कारवाया करायच्या आणि कागदोपत्री कमी आकडे दाखवायचे, असे प्रकार केले जात आहेत. यासाठी बनावट पावत्यादेखील छापल्या असाव्यात, असा आपणाला संशय असून या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या वाहतूक पोलीस आणि टोइंग व्हॅन मालकांवर कडक कारवाई करावी अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशाराही अजय जेया यांनी
दिला आहे.