Tuesday, December 3, 2024
Homeकोकणरत्नागिरीपरशुराम घाट बंद असल्याने एसटीला दोन लाखांचा तोटा

परशुराम घाट बंद असल्याने एसटीला दोन लाखांचा तोटा

४२ गाड्यांना बसतोय फटका; मुंबई, ठाणे प्रवाशांचे हाल

चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने, शहरातील मध्यवर्ती एसटी बसस्थानकातून दररोज खेड, दापोली व मुंबई, ठाणे, बोरिवली मार्गावर धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बाहेरून मुंबईला जाण्यासाठी या आगारात येणाऱ्या गाड्या पाच वाजेपर्यंत थांबवून सोडल्या जातात. या संपूर्ण काळात एसटी महामंडळाचा दोन लाखांपेक्षा जास्त तोटा होत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी दिली.

बहाद्दूरशेख नाका येथे वाहतूक कोंडी
मुंबई-गोवा महामार्गाचे परशुराम घाटातील काम सुरू असल्याने या मार्गावरील दुपारी १२ ते सायंकाळी ५ या कालावधीत सर्वच वाहतूक बंद करण्यात आली आहे. या दरम्यान कळंबस्ते, आंबडस, चिरणी मार्गे लोटे अशी, पर्यायी वाहतूक सुरू असली, तरी अवजड वाहतूक बंद असते. या मार्गावर पोलीस बंदोबस्त आहे, तो तुटपुंजा असाच आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावर अनेकवेळा डंपर, ट्रक, खासगी बस धावतात; परंतु हा मार्ग अरुंद असल्याने अनेकवेळा जागोजागी वाहतुकीची कोंडी होते. शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या बहाद्दूरशेख नाका येथे वाहनांची मोठी रांग लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वेळा लहान-मोठे अपघातही होतात. गुरुवारी दुपारी एक डंपर रस्त्यात बंद पडल्याने अशीच वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली होती. या मार्गावरील मोठी वाहने बंद ठेवावीत, अशी मागणी स्थानिक जनतेनेही केली आहे. कारण अरुंद रस्त्यामुळे ग्रामस्थांनाही याचा फटका बसतो.

सर्वात जास्त फटका एसटी बस वाहतुकीला बसला आहे. चिपळूण आगारातून दररोज खेड, दापोली, मंडणगड मार्गावर किमान ३० गाड्या धावतात. चिपळूण-खेड तर जास्त फेऱ्या आहेत. या सर्व फेऱ्या सध्या दुपारी बंद असतात. त्याचा आर्थिक भुर्दंड एसटी महामंडळाला भोगावा लागत आहे.

याशिवाय रत्नागिरी, राजापूर, देवरुख, गुहागर या सिंधुदुर्ग आगारातून मुंबई, ठाणे, बोरिवलीकडे जाणाऱ्या दुपारच्या १० ते १२ गाड्या चिपळूण आगारात पाच वाजेपर्यंत उभ्या केल्या जातात.

१० मेपर्यंत घाटाचे काम सुरू राहणार असून प्रवाशांची ससेहोलपट सुरूच राहणार आहे. पावसाळ्यात घाट बंद झाला, तर याहीपेक्षा कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे मत माजी सभापती शौकत मुकादम यांनी व्यक्त केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -