“अत्त् दीप भव:” स्वतः प्रकाशित व्हा आणि समाजाला प्रकाशित करा. या जगाला दिलेल्या सर्वोत्कृष्ट जीवनमूल्यांत जीवनाचे मर्म सांगितले आहे.
- गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
नमो बुद्धाय! अवघ्या जगाला अहिंसा, करुणा आणि शांततेची शिकवण देणाऱ्या भगवान गौतम बुद्धाचा जन्म वैशाख पूर्णिमेला लुम्बिनी येथे बागेत, झाडाखाली इ.स.पू. ५६३ मध्ये एका राजघराण्यात झाला. चक्रवर्ती राजा बनविण्याच्या उद्देशाने सारे शिक्षण महालातच देताना वडील राजा शुद्धोदने सिद्धार्थाला बाहेरील जगापासून दूर ठेवले. ललाटी लिहिलेले चुकत नाही. २९व्या वर्षी एके दिवशी नगरातून फेरफटका मारताना जीवमात्रांच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था पाहता सिद्धार्थाला साक्षात्कार झाला, आपले सुख अपवाद आहे. सारे जग दुःखात आकंठ बुडालेले आहे.
जगातील दुःखाचे मूळ शोधण्यासाठी, नष्ट करण्यासाठी, ज्ञानप्राप्तीसाठी २९व्या वर्षी सिद्धार्थने घराचा, बाकी सर्वांचा त्याग करून ध्यान आणि तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला. सात वर्षांनंतर ३५व्या वर्षी बिहार राज्यातील गया येथे सिद्धार्थ अंतिम सत्याच्या प्राप्तीसाठी तपश्चर्येला बसले. ज्या पिंपळाच्या झाडाखाली वैशाख पूर्णिमेला बुद्धत्व प्राप्त झाले, त्या वृक्षाला बोधी वृक्ष आणि गौतम सिद्धार्थाना बुद्ध म्हणून सारे ओळखू लागले. बुद्ध ही व्यक्ती नाही तर ज्ञानाची उपाधी (अवस्था) आहे.
बोधी प्राप्तीनंतर सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी सर्वात प्रथम उत्तर प्रदेशात सारनाथ येथे पांच पंडितांना बौद्ध धर्माची मूलतत्त्वे सांगितली. जगणे म्हणजे दुःख भोगणे, दुःख दूर करणे हेच बौद्ध धर्माचे केंद्रस्थान! साध्या सोप्या पाली भाषेतून त्यांनी अनुयायींना नवा मार्ग दाखविला. बौद्ध शिकवणुकीचा सार उदात्त सत्यामध्ये आहे.
१. माणूस आणि माणसाचे माणसाशी नाते हा धम्माचा केन्द्रबिंदू.
२. सारे जग दुःखाने भरले आहे, हे माणसाचे दुःख नाहीसे करणे, हा धम्माचा उद्देश.
३. दुःखाचे अस्तित्व मान्य करून ते नष्ट करण्यासाठी मार्ग दाखविणे हा धम्माचा पाया. त्यासाठी भगवान बुद्धांनी चार आर्य सत्य, अष्टांगमार्ग व पंचशिले जगाला दिली.
आर्य सत्यात भगवान बुद्ध म्हणतात, १. मानवी जीवन दुःखमय आहे. २. या दुःखाची निर्मिती आसक्तीतून होते. (आसक्तीमुळे द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून दुःख) ३. त्या आसक्तीवर नियंत्रण ठेवणे. (अपेक्षा, इच्छा न ठेवणे). ४. त्यासाठी सदाचार, परोपकाराचा मार्ग निवडावा. जगाला सदाचार शिकवणारा पहिला महापुरुष भगवान बुद्ध होय. थोडक्यात जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, कारणाला निवारा आहे आणि निवाऱ्याला उपाय आहे.
बौद्ध धम्म हा वैयक्तिक नसून त्याचा मुख्य हेतू समाजाचे हित साधणे, लोकांचे प्रश्न सोडविणे. अनेक लोकांच्या समस्याचे निराकरण बुद्धाने गोष्टीतून केले. धम्म म्हणजे वैचारिक लढा, जीवन जगण्याची विचारधारा. धम्म माणसाला आंतरिक मनोबल प्रदान करतो. धम्म म्हणजे तथागत गौतम बुद्धांची शिकवण. बुद्ध तत्त्वज्ञान: आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांचे समर्थन करणारे आहे. समाजाच्या भल्यासाठी, रक्षणासाठी जे काही कोणी करतो तो खरा धम्म.
धम्म सांगतो, “बुद्धं शरणं गच्छामि; बुद्धीला म्हणजेच ज्ञानाच्या आश्रयाला शरण जा. धम्मं शरणं गच्छामि; मी धर्माचा म्हणजेच शिकवणीचा आश्रय घेतो. संघम् शरणं गच्छामि; मी संघाचा म्हणजे समुदायाचा आश्रय घेतो.” गौतम बुद्धाची शिकवण, विश्वातील साऱ्या मानवतेसाठी, समाजासाठी हितकारक होती. म्हणूनच बौद्ध धर्माला एक वेगळी ओळख मिळाली.
रक्ताचा एकही थेंब न सांडता, बुद्ध धर्म श्रमण (भिक्षू) परंपरेतून निर्माण झाला. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेला. बुद्ध धर्माचे अनुयायी जगभर आहेत. कारण बुद्ध विचार आहे, शांती आहे. जगाला युद्धाची, हिंसेची गरज नाही.
“भवतु सब्ब मंगलम्”! सब की भलाई! अवघ्या जगामध्ये पशुहत्या थांबविण्यासाठी स्वतःचे जीवन बळी देण्याची भगवान बुद्धानी तयारी दाखवली होती. नद्या, जंगल, आपली पृथ्वी जखमी होता काम नये, यावरही भगवान बुद्धाचा भर होता. पावसाळ्याच्या तीन महिन्यांत भिक्षुगण एका ठिकाणी थांबतात. कारण, आपल्या पायाखाली नव्याने अंकुर फुटणारी बीजे चिरडली जाऊ नयेत, नवनिर्मितीला अडथळा येऊ नये. जीवमात्रांतही अहिंसेचा भाव होता.
“अत्त् दीप भव:” स्वतः प्रकाशित व्हा आणि समाजाला प्रकाशित करा. या जगाला दिलेल्या सर्वोत्कृष्ट जीवनमूल्यांत जीवनाचे मर्म सांगितले आहे. आजही आपण मुलांना सांगतो, आयुष्य तुला जगायचे, तू तुझा मार्ग निवड नि समृद्ध हो!
बुद्धाचे काही विचार – १. आयुष्यांत हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवा, ते तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. २. वाईटाला फक्त प्रेम संपवू शकते हे शाश्वत सत्य आहे. ३. लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म. तुम्ही लोकांशी कसे वागता हे तुमचे कर्म. कर्माला कर्माचे काम करू द्या. कर्माचे फळ नक्कीच मिळते. ४. एक हजार पोकळ शब्दांपेक्षा एका चांगल्या शब्दाने मनाला शांतता मिळते.
बौद्ध संस्कृतीच्या मौर्य, गांधार या कला, त्यांच्या स्तूप, स्तंभ, विहारे येथे पाहतो. बोधगया, लुम्बिनी, सारनाथ, कुशीनगर ही बुद्धाची पवित्र स्थाने आणि तक्षशिला, नालंदा ही बौद्ध विद्यापीठे, गौतम बुद्धाच्या अनेक मुद्राही प्रसिद्ध आहेत.
८०व्या वर्षी कुशीनगर येथे वैशाख पूर्णिमेला बुद्धाचे महानिर्वाण झाले. भगवान गौतम बुद्धाचा जन्म, ज्ञान प्राप्ती आणि महानिर्वाण हे जीवनातील तीन महत्त्वाचे टप्पे एकाच तिथीला ‘वैशाख पौर्णिमेलाच’ घडले. हा योगायोग नाही. हेच त्यांच्या आयुष्याचे पूर्णत्व. म्हणून बुद्धजयंती हा दिवस पवित्र मानला जातो.
बुद्ध वैश्विक आहेत, कारण बुद्ध आपल्याला स्वतःपासून सुरुवात करायला सांगतात. आसपास जे काही घडते त्याची ते स्वतः जबाबदारी घेतात. ‘कुणी करायचं?’ या ऐवजी ‘काय करायचे?’ हा विचार केल्यास मार्ग आपोआप सापडतो.
एकदा पाण्यात बुडणाऱ्या माणूस तराफ्याचा आधाराने वाचला. उपकाराच्या भावनेने तराफा घरी नेणे शक्य होत नव्हते. त्यावेळी भगवान बुद्ध म्हणतात, ‘माझ्या भावा, तू तराफ्याची भूमिका पार पाड’! ज्या मार्गाने तुम्ही पुढे जाल, तोच मार्ग पुढे जाण्याचा बनतो, हे सत्य मैत्री भावनेने करा.
बुद्धांची जीवनमूल्ये आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा आहेत. सम्राट अशोकाचे चक्र म्हणजेच धम्माने प्रेरित असलेल्या सदाचरणाचे चक्र! मानवतेच्या कल्याणासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या भगवान गौतम बुद्धास माझे अभिवादन!