भारतासाठी पाकिस्तानचा विषय जणू संपल्यात जमा आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची फार मोठी कुरापत काढण्याची क्षमता या राष्ट्राकडे उरलेली नाही. व्यापार उदिमाच्या आनुषंगाने हे राष्ट्र भारताची कोणतीही वाट अडवू शकत नाही. राजकीय, सामाजिक संदर्भात या राष्ट्राची भारताशी बरोबरी होऊ शकत नाही आणि दहशतवादाला प्रोत्साहन द्यायचे म्हणाल, तर त्या पातळीवरही पाकिस्तानची ताकद कमी कमी होत गेली आहे. इतकी की, हे अतिरेकी पाकिस्तानसाठी गंभीर धोका बनले आहेत. एकूणच भारताने पाकिस्तानकडे फारसे लक्ष द्यावे, अशी परिस्थिती उरलेली नाही. मात्र, एकाच इतिहासाचे, संस्कृतीचे वारसदार असलेल्या या दोन देशांमधल्या लोकांची तुलना केली असता असंगाशी संग करत पाकिस्तानने स्वत:ची काय अवस्था करून घेतली, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या कोणाही विद्यार्थ्यासाठी अभ्यासाचा विषय ठरावा, अशी परिस्थिती आहे. ज्या क्रमाने पाकिस्तान कोसळत गेला आणि आज गुडघ्यावर येऊन बसला, ते पाहता भारतीय नागरिक किती मोठ्या आत्मसन्मानाने जगत आहेत, असे क्षणभर वाटण्यासारखी स्थिती आहे.
आज पाकिस्तानमध्ये जणू काहूर माजले आहे. हा देश वेगाने दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रत्येक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय अर्थसंस्थेकडून तो कर्जाची आस बाळगून आहे. अनेक देशांना आर्थिक मदतीसाठी साकडे घालत आहे. राष्ट्र म्हणून जे काही विकता येईल ते विकण्याची तयारी करत आहे. अगदी पंतप्रधानांच्या ताफ्यातल्या गाड्याही विकून झाल्या आहेत.
रमजानच्या महिन्यात पाकिस्तान महागाईच्या विळख्यात वाईट पद्धतीने अडकल्याचे पाहायला मिळाले. महागाईचा दर ३५ टक्क्यांचा आकडा पार करत असताना नागरिक अक्षरश: हताश झाल्याचे दिसले. गेल्या बारा महिन्यांमध्ये ४७ टक्क्यांनी वाढलेल्या अन्नधान्याच्या किमती आणि वाहतूक साधनांमध्ये झालेली ५५ टक्क्यांची वाढ इथल्या सामान्यजनांचे जिणे किती दुरापास्त झाले असेल, याची चुणूक दाखवते. रमजानच्या पवित्र महिन्यात इथला बाजार खरेदी-विक्रीचे नवे विक्रम नोंदवतो. सर्वांच्याच उद्योगधंद्यांना मोठी बरकत येते. यंदा मात्र सारे काही जणू थिजून गेले. इथे ना ग्राहक आहेत ना नफ्याची आशा करणारे विक्रेते. नफ्याची बात सोडा, दुकानांचे भाडे देण्याचीही क्षमता व्यापारी-व्यावसायिक वर्ग हरवून बसलेला दिसला. घरासाठी पीठ खरेदी करणेही अवघड बनले. या देशासाठी हा महिना इतका रुखासुखा ठरला की पाकिस्तान पुढील काळात महागाई, दरवाढ या बाबतीत किती गंभीर परिस्थितीला सामोरे जाणार आहे, याचा अंदाज येत आहे. जणू काही अल्ला या देशाला केलेल्या दुष्कृत्यांची शिक्षा देत असावा आणि हे इथे भारतात बसून बोलले जात आहे असे नव्हे, तर दस्तुरखुद्द पाकिस्तानी राजकारणीही आपण केले ते अंमळ चुकलेच, या शब्दांमध्ये केल्या चुकांची कबुलीही देत आहेत.
कायदेशीर संकटात सापडलेले पाकिस्तानचे नेते आणि माजी पंतप्रधान इमरान खान हे सत्तेत असताना आणि त्या आधीही सतत भारताच्या विरोधात गरळ ओकत असत; परंतु अलीकडे त्यांनी अचानक भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले.
२०१३ च्या अखेरीस जगात मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेपासून मंदीची ही लाट सुरू होईल, असा अंदाज आहे; परंतु पाकिस्तानमध्ये आताच मंदी आली असून महागाईचा दर ३५ टक्क्यांवर गेला आहे. पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेने कर्जावरील व्याजदर तब्बल १०० अंशांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून या बँकेचा किमान व्याजदर २१ टक्के झाला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाने २८० रुपयांपर्यंत गटांगळी खाल्ली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकमध्ये अन्नधान्याची मदत मिळवण्यासाठी जमलेल्यांची चेंगराचेंगरी होऊन १६ जणांचा मृत्यू झाला. केवळ एक-दोन किलो पिठासाठी लोक हाणामाऱ्या करत आहेत, हे चित्र भयंकर आहे. सोव्हिएत रशिया विस्कटला, त्यावेळी तेथेही ठिकठिकाणी पावासाठी अशाच रांगा लागलेल्या असत. भारताची अर्थव्यवस्था बरी असताना, आपल्याशी बरोबरी करू पाहणाऱ्या पाकला आता आपली स्वतःची खरी कुवत काय आहे, ते नक्कीच कळाले असेल. १९६५ नंतर पाकिस्तानमध्ये कधीही अन्नधान्याची इतकी महागाई झाली नव्हती. मालवाहतुकीच्या भाड्यातच ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या परिस्थितीत पाकिस्तानला तातडीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून १०० कोटी डॉलर्सच्या कर्जाची गरज आहे. हा निधी न मिळाल्यास पाकिस्तान दिवाळखोर होईल. अशा वेळी आंतरराष्ट्रीय बाजारातून पाकिस्तानला कोणीही कर्ज देणार नाही. आत्ताच या देशामध्ये भीषण परिस्थिती असताना, दिवाळखोरीनंतर तर देशाची अन्नान्न दशा होईल अशी शक्यता आहे. इस्पितळात लोकांना औषधे मिळणार नाहीत, उपासमारी आणि कुपोषणाने हजारोंचा मृत्यू होईल.
आधीच गॅसची टंचाई असल्यामुळे या राष्ट्रातल्या लाखो गृहिणींची पंचाईत झाली आहे. रमझानच्या या महिन्यात दिवसभर लोक उपास करतात; परंतु संध्याकाळीही खायला न मिळाल्यास लोकांची स्थिती काय होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. कराचीमध्ये नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक मातांचा मृत्यू झाला. रमझानमध्ये व्यापारी, कारखानदार आणि अन्य श्रीमंत व्यक्ती लोकांना अन्नाची पाकिटे फुकट वाटत असतात. ही पाकिटे घेण्यासाठी सर्वत्र गर्दी ओसंडून वाहत आहे. पाकिस्तानमध्ये भीषण आर्थिक विषमता असून एकूण व्यवस्था सरंजामशाही स्वरूपाची आहे. अचानक ओढवलेल्या आर्थिक हलाखीमुळे असंख्य लोकांना दहा किलोच्या पिठाच्या पोत्यासाठी हजार हजार रुपये देणे परवडत नाही. देशातील मोबाइल जुळणीचे बहुतेक कारखाने बंद पडलेले आहेत. शिवाय इतर अनेक कारखान्यांची शटर्स बंद असून कामगारांना निम्माच पगार मिळत आहे. कापड गिरण्यांप्रमाणेच मोबाइल जुळणी कारखान्यांसाठी बँकांकडून पतपत्रे दिली जात नाहीत. घेतलेली रक्कम परत केली जाईल, अशी हमी देणारी ही पत्रे असतात. ती मिळाल्याशिवाय उत्पादन सुरू ठेवणे अशक्य आहे.
भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश असून एकमेकांबरोबर शांततेत राहणे जरूरीचे आहे. आम्ही भारतासोबत तीन युद्धे लढलो. परिणामी, पाकिस्तानमध्ये गरिबी आणि बेरोजगारीच्या समस्या तीव्र झाल्या. त्यामुळे आम्ही आमचा धडा शिकलो आहोत, अशी कबुली पंतपधान शाहबाज शरीफ यांनी यापूर्वीच दिली आहे. आम्हाला आमच्या लोकांना शिक्षण, आरोग्य सुविधा आणि नोकऱ्या द्यायच्या आहेत. आम्ही आमची संसाधने बाँब आणि दारूगोळ्यावर वाया घालवू शकत नाही, असे उद्गार त्यांनी काढले होते. पाकिस्तानला बऱ्याच लवकर ही उपरती झाली म्हणायची! विशेष म्हणजे, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी, भारत हा शक्तिशाली देश आहे आणि अमेरिका व रशिया भारताच्या पाठीशी उभे आहेत, असे मत व्यक्त करून भारताची प्रशंसा केली आहे. वास्तविक, अण्वस्त्रसज्ज राष्ट्र असूनही पाकिस्तानला सगळीकडे कर्जासाठी हिंडावे लागत आहे. ही उधार-उसनवारी करणे हे अवमानास्पद वाटते, अशी भावनाही शाहबाज यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या डोक्यावर वेगवेगळ्या देशांचे आणि अर्थसंस्थांचे मिळून १०० अब्ज डॉलर्स एवढे कर्ज आहे. २०२३ मध्येच त्यांना त्यापैकी २१ अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे आणि पुढच्या तीन वर्षांमध्ये उरलेले ७० अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करावे लागेल. आज पाकिस्तानकडे केवळ ४.३ अब्ज डॉलर्स इतकीच विदेश चलनाची गंगाजळी आहे. गेल्या दहा वर्षांमधली ही नीचांकी अवस्था आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…