- इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या सावलीत त्यांचा राजकीय प्रवास झाल्याचा त्यांना लाभ झाला आहेच, पण त्यांच्या महत्त्वाकांक्षेला मर्यादाही पडल्या आहेत. किती काळ मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेते म्हणून काम करीत बसायचे, या प्रश्नाने त्यांना भंडावले असावे. ते नेहमीच स्पष्ट बोलतात, मनात जे असेल ते बिनधास्त मांडतात, पण त्यामुळे ते अनेकदा वादात सापडतात.
नुकत्याच एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा असल्याचे बोलून दाखवले. ही इच्छा त्यांनी लपवून कधी ठेवली नाही. ‘आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर काय, आता म्हटले तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे, १०० टक्के मुख्यमंत्री होण्यास मला आवडेल’ असे त्यांनी जाहीर मुलाखतीत सांगून टाकले. महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही? आमदार म्हणून कोणताही अनुभव नसणारे पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात. मग गेली तीन दशके राजकारणात सक्रिय असताना आपण का नाही, हा कळीचा मुद्दा आहे.
अजित पवार यांना तातडीने मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांच्या पाठीशी विधानसभेत आमदारांचे बहुमत असणे आवश्यक आहे. जेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असे आघाडीचे सरकार होते, तेव्हा पाठोपाठ काँग्रेसचेच मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पुतण्याचा विचार केल्याचे कधी आठवत नाही. शरद पवार व त्यांचा पक्ष हा राज्यात व केंद्रात विरोधी पक्षात आहे आणि काँग्रेसचा मित्र पक्ष आहे. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे तर ते सर्वस्वी भाजपच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याच हातात आहे. मग अजित पवार हे आपल्याला आताही (लगेच) मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे जे सांगत आहेत ते कुणाच्या पाठिंब्याने, आश्वासनाने किंवा कुणाच्या आशेवर
बोलत आहेत?
पृथ्वीराज चव्हाण किंवा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अजित पवार यांना विधिमंडळाचा अनुभव मोठा आहे, मग त्यांचा विचार तेव्हा का झाला नाही? पृथ्वीराज यांच्या सरकारमध्ये आपण नाईलाजाने व वरिष्ठांनी सांगितले म्हणून उपमुख्यमंत्री होतो असे ते सांगतात. त्याच्या हाताखाली काम करणे पसंत नव्हते, तर मग तेव्हाच का ते बाहेर पडले नाहीत? उद्धव ठाकरे यांच्यासोबत आनंदाने व समाधानाने काम केले असे ते सांगतात. कारण स्वतः उद्धव हे वर्षा किंवा मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते. लोकांना भेटत नव्हते. मंत्रालयात जात नव्हते. त्यामुळे त्या अडीच वर्षांच्या काळात जनतेची रांग ही अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या दारात लागलेली दिसायची. महाआघाडी सरकारवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते असे उघड बोलले जात असे. मुख्यमंत्री घरात बसून असल्याने उपमुख्यमंत्र्यांना मोकळीक होती असे चित्र होते. आता एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवारांवर विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची पाळी आली. पण असे किती काळ चालायचे? या विचाराने अजित पवार अस्वस्थ झाले असावेत.
अजित पवारांनी आपली मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा मुलाखतीत बोलून दाखविण्याआधीपासूनच ते आघाडीत अस्वस्थ आहेत, ते बंडाच्या तयारीत आहेत, अमित शहा यांची त्यांची दिल्लीत भेट झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांच्या स्वाक्षऱ्या त्यांच्याकडे आहेत, इथपर्यंत माध्यमातून रोज बातम्या झळकत होत्या. अजित पवार केव्हा एकदा राष्ट्रवादीतून बाहेर पडतात, भाजपच्या दिशेने जातात हे सांगण्याची मराठी वृत्तवाहिन्यांची स्पर्धा चालू होती. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात जाणार, शिंदे गटाचे सोळा आमदार बाद ठरणार, एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार असे कथानक माध्यमांनी रचले होते. शेवटी अजित पवार यांनी माध्यमांच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही असे दोन वेळा सांगून बघितले तरीही अजित पवार आज राज्यपालांना भेटणार, इथपर्यंत वृत्तवाहिन्यांवरून बातम्या झळकल्या. त्यांनी त्यांचे कार्यक्रम रद्द केले, पक्षाच्या आमदारांना बोलावून घेतले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला विदेश दौरा अर्धवट टाकून मुंबईकडे निघाले, अशा ब्रेक्रिंग न्यूजचा भडीमार चालू होता. शेवटी वैतागून अजित पवार पत्रकारांना म्हणाले, आता काय मी कपाळावर पक्षाचा झेंडा लावून फिरू काय? जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असे सांगितल्यावरही माध्यमांनी आपला सूर बदलला नाही.
अगोदर पृथ्वीराज चव्हाण, मग ७२ तासांसाठी देवेंद्र फडणवीस आणि नंतर अडीच वर्षे उद्धव ठाकरे अशा तीन मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. आदल्या दिवशी ते आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत राहणार असे सांगतात आणि दुसऱ्या दिवशी शरद पवार कुटुंबीयांच्या मालकीच्या माध्यम समूहाला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रशंसेचा वर्षाव करतात याचे भाजपला नव्हे तर महाआघाडीला आश्चर्य वाटले. जे कधी सरपंचही नव्हते, आमदार तर कधीच नव्हते अशा उद्धव ठाकरे यांनी महाआघाडी सरकारचे नेतृत्व केले. शरद पवारांनी गळ घातली म्हणून मुख्यमंत्रीपद स्वीकारले असे उद्धव यांनी अनेकदा म्हटले आहे. तेव्हा निदान त्यांच्या पक्षाचे विधानसभेत ५६ आमदार निवडून आले होते, आता तर केवळ १५ आमदार उरले आहेत. तरी पंधरा आमदारांचा नेता हा महाआघाडीचे नेतृत्व करीत आहे, ही खदखद काँग्रेस व राष्ट्रवादीत अनेकांच्या मनात आहे. महाआघाडीत उबाठा हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, मग महाआघाडीच्या सभांमध्ये त्यांना मधोमध वेगळी खुर्ची कशी असा कळीचा मुद्दा आहे. सभांमध्ये उद्धव ठाकरेंचे भाषण होते पण अजित पवारांचे नाही, असेही घडले आहे. ही खदखद शरद पवारांना समजत नसेल का? राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळ, आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि अजित पवार हे चार उपमुख्यमंत्री राज्याला दिले. आर आर पाटील (आबा) हयात नाहीत. भुजबळ दोन वर्षे जेलमध्ये जाऊन आले. विजयसिंह मोहिते हे भाजपमध्ये गेले. आता अजित पवार मोदींची प्रशंसा करीत आहेत.
सन २०१४ व २०१९ मध्ये भाजप सर्वदूर पोहोचली त्याला एकमेव कारण नरेंद्र मोदी आहेत. मोदींचा करिष्मा देशात चालला. त्यांनी देशात जनतेचा विश्वास संपादन केला व आपल्या भाषणातून जनतेला आपलेसे केले. १९८४ नंतर देशात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळालेले सरकार स्थापन झाले. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारमधेही डाॅ. मनमोहन सिंग यांच्या सरकारला अन्य पक्षांची मदत घ्यावी लागली होती, मोदींनी देशात करिष्मा निर्माण केला सांगताना अजित पवारांनी महाआघाडीच्या वज्रमुठीवर हातोडा मारला.
सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन अशी घोषणा दिली होती, तेव्हा माध्यमांनी त्याची टिंगल केली. आता अजित पवार म्हणतात, मला आताही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, तेव्हा मात्र त्याची चर्चा होत नाही. आघाडी सरकारमध्ये एका निवडणुकीत जास्त आमदार असूनही काँग्रेसने मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला दिले नव्हते आणि राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्रीपद आपल्याकडे खेचून आणले असे कधी घडले नाही.
वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ म्हणजे अकरा वर्षे मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर काँग्रेसच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांची टर्म पूर्ण केली नाही. स्वतः शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले पण त्यांना सलग पाच वर्षे या पदावर काम करता आले नाही. वसंतराव नाईकांनंतर देवेंद्र फडणवीस यांनीच केवळ पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची टर्म पूर्ण केली. विधानसभेची निवडणूक २०२४ मध्ये आहे. दीड वर्षे बाकी आहे. मग या दीड वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावे, असे अजित पवारांना वाटते का? त्यांची महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही पण सध्या व्हेकन्सी नाही? मोदी-शहांनी हिरवी झेंडा दाखविल्याशिवाय महाराष्ट्रात बदल शक्य नाही?