Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखसुदानमधील भारतीयांसाठी ‘ऑपरेशन कावेरी’

सुदानमधील भारतीयांसाठी ‘ऑपरेशन कावेरी’

देशात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असल्याने नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्याचे काम सरकार करत असते. शासकीय यंत्रणा दिवस-रात्र राबत असते; परंतु कर्तव्याचा भाग म्हणून त्याकडे पाहिले जाते. देशाच्या सीमेच्या बाहेर राहणाऱ्या भारतीयांची काळजी घेण्याचे उत्तरदायित्व केंद्र सरकारला अनेकदा करावे लागते. त्याचा प्रत्यय अलीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या वेळी आला होता. उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना युद्धाच्या दाहक झळा बसत असतानाही सहिसलामत मायदेशी आणण्याचे काम भारत सरकारने केले. आता त्याच तत्परतेने केंद्र सरकारकडून भयंकर रक्तपात सुरू असलेल्या सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. भारतीय वायुसेनेची विमाने सौदीच्या जेद्दाह शहरात, तर नौदलाची विनाशिका सुदानच्या बंदरात दाखल झाली आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सातत्याने या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. सुदानची राजधानी खार्तुम व इतर भागातून आतापर्यंत ५०० भारतीयांना ‘पोर्ट सुदान’मध्ये आणण्यात यश आले आहे. गेल्या १२ दिवसांपासून सुदानमध्ये सुरू असलेल्या संघर्षात ४१३ जणांचा बळी गेला आहे. सुदानी लष्कर आणि निमलष्करी दलामध्ये झालेल्या या संघर्षाची व्याप्ती पुढच्या काळात अधिकच वाढेल आणि इथे अधिक रक्तपात होईल, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळेच जगभरातील प्रमुख देशांनी सुदानमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याची तयारी केली आहे. यासाठी सौदी अरेबियाचे सहाय्य घेतले जात आहे. सौदी अरेबिया, यूएई व इजिप्त या देशातून मदत कार्यात सहकार्य मिळत आहे, ही जमेची बाजू आहे. सौदीने आतापर्यंत तीन भारतीयांना सुरक्षितरीत्या सुदानमधून बाहेर काढले आहे. तसेच फ्रान्सने देखील आपल्या नागरिकांसह भारतीयांचीही इथून सुटका केल्याचे सांगितले जाते.

एकूण सुदानमध्ये तीन हजारांहून अधिक भारतीय अडकून पडले असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात चार दिवसांपूर्वी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदानमधील भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन कावेरी या मोहिमेसह सर्वतोपरी सज्जता ठेवण्याची सूचना दिली. सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात युद्ध पेटले आहे. या दोन्ही दलांकडून एकमेकांच्या तळावर हल्ले सुरू असून, देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गोळीबार आणि चकमकीच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना घराबाहेर न पडण्याचे आदेश तेथील भारतीय दूतावासाने दिले आहेत. राजधानी खार्तूमसह सुदानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने भारतीय दूतावासाने आश्रय केंद्रे उभारली आहेत. भारतीयांना तेथील आश्रय केंद्रांमध्ये थांबण्यास सांगण्यात आले आहे. कृपया शांत राहा आणि पुढील अपडेटची प्रतीक्षा करा, असे भारतीय दूतावासाचा संदेश तेथील भारतीयांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात सौदी अरेबिया, यूएई आणि इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संपर्क साधून सद्यस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू ठेवले आहे. सुदानमधील परिस्थिती चिघळत असल्याने भारताने वायुसेनेची दोन ‘सी-१३०जे’ ही अवजड वाहतूक करणारी विमानेही सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये तयार ठेवली आहेत, तर नौदलाची विनाशिका आयएनएस सुमेधा सुदानचे बंदर ‘पोर्ट सुदान’मध्ये दाखल झाली आहे. आकस्मिक परिस्थिती उद्भवली तर भारतीयांच्या सुटकेसाठी तातडीची उपाययोजना करण्यासाठी ही सज्जता ठेवण्यात आलेली आहे. सुदान हा खनिज संपत्तीची खाण असलेला देश आहे. या देशातील पूर्वीची सत्ता लष्कर आणि निमलष्करी दलाने मिळून उलटवली होती. आता लष्कर आणि निमलष्करी दलामध्ये संघर्ष पेटलेला दिसून येत आहे. येथील मोठी कंत्राटे मिळविण्यावरून जगातील महासत्तेतील दोन देशांमधील शीतयुद्ध आता लपून राहिलेले नाही. सध्या रशिया ही पडद्यामागून लष्कराला सहकार्य करत आहे, तर अमेरिका ही निमलष्करी दलाला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र हे दोन्ही देश आपला या अंतर्गत युद्धाशी काही संबंध नसल्याचेही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदानची सत्ता कोणाच्या ताब्यात असणार यावरून सुरू असलेला दोन सैन्यदलांमधील टोकाच्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. ते देशाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांना विमान मिळू शकले नाही ते जीव धोक्यात घालून गाडीने किंवा पायी प्रवास करत आहेत. अनेक नागरिक इजिप्तमध्ये शिरण्याच्या प्रयत्नात आहेत. रस्ते, पूल वगैरे सर्व ठिकाणी टाळेबंदी लागू करण्यात आली असल्याने अनेक नागरिक वाटेतच अडकून पडले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सुदानमध्ये बहुसंख्य मुस्लीम लोकसंख्या आहे. त्यामुळे रमजान ईद साजरी होत असताना संघर्ष कमी होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र बुरहान आणि दगालो हे दोघेही इरेला पेटल्याने युद्ध थांबण्याची शक्यता मावळली आहे. आतापर्यंत या संघर्षांत २६४ सामान्य नागरिकांसह किमान ४२० जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ७०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचा आकडा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. युद्धविरामाची शक्यता मावळल्यानंतर विविध देशांनी आपले राजनैतिक अधिकारी आणि नागरिकांना सुदानबाहेर काढण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. सुमारे ३ हजार भारतीय सुदानमध्ये अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारीसुद्धा उच्चस्तरीय बैठक घेऊन याबाबत आदेश दिल्यानंतर सोमवारी ‘ऑपरेशन कावेरी’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. भारतासह अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, नेदरलँड्स, जपान, इटली, जॉर्डन, इजिप्त, स्पेन, ग्रीस या देशांनीही बचाव मोहिमा सुरू केल्या आहेत. आतापर्यंत हजारो परदेशी नागरिकांना सुदानमधून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. सुदानमध्ये जवळपास १० हजार इजिप्शियन नागरिक असून त्यांनी तातडीने पोर्ट सुदान किंवा उत्तरेकडील वाडी हल्फा येथे पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शेकडो बस तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. भारत सरकारचे ऑपरेशन कावेरी यशस्वी होऊन हजारो भारतीय मायदेशी परततील, असा विश्वास वाटतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -