बीज परीक्षण, शेती औजारांचे पूजन, संस्कृती, परंपरा, संचिताचे जतन
सुरगाणा : तालुक्यातील डांग सीमावर्ती भागातील आदिवासी बांधव आजही अनेक सण, समारंभ, उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात स्वारस्य दाखवतात. यापैकीच अक्षय तृतीया हा सण या आदिवासी बहुल भागात अनेक वर्षांपासून आखाती गौराई म्हणून सण साजरा केला जातो. या सण उत्सवाला सुरुवात जून महिन्यात होते. तेरा हा पहिला सण जून महिन्यात प्रथम साजरा केला जातो. त्यानंतर सणांची मालिकाच सुरु होते.
वर्षभरातील शेवटचा सण म्हणून आखाती गौराई या उत्सवाकडे पाहिले जाते. याला आदिवासी परिभाषेत ‘बुडीत सण’ असे ही म्हटले जाते. या निमित्ताने पावसाळ्यापुर्वीच एक प्रकारे बीज परिक्षण करीत, शेती औजारांचे पुजन केले जाते. आपली संस्कृती, परंपरा, संचित हे आदिवासींच्या सण, समारंभांमधून दिसत असते. सात दिवस अगोदरच गौराई घातली जाते.
गौराई घालणे म्हणजे पाच धान्य म्हणजेच भात, नागली, मका, तुर, उडीद यासह वेगवेगळ्या प्रकारचे धान्य एका बांबू पासून विणलेल्या (शेणुलगा) शेण टाकायच्या टोपलीत माती भरून हे धान्य पेरले जाते. त्याला सात दिवस सकाळ, संध्याकाळ पाणी घातले जाते. ही टोपली ओसरीवर एका कोपऱ्यात बांबूचे कणस खुड्या झिलाखाली झाकून ठेवले जाते. त्याला सूर्य प्रकाश, ऊन, हवा लागू दिली जात नाही. त्यामुळे उगवणारी रोपे पिवळी पडतात. ज्या घरी गौराई घालतात, त्या घरी रात्रीच्या वेळी लय, सुर, तालात महिला गौराईची गाणी गातात. आपले सुख, दुख, अनुभव गप्पा गोष्टीतून एकमेकांशी स्नेह, आदरभाव, प्रेम, आपुलकी निर्माण होते.
यामध्ये कणसरी माता, पिक, पाणी, भाऊ, बहिण, नाते, गोते, पशुपक्षी, निसर्ग याचे वर्णन या गाण्यात असते. या सणानिमित्त नुकतेच लग्न झालेली मुलगी सासरहून माहेरी येते. सात दिवसानंतर पारंपरिक पद्धतीने संबळ, कहाळ्या या वाजंत्रीने जल्लोषात गौराईची मिरवणूक काढली जाते.
सुरुवातीला गौराईची गाणी गात गावदेवी जवळ उगवलेली गौराई अर्पण केली जाते. त्यानंतर पोलीस पाटील यांच्या घरापासून मिरवणूकीस सुरुवात केली जाते. आपापल्या घरात घातलेली गौराईची टोपली नटुन थटून डोक्यावर ठेवून मिरवणूकीत तरुणी सहभागी होतात. केसात पिवळे धमक असे गौराईचे रोपे माळतात तर पुरुष मंडळी हिच रोपे कानात खोचतात.
नाचत गात ही मिरवणूक गावातून विहीर, नदी, तलाव, पाण्याचा झरा, या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी जमिनीवर वाळूने इशव-या देव व राक्षस यांच्या प्रतिमा काढतात. त्या निसर्ग देवाला, महिला सोन्याची नथ घालतात. जेष्ठ महिला हातात घागर घेऊन फुंकून, मोठा आवाज काढून, त्या प्रतिमेवर नाचत ती पुसली जाते. त्यानंतर उगवलेल्या गौराईचे परिक्षण, निरिक्षण, केले जाते. येत्या पावसाळ्यात आपल्याकडे उपलब्ध असलेले बियाणे कसे रुजणार याचा अंदाज व्यक्त केला जातो. नदीवरुन येताना महिला बेडूक, बेडकी, फेदरा (शेवाळ) आदी वस्तू गौराई विसर्जन ठिकाणाहून लपवून आणतात. त्या सार्वजनिक ठिकाणी आणल्यावर पुरुषांना नेमके काय आणले, हे ओळखण्यास सांगितले जाते. त्याला जिखणे असे म्हणतात. तर दुसरीकडे पुरुष याच ठिकाणी एका झिल्याखाली एखादा लहान मुलगा ठेवतात. त्याचे नाव ओळखायला सांगतात.
शेतीच्या कामाच्या वस्तू फाळ, असू, कासरा, खोडगी, घरटी, विळा या वस्तू झाकून ठेवतात. त्या महिलांना ओळखण्यासाठी सांगितले जाते. जर नेमके ओळखता आले नाही, तर महिला झुंडशाही करीत झाकलेला झिला उचलून धरतात. या निमित्ताने मातेचा नैवेद्य दाखविला जातो. शेण टाकतात ती जागा म्हणजे ‘गवर’, यावर पाच मुलांना जेवायला बसवितात त्यांना भात, मासे, दाळ, नागलीच्या भाकरीचे जेवण दिले जाते.
भुत्या म्हणजे चक्रीवादळ, वावटळ याची पुजा केली जाते. अशा पद्धतीने हा गौराई सण उत्साहाने साजरा केला जातो. याला शेवटचा ‘बुडीत’ सण असे म्हटले जाते. पेरलेले बियाणे उगवण होण्यास योग्य आहे की कमजोर, याची परीक्षा करतात.
गाणी… गौराईची……
सिता पाटी, माती भरवं.. बाई…
येळू, शेळू पिरवं.. दाणा बाई पिरवं.. दाणा…
दाणा बाई शिपावं.. दाणा…
ये ही दाणाला एक सुळा फुट बाई.. एक सुळा…
ये ही दाणाला एक पान फुट बाई एक पान…
याप्रमाणे सात पाने फुटतात असे गीतातून गौराईचे वर्णन केले जाते.