काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या पाच जवानांवर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला करून त्यांना ठार केले. या हल्ल्यामुळे पुलवामा प्रकरणाची आठवण झाली, ज्यात ४० केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजे सीआरपीएफच्या जवानांना क्रूरकर्मा दहशतवाद्यांनी ते जात असलेल्या वाहनांच्या ताफ्यात घुसून आत्मघातकी बाॅम्बस्फोट घडवून ठार केले होते. त्यानंतर देशभरात संताप उमटला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट हवाई हल्ले घडवून भारतात आता पूर्वीचे काँग्रेसचे पुचाट सरकार नाही, हे दाखवून दिले. त्यावेळी पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या राहुल गांधी यांनी लष्कराकडे पुरावे कसे मागितले आणि त्याबद्दल मतदारांनी राहुल यांना लोकसभा निवडणुकीत कसे झिडकारून टाकले, याची कथा नंतरची सर्वांना माहीतच आहे. दोन दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये करण्यात आलेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. राजौरी-पूंछ रस्त्यावर पाऊस आणि पुरेसा उजेड नसल्याचा फायदा घेत दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पाच जवानांना त्यांच्या ट्रकवर हल्ला चढवून ठार केले. शांघाय सहकार्य संघटनेची एक महत्त्वाची बैठक पुढील महिन्यात गोव्यात होत आहे. त्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हेही येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भारत आणि पाकिस्तानमध्ये काहीतरी सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया रुळावरून घसरवण्यासाठी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असावा, असा दाट संशय सुरक्षा संस्थांना आहे.
यापूर्वीही जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात एखादी महत्त्वाची बैठक किंवा चर्चा होण्याची शक्यता दिसली की, काश्मिरातील दहशतवादी गट हे असाच भ्याड हल्ला चढवून ही चर्चा किंवा बैठक रद्द कशी होईल, हे पाहत. अर्थात तेव्हा भारतात काँग्रेसचे पुचाट आणि खलितेबहाद्दर सरकार होते. दहशतवाद्यांनी ताजा जो हल्ला केला आहे, तो यासाठीच आहे. त्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांततेवर चर्चा कोणत्याही परिस्थितीत नकोच आहे. सध्या तर हा चर्चेचा मामला थंड्या बस्त्यात आहे. गोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या शांघाय बैठकीवर या हल्ल्याचे सावट पडावे आणि भारताने संतापून बैठकीत पाकिस्तानला बहिष्कृत करावे, हा दहशतवाद्यांचा हेतू असावा. अजून तरी भारताने बिलावल यांना दिलेले निमंत्रण परत घेतलेले नाही. अर्थात अजून बरेच दिवस बाकी असल्याने पुढेही काहीही होऊ शकते.
एससीओच्या छत्राखाली होणारी कोणतीही महत्त्वाची बैठक चुकवायची नाही, हे नवीन धोरण सध्या पाकिस्तानने ठरवले आहे. त्यानुसारच बिलावल या बैठकीसाठी येत आहेत. अर्थात ते जर आले, तर काश्मीरमध्ये भारताच्या पाच जवानांना दहशतवाद्यांनी ठार केल्याचा मुद्दा चर्चेत येणार, हे तर अटळ आहे. त्यानिमित्ताने भारतातील हल्ल्यांचा विषय भारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेऊ शकतो. त्यामुळे जर बिलावल या बैठकीसाठी आले तर भारताला जवानांवरील हल्ल्याचा विषय मांडून पाकिस्तानला खडे बोल सुनावता येतील. बिलावल हे मेहमान आहेत, म्हणून त्यांच्याबाबतीत गांधी सरकारांच्या प्रमाणे अतिरिक्त मेहमाननवाझी दाखवण्याची काहीही आवश्यकता नाही. अखेरीस ते अशा देशाचे मंत्री आहेत की ज्या देशाने भारताला सातत्याने दहशतवाद्यांच्या मदतीने संत्रस्त केले आहे. हजारो निरपराध भारतीयांची हत्या केली आहे. एखादा परराष्ट्र प्रमुख भारताच्या भेटीवर येत असेल किंवा महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक भारतात होत असेल तर दहशतवादी मोठे हत्याकांड घडवतात आणि ती प्रक्रिया रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न करतातच. हा इतिहास आहे आणि ताजी घटनाही याला अपवाद नाही. माजी अमेरिकन अध्यक्ष बिल क्लिंटन जेव्हा भारतात यायचे होते तेव्हा दहशतवाद्यांनी काश्मीरमधील एका लहानशा गावात ४० शीख नागरिकांची हत्या केली होती. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या हत्याकांडामागे पाकिस्तानचा हात असून क्लिंटन यांनी आपल्या पाकिस्तान भेटीत त्याचा उल्लेख करावा, असेही म्हटले होते. त्यानंतर जेव्हा जेव्हा अशा कोणत्या बैठका होत तेव्हा त्याच्या अगोदर दहशतवादी मोठा हल्ला घडवत. पण आता पाकिस्तानची अवस्था खूपच कमकुवत आहे आणि तो देश भिकेला लागला आहे. तरीही भारताविरोधात काड्या करण्याचे आणि भारताला त्रास देण्याचे आपले धोरण सोडून देण्याचा त्याचा मनसुबा नाही. त्यामुळे पूंछमध्ये हल्ला जरी दहशतवाद्यांनी केला असला तरीही त्यामागे कोण सूत्रधार आहेत, हे समजायला अकलेची गरज नाही. पाकिस्तानच्या मांडीवर बसून दहशतवादी भारतावर हल्ले करत आले आहेत आणि तरीही त्यांचे सूत्रधार पाकिस्तानात मोकाट फिरतात. भारताने कित्येकदा मागणी करूनही मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईद हा पाकिस्ताने भारताच्या हवाली केलेला नाही. आता या हल्ल्याच्या निमित्ताने तरी भारताने पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे करावी. सध्या अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध कमालीचे मधुर आहेत. त्यामुळे कदाचित आंतरराष्ट्रीय समुदायाचा मोठा पाठिंबा भारताला मिळू शकतो. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय जगात एकटे पाडण्याचा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा प्रयत्न यशस्वी झालाच आहे. तसेही पाकिस्तानला चीन सोडले तर कुणी मित्र देश उरलेला नाही. भारताने बिलावल यांना बोलवावे आणि गोव्याच्या बैठकीत पाकिस्तानने आतापर्यंत केलेल्या पापांचे माप त्याच्या गळ्यात घालावे. कारण पाच जवानांची हत्या या घटनेला स्वतंत्रपणे पाहता येणार नाही, तर ती केवळ या दहशतवाद्यांच्या कुटिल आणि विषारी डावपेचांची एक मालिका आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…